आसामध्ये दीर्घ काळ प्रचारक राहिलेले “श्री सुभाष जी सरवटे”यांचे पाच डिसेंबर ला नागपूर च्या मुख्य संघ कार्यालयात निधन झाले. त्यांच्या भाच्याने म्हणजेच श्रीराम लाखे जी यांनी लिहिलेला लेख..👇
“सुभाष सरवटे... नाही चिरा नाही पणती...”
५ डिसेंबरला सुभाष मामा गेल्याची बातमी आली. त्यानी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसं पाहिलं तर त्यानी आपला देह राष्ट्राला १९७० साली, म्हणजे जेव्हा त्यानी रिझर्व बँकेची नोकरी सोडून आसामला संघाचा प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच अर्पण केला होता आणि तेही "बुद्ध्याचि वाण धरिले...." प्रमाणे. सख्खा मामा असला तरी त्याचा आणि माझा संबंध फारसा आला नाही, कारण तो आसामला गेला तेव्हा मी तीन ते चार वर्षांचा असेल. लहानपणापासून त्याच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असायची. माझी त्याच्याशी ओळख ही अप्रत्यक्षपणे आई आणि आजी त्याच्याबद्दल जे बोलायच्या त्या माध्यमातून झाली.माझी पहाडासारखी ताठ आणि कणखर आजी त्याच्या आठवणीने मात्र कातर झालेली मी बघितली होती. त्याच्याशी गप्पा मारण्या इतपत धारिष्ट यायला मला वयाची पस्तिशी गाठावी लागली. लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्याला जेव्हाही बघितलं तो एकटा असला की वाचनात गर्क असायचा. त्याचं वाचन प्रचंड होतं आमची आई आणि मामाच्या सांगण्यानुसार त्याला वाचनाला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, अगदी आपल्या भावंडांच्या शालेय पुस्तकांपासून ते गीता उपनिषद, इतिहास, क्रीडा सर्वांगीण वाचन होतं. टेनिस, फुटबॉल, क्रिकेट कबड्डी सर्वच खेळांचा अभ्यास होता. तिथले सर्व रेकॉर्ड्स तोंडपाठ होते. ब्रिज कबड्डी कॅरम आणि क्रिकेट तर तो छानच खेळायचा. घोषामध्ये असताना तो बरीच वाद्य वाजवत असे.नागपूर घोष कार्यवाह म्हणूनही काही दिवस त्याच्याकडे जवाबदारी होती. गणित आणि ज्योतिष त्याचे आवडते विषय होते. ज्योतिषशास्त्राचा तर त्याचा फार चांगला अभ्यास होता. राज्यक्रांतीचे इतिहास पाठ आणि या सर्व वाचनाला जोड मिळाली भाषांची. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, बांगला, उडिया, भोजपुरी या सर्व भाषा त्याला लिहिता वाचता आणि बोलता यायच्या ही माझी माहिती. याव्यतिरिक्त आणखीन कुठल्या भाषा असतील तर मला कल्पना नाही. याव्यतिरिक्त त्याचं वेगळेपण अधोरेखित करणारे बरेच गुण त्याच्यात होते त्यातील एक म्हणजे तो दोन्ही हाताने लिहायचा.
त्याच्याशी बोलताना त्यानी एकदा सांगितलं की आसाम हा एकमेव प्रदेश असा आहे की जो कधीच कुणाच्या गुलामगिरीत गेला नाही. आसामवर त्याचं फार प्रेम होतं तिथलीच दिनचर्या तो शेवटपर्यंत जगत होता (म्हणजे सकाळी तीन वाजता उठणे आणि संध्याकाळी सात ते साडेसात पर्यंत झोपी जाणे.) असं श्री.अजयजी जलतारे यांनी शेवटच्या भाषणात सांगितलं. आसामवर फारशी पुस्तके नाहीत किंवा फार माहिती देखील उपलब्ध नाही. सुभाष मामाने आसामचा संपूर्ण इतिहास लिहून काढला त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्याला झालेल्या फोडांमुळे बसता सुद्धा येत नसताना देखील आठ आठ तास उभे राहून ते लिखाण त्यानं पूर्ण केलं. हे हस्तलिखित जेव्हा त्यानी बाबासाहेब पुरंदरेंना दाखवलं तेव्हा बाबासाहेब म्हणाले सुभाषराव फार सुंदर आणि मोठं काम केलत.
रोज अंघोळ झाल्यावर न चुकता गीतेचा नववा अध्याय आणि सुंदर कांड म्हणायचा. कुणाही कडे अंत्य दर्शनाला गेल्यावर एका कोपऱ्यात बसून गीतेचा पंधरावा अध्याय एकटाच म्हणायचा. रुग्ण सेवा करण्याकरता एक वेगळीच मानसिकता आणि धीर लागतो हे गुण त्याच्यामध्ये पुरेपूर होते, लोकांनी त्याचा अनुभव देखील घेतला असेल. आमच्या आजीच्या शेवटच्या आजारपणात त्यानी तिची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. तिच्या औषधांचा टाईम टेबल, तिचं दर तासाला टेंपरेचर आणि इतर सर्व माहिती इतकी सुंदर रेकॉर्ड करून ठेवली होती की ते बघून डॉक्टर सुद्धा थक्क झाले.
बिहारमध्ये प्रचारक असताना तो आजारी पडला. अगदी सुरुवातीचे दिवस होते. ओळखी फारशा नव्हत्या. फोन नव्हते आणि सुभाष मामा औषध घेणं टाळायचा. तेव्हा त्याच्या खोली जवळ आवळ्याचे झाड होते. तेव्हा जवळजवळ दोन महिने तो नुसत्या आवळ्यांवर जगला.
सुभाष मामा १९६६ ला रिझर्व बँकेत रुजू झाला आणि १९७० साली लहान मामाला नोकरी लागल्यावर त्याने रिझर्व बँकेचा राजीनामा देऊन प्रचारक जाण्याचा निर्णय घेतला.या चार वर्षाच्या कालखंडात दोन घटना त्याचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या घडल्या. त्या म्हणजे रिझर्व बँकेच्या इंटरव्यू मध्ये त्याला जे प्रश्न विचारण्यात आले त्यात आई-वडिलांची माहिती विचारली. वडील नाहीत हे सांगितल्यावर तुमचं पालनपोषण कोणी केलं? हा प्रश्न आला. त्यावर मामानी उत्तर दिलं. माझ्या आजोबांनी. आजोबा कोण ते काय करतात? तेव्हा सुभाष मामानी आजोबा *माधवराव गोळवलकर* आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक आहेत असे स्पष्ट सांगितलं. तुम्ही संघात जाता का? या प्रश्नाला देखील होय उत्तर दिल. नंतर नोकरी देखील मिळाली. पण इंटरव्यू देऊन घरी आल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी वेड्यात काढलं की तू संघाचं नाव टाळायला हवं होतं. कारण घरची परिस्थिती बेताची होती नोकरीची गरज होती आणि तो काळ संघाला अतिशय प्रतिकूल होता. नुसतं संघात जातो म्हटलं तरी लोकांच्या नजरा बदलायच्या. पण सुभाष मामानी घरच्यांना स्पष्ट सांगितलं माझ्या आजोबांनी माझं पालन पोषण केलं ते मी का लपवायचं? जे खरं आहे ते सांगितलं. हेच धोरण त्यानी आयुष्यभर राबवलं. कधी त्याचा त्याला तर कधी सोबत्यांनादेखील त्रास झाला.
दुसरा अनुभव असा की सुभाष मामा रिझर्व बँकेत ज्या विभागात काम करत होता त्या विभागाची एन्क्वायरी झाली, ज्या करता खुद्द गव्हर्नर नागपूरला आले होते. जेव्हा त्यांनी सर्व कागदपत्र फाइल्स चेक केल्या तेव्हा त्यांनी विचारलं की 'हे सगळं डॉक्युमेंटेशन कोणी केलं?'. तेव्हा सुभाष मामाने, 'ते मीच केलंय' म्हणून सांगितलं. त्यावर गव्हर्नर म्हणाले तुमचं काम अप्रतिम आहे आणि तुमची जागा इथे नाही. मी तुम्हाला मुंबईला घेऊन चालतो. त्यावर सुभाष मामाने त्यांना सांगितलं की काही दिवसातच मी ही नोकरी सोडून संघाचा प्रचारक म्हणून जाणार आहे. *त्यावेळी संघाबद्दल फारशी माहिती नसलेले ते गव्हर्नर सुभाष मामाला एवढेच म्हणाले की मला संघाबद्दल माहिती नाही पण मला एवढंच जाणवतं की तुम्ही जिथे जात आहात ती निश्चितच रिझर्व बँकेपेक्षा चांगली जागा असावी.*
खऱ्या अर्थाने प्रसिद्धी परांगमुख असं हे व्यक्तिमत्व होतं पैसा आणि प्रसिद्धी यापासून नेहमीच दूर राहिलेलं. कधीही फोटो काढून घेतला नाही आश्चर्य वाटेल पण त्याच्या निधनाची वार्ता पेपर मध्ये देताना त्याचा फोटो शोधावा लागला. घरच्या समारंभात देखील तो फोटो काढू द्यायचा नाही. वयाच्या आठव्या वर्षी त्याची मुंज झाली त्यानंतर त्याच्याकरता असा कुठलाही समारंभ झाला नाही. आजच्या जगात त्याचं वागणं किंवा असं असणं हे कल्पने बाहेरचं वाटतं. शेवटच्या दिवसात तो अतिशय अशक्त झाला होता आवाज पण क्षीण झाला होता पण कधीही आपल्या तब्येतीबद्दल किंवा वैयक्तिक त्रासाबद्दल तक्रार त्यानं केलेली आम्ही ऐकली नाही. शेवटचे दोन दिवस त्यानी अन्न त्याग केला होता. जाण्याच्या एक दिवस आधी परमपूजनीय सरसंघचालक त्याला भेटायला गेले. त्यांच्या हातून वरणाचं पाणी प्यायला आणि दुसऱ्या दिवशी मोहनजी प्रवासाला निघण्यापूर्वी त्याने प्राण सोडले. मला वाटतं एका निष्ठावान स्वयंसेवकाच्या आयुष्याचा शेवट यापेक्षा चांगला काय असू शकतो? ज्या कार्याकरता आयुष्य समर्पित केलं, जे कार्यालय त्याचं श्रद्धास्थान होतं तिथे परमपूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघून गेला. एक वारकरी संघाच्या पंढरीत वैकुंठवासी झाला.🙏🏽
-श्रीराम लाखे.
*हा आहे संघ! निष्काम व प्रसिद्धीची हॊस नसलेल्या लोकांच्या त्यागामुळे आज आपल्या देशाची स्थिती भक्कम होत आहे. आम्ही सदैव ॠणी व नतमस्तक आहोत आणि कायम राहणार.🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment