विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव होईल : महादेव जानकर
पंढरपूर (८/११/२०२४) : भाजप महाबोगस पार्टी आहे. जनतेचा राग भाजपवर आहे. निवडणूकीत भाजपचा पाडाव होईल, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. भाजपला पर्याय दिल्याशिवाय शेतकरी कष्टकरी वंचित, महिला, तरुण वर्गाला चांगले दिवस येणार नाहीत, अशा शब्दात महादेव जानकर यांनी निशाणा साधला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पंकज देवकाते यांच्या प्रचाराचा शुभारंभ महादेव जानकर यांच्याहस्ते करण्यात आला. बहुजन राष्ट्रीय समाजाचे दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन महादेव जानकर यांनी संत नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले, भाजपने सत्तेच्या जोरावर राजकीय पक्ष फोडले, घर फोडले काका पुतण्यात फूट पाडले हे सर्व कटकारस्थान कोण करतय हे जनतेला माहित आहे. इतकेच नव्हे तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि चिन्ह पळवले. या सर्व षडयंत्र मागे किंगमेकर कोण आहे हे जनतेला ठाऊक असल्याने भाजपवर जनतेचा राग आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा राग दिसून येईल व भाजपचा पाडाव होईल, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment