चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला 'टोल कर माफ व्हावे' यासाठी आंदोलन छेडणारा महादेव जानकर यांचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड
कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्कादेवी यात्रेसाठी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने जातात. विशेषता माणदेशी जनतेत चिंचणी मायाका यात्रा लोकप्रिय आहे. मायाक्का देवी आणि भक्ताचे नातेही अतूट आहे. सामान्य माणसांची, मेंढपाळांची देवी अशी मायाक्का देवीची ख्याती आहे. कृष्णा कोयना नदी काठावर मेंढ्यामागे फिरणारा मेंढपाळ समूहातील मुलांनी गिरणी कामगार म्हणून, पुढे माथाडी कामगार, रिक्षा ड्रायव्हर, रंग कामगार यासाठी मुंबईची वाट धरली. रानोमाळ स्वच्छ मोकळा श्वास घेणारा मेंढपाळ मुंबईत गुदमरलेला श्वास घेऊन जगायला लागला. त्यामुळे प्रत्येकाला गावाची ओढ असते, पण गावी जायचं तर ते निमित्त असतं यात्रेचे, देवधर्माचे. माघ पौर्णिमेला चिंचणी मायाक्काची यात्रा भरते. या यात्रेला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोणी गावावरून यात्रेला जातात तर कोणी मुंबईवरून थेट चिंचणीला जातात. मुंबईवरून जाणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशोक गलंडे हे मुंबईत पवई येथे राहत होते. अशोक गलंडे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते. महादेव जानकर यांना ते आपले नेता मानत होते. अशोक गलंडे यांना राष्ट्रीय समाज पक्षात 'गलंडे मामा' या नावाने ओळखले जायचे. चिंचणी मायाका यात्रेसाठी भाविक भक्तांना मोठा खर्च येतो. लोकांची यात्रा कमी खर्चात व्हावी, आनंदात व्हावी, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आपल्याला काही करता येईल का? असा त्यांनी विचार केला, यात्रा मार्गावर महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात टोल द्यावा लागतो. टोलचा खर्च वाचला तर यात्रेकरूंवर आर्थिक ताण येणार नाही. यासाठी अशोक गलंडे यांनी रासपचे राष्ट्रीय नेते महादेवजी जानकर यांच्या परवानगीने टोल कर माफीचे आंदोलन छेडन्याचा निर्णय घेतला. महादेव जानकर यांनीही तसा शासनाकडे पत्रव्यवहार केला.
आंदोलन करायचे म्हटले तर लोक रस्त्यावर आले पाहिजेत. टोल नाका बंद पाडला पाहिजे. आंदोलन यशस्वी झाले पाहिजे. आंदोलन दिवसा होणार नव्हते तर रात्रीचे होणार होते. चिंचणी मायाका यात्रेसाठी भक्त रात्रीच निघतात. गलांडे मामा यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याचे ठरवले. ठिकठिकाणी टोल नाक्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर झोपले. पोलिसांनी आपले बळ वापरून कार्यकर्त्यावर लाटीचार्ज करण्यास सुरू केले. काही कार्यकर्ते पोलीस बळाला घाबरले. रस्त्यावर आडवे होऊन आंदोलन करणारे आरपीआयचे कार्यकर्ते रासपच्या आंदोलनात सामील होते, टोल कर माफ झाल्याशिवाय इथून हटायचं नाही असा निर्धार पक्का केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेदेखील रस्त्यावरून तुसभर बाजूला झाले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी टोल प्रशासनाला ठणकावले, रात्रीचे बारा वाजतातयत. तुम्ही वीनाविलंब यात्रेकरूंची वाहने टोल न घेता सोडून द्या, अन्यथा आंदोलन हाताबाहेर जाऊ शकते. मुंबईतील ठीक ठीकाणच्या टोल नाक्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन पार पडले. महादेव जानकर यांच्या एका फोनवर चिंचणी मायाका यात्रेसाठीचा टोल कर माफ करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा लावलेल्या वाहनास चिंचणी मायाका यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रात टोल माफ करण्यात आला.
टोल कर माफीसाठी आंदोलन छेडणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. गलांडे मामा यांना ९ हजार रुपये पेन्शन मिळायची. त्यातील दोन हजार रुपये राष्ट्रीय समाज पक्षासाठी ते राखून ठेवायचे. महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्ष याविषयी लोकांना ते भरभरून बोलायचे सांगायचे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी माढा लोकसभा लढवावी, असा त्यांचा आग्रह होता. माण विधानसभा मतदारसंघात मोजके कार्यकर्तेना सोबत घेऊन जनसंपर्क दौराही केला होता. एका दिवाळीला 'समाजाची दशा व दिशा' असे पत्रक काढून डॉ. घुटुकडे यांच्यासोबत त्यांनी गावोगाव वाटले होते. मुंबई महानगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते मुंबईला गेले होते.
राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप बरोबर युती करणे, हे गलंडे मामा यांना आवडले नाही. ते राष्ट्रीय समाज पक्षापासून दुरावले आणि बसपाशी जवळीक साधली. चळवळ आणि राजकीय तडजोड वेगळी असते, याचे बाळकडू रासप कार्यकर्त्याना नसल्याने पक्षाचे नुकसानही झाले. 2024 च्या विधानसभेत महादेव जानकर यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून भाजप पासून फारकत घेतली. गलांडे मामा यांच्यासारखे पक्ष व नेतृत्वाला जपणारे कार्यकर्ते तयार होतील का? हा प्रश्न आहे.
गलंडे मामा मुळचे पुळकोटी, तालुका माण जिल्हा सातारा येथील रहिवाशी. म्हसवड परिसरात ते वावरायचे. माणदेशातील शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता माण देशातील प्रस्थापित व्यवस्थेला शह देण्यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करणारा एक लढवय्या शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी हरपला. गलंडे मामा यांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!
शोकाकुल : आबासो पुकळे व यशवंत नायक परिवार.
No comments:
Post a Comment