Tuesday, December 3, 2024

माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना धनगर समाज बुध्दीवादी लेखकाचे खुले पत्र

 माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना खुले पत्र

------------------------------------------

दिनांक:  १५ नोव्हेंबर २०२४

प्रति,

माननीय देवेंद्रजी फडणवीस,                          माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई 

विषय: आरक्षण अंमलबजावणी करण्याचेे खोटेे वचन दिल्याबाबत

महोदय, 

          होमेश भुजाडे यांचा नागपूर वरून आपणास सप्रेम जय अहिल्याई! जय मल्हार!! जय यशवंत!!! वि. वि.

          पत्र लिहिण्याचे कारण हेच की, आपण २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर जमातीचा समावेश एसटी प्रवर्गात करू असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा तुम्ही भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर आपण मुख्यमंत्री झालात तथा वर्तमानात आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. आपल्या पक्षाची सत्ता केंद्रात  व राज्यात दहा वर्षे पूर्ण झालीत. आता सध्या विधानसभा निवडणुकीचा राज्यात धुराळा सुरू आहे. गेल्या दहा वर्षांपासून आपला पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही धनगर जमातीच्या एस. टी. आरक्षण अंमलबजावणीची वचनपूर्ती आपण पूर्ण करू शकलेले नाही.

          सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीतच धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं अभिवचन व आश्वासन २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच आश्वासन दिलं होतं. आता दहा वर्षं होऊन गेली, पण हा प्रश्न आपण सोडवला नाही. आरक्षण कधी देणार? असा प्रश्न धनगर जमात आजही आपणास विचारत आहे. 

           बारामती येथील धनगरांचे उपोषण सुरू असतांना उपस्थित लाखो धनगर जमातीच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना आपण "मला धनगर आरक्षणाची संपूर्ण माहिती असून मी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. सत्तारूढ सरकार धनगरांना आरक्षण देवू शकत नाही. भाजपला सत्तेत आणा मी पहिल्याच केबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकित धनगरांना अनुसूचित जमातिच्या आरक्षणाची केवळ आठ–पंधरा दिवसांत अंमलबजावणी करतो." असे आपण आश्वासन दिल्याने गेल्या २०१४ व २०१९ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण देईल या एका आशेवर धनगर जमातीने एकगठ्ठा मतदान आपल्या भाजप या पक्षाला दिले. केंद्रात व राज्यात दोनदा सत्ता दिली. भाजपाची केवळ धनगर जमातीमुळेच  सत्ता आली आहे अशी जाहीर कबूली आपण एका जाहीर सभेत दिलेली होती. आपण प्रथम पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केला. आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहात. तरीही धनगरांची मागणी आजपर्यंत मान्य झालेली नाही. आपण व नरेंद्र मोदी यांनी धनगरांचे मतदान मिळवून धनगरांच्या आरक्षण मागणीला बगल देत वारंवार चालढकल केली आणि धनगरांना चक्क फसवलं हे यावरून दिसून येते. 

          महाराष्ट्रात सुमारे २० टक्के लोकसंख्या असलेल्या धनगर जमातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी हा समाज गेली सात दशके करीत आलेला आहे. मात्र आपल्या सारख्या राजकर्त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. 

           टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या टिसची मागणी नसतांना व गरज नसतांना आपण ती ८ डिसेंबर २०१५ ला नेमून धनगरांवर लादली. त्यासाठी मागील सरकारच्या चुकीच्या शिफारसिचा दाखला देत आपण धनगर जमातीची फसवणूक केली. धनगर आरक्षण  आंदोलनातून पुढे आलेले व समाजाच्या जिवावर मोठे झालेले अनेक पुढारी जे धनगर आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवत होते; आरक्षणावर बोलत होते; आंदोलन करत होते त्यांना आपण भाजपच्या कमळरूपी कळपात नेऊन दलदलीच्या चिखलात कायमस्वरूपी गडप केले. कारण भाजपची सत्ता येताच सर्व आरक्षण आंदोलनं व मोर्चे प्रस्तूत पुढाऱ्यांनी बंद केलेत. यातील आंदोलन करणारे काही तर आपल्या पक्षा द्वारेच प्रायोजित नेते होते असेही धनगरात बोलले जाते हे ही नसे थोडके. 

           अशा पुढाऱ्यांना विधानपरिषद व राज्यसभेवर घेऊन; काहींना मंत्रीपद देऊन त्यांची तोंड बंद केलीत. स्वजमातीशी द्रोह करून त्यांच्या उरावर पाय देवून पद प्राप्तीसाठी पुढारी बणलेले अतृप्त आत्मे आपण सुनियोजित पद देऊन तृप्त  करत शेंडीला गाठ बांधून शांत केलेत. काहींना मंडळांवर नेमले. असल्या घाणेरड्या राजकारणातून तुमच्या विरूद्ध उठणारा धनगरांचा आवाज व आंदोलन आपण पूर्णतः दडपले. यातून धनगर पुढाऱ्यांनी समाजनिष्ठा सोडून सत्ता व पक्षनिष्ठा बाळगत स्वस्वार्थ साधला. धनगर जमात भाजपच्या दावणीला बांधली. उपोषण, मोर्चे, आंदोलन बंद करून पुढाऱ्यांनी आमदारकी व खासदारकीचे ऐथेच्छ सुख उपभोगले, भरपूर मानधन व निवृत्ती पेंशन स्वरूपात हे आजही आर्थिक सुख उपभोगत आहेत; हे धनगर जमात जाणून आहे. पुढाऱ्यांच्या मागे फिरत असलेल्या चेले चपाट्यांची व्यक्तिगत कामे जरूर झालीत पण ज्या समाजाच्या  जिवावर वर पुढारी मोठे झालेत तो समाज मात्र विश्वासघाताने फसवल्या गेल्याने यथास्थितच राहिला.

            गेली दहा वर्षे धनगर आरक्षण प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारनं लोंबकळत ठेवल्याने आज मात्र या धनगर जमातीच्या भाजपाई पुढाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. धनगर जमात ही  आपल्याच पुढाऱ्यांकडे जमातीचे शत्रू म्हणून पाहू लागली आहे. हे पुढारी आता धनगर जमातीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे सापडेल तिथे या पुढाऱ्यांना आरक्षण कधी मिळणार या प्रश्नाची सरबत्ती सुरू होत असतांना त्यांच्याकडे याचे काहीही उत्तर नाही. केवळ आपलं पुढारीपण शाबूत ठेवण्याची कसरत करताना ते दिसतात. या नेत्यांचा नाकर्तेपणा आणि आरक्षण प्रश्नांची अक्षम्य हेळसांड या चक्रात धनगर आरक्षण चळवळ आपण भरकटत ठेवलेली आहे. 

            २०१८ साली पंढरपूरमध्ये धनगर जमातीचे उपोषण झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीसजी आपल्या सरकारने हायकोर्टात केस सुरू असतांना आपण धनगरांना एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा केल्याचे ऐकवत नाही. शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर याबाबत अंतिम सुनावणी होती. मात्र काही आदिवासी आमदारांच्या दबावामुळे आपल्या सरकारने या केसमधील सरकारी पक्षाचे महाअधिवक्ता यांनाच बदलले. त्यामुळे जाणीवपूर्वक ही सुनावणी पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. धनगर आरक्षणा विरूद्ध शिंदे - फडणवीस सरकार गेल्याने परिणामतः कोर्टाचा निर्णय धनगरांच्या विरूद्ध गेला हे सर्वश्रुत आहेच.

           लोकसंख्या जास्त असल्याने व एनटी या प्रवर्गासाठी सरकारने कोणतेही विशेष सामाजिक व आर्थिक तरतूद न केल्याने आजही ही जमात भटका समूह म्हणून राहिली आहे. शेळ्या - मेंढ्या पालन हा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. देशाच्या ७७ वर्षाच्या स्वातंत्रकाळात या समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, प्रशासनिक विकास झालेला नाही. राखीव मतदारसंघ नसल्याने आमदार व खासदार नाहीत. केंद्रात व राज्यात मंत्रिपद मिळत नाही. प्रशासनात अधिकारी नाहीत. त्यामुळे या जमातीची प्रगती झालेली नाही. राज्य सरकारने या समाजासाठी एक शेळीमेंढी विकास महामंडळ बनविले आहे. ज्यासाठी फक्त कामचलाऊ जेमतेम तरतूद केलेली आहे. धनगरांना अशा महमंडळावर नेमले की कर्तव्य पूर्ण केल्याचा असूरी आनंद मिळवायचा एवढाच हेतू या महामंडळाचा राहिलेला आहे.

               अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी न करणे, शेळ्या - मेंढ्यांची व त्यांच्या मांसाची परदेशात निर्यात न करणे, शेळ्या - मेंढ्यांच्या मांस निर्यातीचे प्रयत्न होताच जैन समाजानं जाणीवपूर्वक केलेल्या विरोधापुढे सरकारने नमते घेऊन सदर योजनाच गुंडाळणे, आपल्या सरकारने ती निर्यात थांबवून धनगरांचे उत्पन्न बुडवणे, शेळी - मेंढी पालनाला चालना न देणे, पशुधन विमा, मेंढपाळांना संरक्षण, शेळ्या-मेंढ्या चराईसाठी चराऊ कुरणं म्हणून गावरान व वनजमिनी राखीव न ठेवणे, शेळ्या - मेंढ्यांची खरेदी वजनावर न होणं, पशुपालक धनगरांच्या स्त्री - पुरूषांना उच्च जात दांडग्यांकडून मारहाण होणे, अर्वाच्च शिविगाळ होणे, स्त्रियांवर अत्याचार होणे, पशुपालन करतांना भटकंतीमुळे शिक्षणापासून बालकांना वंचित राहावे लागणे, धनगरांची जातनिहाय जनगणना न करणे, राखीव कुरणं नसणे, शासकीय सेवेतील पूर्णतः पदं न भरणे, अहमदनगर जिल्ह्याचे रितसर सर्वच विभागांत 'अहिल्याईनगर' असे नामांतर न करणे आदी कोणतेही प्रश्न आपल्या सरकारच्या काळात सोडवले गेले नाहीत. केवळ थातुरमातुर योजनांची घोषणा करून धनगरांच्या तोंडाला पानं पुसण्यापलीकडे आपण काहीही केले नाही हे जळजळीत वास्तव आहे.

 आदिवासी  ठरवण्यासाठी केंद्राने जे पाच निकष ठरवलेले आहेत. त्यानुसार धनगर समाज आदिवासी आहे हे ठरवता येते.

1) आदिम अंश असणे (Indications of primitive traits) हा निकष आहे. आदी मानवाच्या आदिम पशुपालन अवस्थेपासून हा समाज पशुपालक बणून राहिला. आर्यपूर्व काळापासून धनगर शेळीमेंढी पालनाचा निमभटका व्यवसाय करत आलेला. असे इंथोव्हन व रसेलने नोंदवून ठेवले आहे. आजही धनगर बव्हंशी तोच व्यवसाय करतात. धनगर हा शब्दही "धनाचे आगर" या अर्थाने संस्कृतमधून निघाला नसून अनार्य भाषिक शब्द आहे असे इंथोवन नोंदवतो.

2) वेगळी संस्कृती (Distinctive culture)- धनगरांच्या धर्मपरंपरा व प्रथा स्वतंत्र असून बिरोबा, खंडोबा, म्हसोबा, विठोबा या त्यांच्याच लोकदेवता आहेत. भंडारा, तळी भरणे वगैरे प्रथा ते आदिम काळापासून जपत आहेत. धनगरी ओव्या, गजानृत्य, सुंबरान हे त्यांचे स्वतंत्र सांस्कृतिक आविष्कार आहेत.

3) नगर (शहर) संस्कृतीपासून स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व (Geographical Isolation)- धनगर हे स्वतंत्र वाड्या वस्तीत राहतात. जनावरांच्या मलमूत्रांचा वास येतो म्हणून धनगरांचे वास्तव्य गांवाकुसापासून दूर वस्तीवाडे असतात. मेंढपाळीमुळे रानोमाळ, डोंगरकपाऱ्यांत त्यांना चाराईसाठी नागर जीवनापासून आजही या जमातीस दूर भटकत रहावे लागते.

4) बुजरेपणा (Shyness of contact with the community at large)- धनगर  सहजासहजी अन्य लोकात मिसळत नाहीत. लाजरे बुजरेपणा आजही त्यांच्यात दिसून येतो. या जमातीला शतकानुशतके 'मूक समाज' म्हणून ओळखले जाते. नागर जीवनापासून दूर व अलिप्त राहिल्याने त्याच्यात हे इतर आदिवासींप्रमाणेच गूणधर्म आहेत.

5) मागासपणा (Backwardness)- थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्यासह कालेलकर आयोगाने या समाजाला अतिमागास ठरवले आहे. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा कोणत्याही समाजशास्त्रज्ञ, जातीविषयक संशोधक व अभ्यासकांनी या समाजाला आदिवासीमध्ये टाकू नये असे म्हटलेले नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे. याचबरोबर याच निकषावरून बिहार, मध्यप्रदेश, यूपीमध्ये धनगर समाजाला एससीमध्ये टाकण्यात आले आहे. तर, आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये हा समाज एसटी प्रवर्गात आहे.

              या पाचही निकषात धनगर जमात बसत असून त्यांंना अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण देण्यासाठी आपण जाणीवपूर्वक चालढकल करत आलेले आहात. नव्हे आपण व आपला भाजप पक्ष या धनगर जमातीचा आरक्षणाच्या नावावर मतदान ऐटण्यासाठी वारंवार विश्वासघात करत आलेले आहात. आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राहूनही राज्यात व केंद्रात भाजपचे डबल इंजिनचे सरकार धनगर जमातींंनी भरघोष मतांनी निवडून दिल्यानंतरही केवळ खोट्या आश्वासनापलिकडे आपण धनगरांना काहीही देऊ शकलेले नाही. यावरून केंद्र व राज्यातील आपले सरकार अस्सल खोटारडे व जुमलेबाज आहे हे सिद्ध होते.

         स्वयंसेवक संघ हा सच्चे चारित्र्यवान व देशभक्त घडवणारी सांस्कृतिक संघटना असल्याचा प्रचार फार ऐकवात आहे. परंतु आपण व नरेंद्र मोदी दोघेही याच मुशीत घडलेले असतांना धनगर जमातीच्या आरक्षण प्रश्नावर आपल्या करणी व कथनीतील अंतर पाहता; संघ हा नरेंद्र व देवेंद्र यांच्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांवर खोटे बोलण्याचे संस्कारच तर करत नाही ना? असा प्रश्न धनगर जमातीपुढे पडलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बडबोले अस्सल खोटे बोलण्याचे व खोटे वचन देण्याचे, फसवणूक करण्याचे संस्कारक्षम प्रशिक्षणच आपल्या संघ शाखेत देतात की काय हे आपले वर्तन पाहता तसा धनगर जमातीचा विश्वास दृढ व्हायला लागलेला आहे.    

           खोट्या आश्वासनांच्या मोहात अडकलेल्या धनगरांचा केद्रातील व राज्यातील सत्तापिपासू कमळाबाईने पूर्ता भ्रमनिरास करत प्रेमभंग केलेला आहे. याची जाणीव झाल्याने या मोहमाशातून धनगर बाहेर पडतो आहे. येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत मतदानरूपी धनगरीकाठीचा मार कसा बसतो आणि किती खोल जखमा होतात याचा प्रत्यय निवडणूक निकालानंतर आपणास येईलच.

               अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धनगर समाजाचे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन प्रचंड ताकदिनीशी सुरू होते. धनगरांना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलनं झालीत. ही मागणी काही नविन नाही. धनगर जमातीवर गेली ७५ वर्षे झालेला अन्याय व या जमातीचे एवढी वर्षे झालेले सर्वांगिण नूकसान भरून न निघणारे आहे.

          आरक्षण अंमलबजावणीची आपण जाणिवपूर्वक टाळाटाळ करून वेळ मारून नेण्याचा नेटाने प्रयत्न केलेला आहे. नव्हे धनगर जमातीला त्यांचे मतदान लाटण्यासाठी फसविलेले आहे. हे सर्वात मोठा व श्रीमंत पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आपल्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अत्यंत अशोभनीय, लाजिरवाणी व निषेधार्य बाब आहे. महाराष्ट्रातील धनगर हा गेली दहा वर्षे बीजेपी पक्षाच्या बाजूने राहिल्याने केंद्रात  व राज्यात आपली सत्ता येऊ शकली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला एकहाती सत्तेपासून दूर राहावे लागले याचे कारण महाराष्ट्रातील धनगर आपल्या विरूद्ध गेले हेच याचे मूळ कारण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जेमतेम खासदार आपल्या पक्षाचे व युतीचे निवडून आले. हा धनगरांनी दिलेला जबरदस्त फटका होता हे विसरू नका.

         जेवतांना तोंडाला लोणचं लावावे  तसे फूले - शाहू - आंबेडकरांचे, जिजाऊ , अहिल्याई, सावित्रीआईचे नाव घेऊन सत्ता उपभोगणारे तूम्ही केवळ समतेची व न्यायाची कोरडी बतावणी करता. समरसतेच्या नावावर समता नाकारून विषमता जोपासता. त्यामूळेच आपण संविधानाची अंमलबजावणी करून धनगर जमातीला योग्य न्याय देवू शकले नाही.         

         कुठेही आंदोलन नाही, मोर्चे नाही, उपोषण नाही, मागणी नाही, तरीसुद्धा बसल्या जागेवर उच्चवर्णीय स्वजातीला EWS चे आरक्षण देतांना आपल्या भाजप सरकारने जी प्रचंड तत्परा दाखवली आणि धनगरांच्या आरक्षणाला जो दूजाभाव दाखवला यावरून आपली व आपल्या सरकारची जातियवादी मानसिकता किती भीषण आहे याची प्रचिती धनगरांना आलेली आहे. 

          सत्तेचा माज चडलेल्यांची नशा या भारतात फक्त आणि फक्त धनगरांनीच उतरवलेली आहे. आपण जरा इतिहासाचा अभ्यास करा आपल्या लक्षात येईल. अन्यायकारी नंद घराण्याचे साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य या धनगरानेच धुळीस मिळविले. युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा सम्राट अशोक धनगरच होते. मोघलसत्तेचा जूलूम महाराज मल्हारराव या धनगरानेच मोडून काढला.  अपराजित ब्रिटीशांना एक - दोनदा नव्हे तर तब्बल सलग अठरावेळा पराजित करून त्यांचे घमेंड तोडणारे तथा पेशवाईची त्यांच्याच घरात घूसून पळताभूई थोडी करणारे महाराज यशवंत होळकर धनगरच होते. पेशवाई तरली ती होळकरांशी मैत्री केल्यामुळेच आणि लयाला गेली ती होळकरांशी शत्रूत्व पत्करल्यामुळेच. चातुर्वर्ण्य, विषमता, धार्मिक शोषण या वैदिक धर्मीय मानसिकते विरूद्ध लढा उभारणारे पेरियार रामास्वामी नायकर हे धनगरच होते.

          एवढे वर्ष आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला सत्तेची सूत्रं दिलीत आणि तुम्ही धनगरांशी विश्वासघात केला पण आम्ही शांत राहलोत. धनगरांच्या चराऊ कूरणांना लाटून व भांडवलदारांना वाटून आमची अन्नान दशा केली तरी आम्ही निमूटपणे सहन केले. धनगर अनूसूचित जमातीच्या आरक्षणाचे हक्कदार असतांनाही तुम्ही आम्हास लाचार बनवले. महाराष्ट्रातून धनगर खासदार निवडून जाऊच नये या करीता तुम्ही अघोषीत संसदेची सीमाबंदी करून जातियवर्चस्वासाठी नेहमीच एकवटलेत. धनगर - आदिवासींमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून "फोडा आणि राज्य करा" या कपट नीतीचा अवलंब आपण केला. सत्ता मिळवण्याकरिता धनगरांना आपण पाहिजे तसे गुलामासारख्ये वापरून घेतले. आता या गुलामांना गुलामीची जाणीव झाल्यामुळे तो बंड करून उठेलेला आहे हे लक्षात असू द्या.

         तुमच्यावर विश्वास ठेवून दहा वर्षे सलग राज्यात व केंद्रात सत्ता दिली पण तुम्ही धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. आता घोंघावणाऱ्या धनगरांच्या पिवळ्या वादळाने बीजेपी युतीच्या पक्षांना राज्यातून २० नोव्हेंबर २०२४ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रचंड बहूमताने पराभूत करून सत्तेतून कायमचे हद्दपार करण्याची धनगरांनी प्रतिज्ञाच घेतलेली आहे. धनगर जमातीच्या असंतोषाचा ज्वालामुखीरूपी उद्रेक त्सूनामीचा कहर बणून भाजपा युतीला जलसमाधी दिल्याशिवाय राहणार नाही. अनूसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाच्या अनूषंगाने धनगरांसोबत आपण कूटनीतीपूर्ण जी खेळी खेळली त्याबद्दल आपला व आपल्या भाजप युती सरकारमधील दलांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

धनगर जमातीचे भाजपाने पाळलेले तितर कितीही उडाले, कितीही फिरले तरी तुम्हाला कायमचे घरी बसवणे हे एकच ध्येय धनगरांनी उरी बाळगलेले आहे हे लक्षात असू द्यावे. सलग दहा वर्ष सत्ता देऊनही तुम्ही आरक्षण अंमलबजावणी करू शकले नाही. यापुढे तुमचा खोटारडेपणा आम्ही धनगर ना सहन करणार नि ना खपवून घेणार. केंद्र व राज्यातील आपले हे कमळाबाईचे सरकार धनगर जमातीने प्रचंड मतदान करून निवडून आणले आहे. आता या तुमच्या सरकारने आरक्षणासंबंधी दिलेला शब्द व लेखी वचन पाळलेले नाही. त्यामुळे धनगर जमात आपल्या विरूद्ध उभी ठाकून पुढे पन्नास वर्षे आपणास आता राज्यात व पुढे केंद्रात सत्तेपासून दूर फेकल्याशिवाय राहणार नाही. "धनगर जसे सत्तेत आणू शकतात तसे ते सत्तेतून घालवूही शकतात!” महाराष्ट्रात लोकसंख्येने प्रथम क्रमांकावर असलेल्या या धनगर जमातीने पक्का निर्धार केलेला आहे हे सुध्दा कायम लक्षात असू द्या.

             या आधी मी २०१४ मध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मान. पृथ्वीराजजी चव्हाण व राष्ट्रवादीचे अध्यक्ष मान. शरदचंद्रजी पवार यांनाही खुले पत्र लिहिलेले होते. आता दहा वर्षानंतर आपली पाळी आली आहे. म्हणून भाजप विरोधी असा शिक्का व सूर आळवण्यापूर्वी हे सुध्दा आपण लक्षात घ्यावे. उगीच विरोधाभास होऊ नये याकरिताच हे सांगणे आहे. 


तूर्तास एवढेच.


आपला विश्वासू

भारतीय धनगर मतदार,

होमेश भुजाडे,

नागपूर

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...