महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) जयंती निमित्त
#yashvantraoholkar #jayanti #freedomfighter #british #svatantryyodhhe #svatantryladha #maharajayashvantraoholkar #homeshbhujade
( जन्म : ३ डिसेंबर १७७६ मृत्यू : २८आक्टोबर १८११)
------------------------------------------
आद्य स्वातंत्र्यवीर राजे यशवंत हे श्रीमंत तुकोजी ( प्रथम) यांचे सुपुत्र होय. त्यांचा जन्म ३ डिसे. १७७६ रोजी झाला. त्यांचे सबंध आयुष्य सतत घोड्यावर बसून युद्ध करण्यातच गेले. तसे पाहता ते होळकर रियासतीचे हक्कपद वारीस ठरत नव्हते. परंतु काशीराव सारख्या खर्या वारसांनी पेशवे व शिंदे यांच्या हातचे बाहूले बनून जे राज्य नाशाप्रत आणले होते. त्याची पुनर्रचना करून त्याची निट घडी बसवणे आद्यकर्तव्य होते.
त्यांना लाडाबाई व केशरबाई उर्फ केसराबाई उर्फ कृष्णाबाई आणि तुळसाबाई अशा तीन पत्नी होत्या. माँ साहेब तुळसाबाईंच्या आदर्श व श्रध्दास्थान अहिल्याई होत्या . त्यांनी कौशल्यपूर्ण प्रशासकिय बौद्धिक चातुर्याने महाराजांना अनेकदा योग्य वेळी सल्ला दिला . वेळोवेळी सहकार्य केले. महाराजांच्या अनुपस्थितीत होळकर राज्याची मोठ्या कुशलतेने सूत्र सांभाळलीत. योग्य व्यवस्था लावली. अहिल्याई ह्या त्यांच्या प्रेरणास्थान असल्यामुळेच राजे यशवंत यांच्या सांगण्यावरून त्यांनी माहेश्वर येथे त्यांची छत्री (स्मारक) उभारली. हे स्मारक यंशवंतरावांच्या कल्पकतेचा व शिल्पकलेचा अद्वितीय नमुना होय. याशिवाय त्यांनी वडिल राजे तुकोजी व बंधू विठोजी यांच्याही पुणे येथे छत्र्या बाधल्यात.
राजे यशवंत हे भारताचे अद्वितीय स्वातंत्र्यवीर होय. त्यांचा जीवनप्रवास अतिशय रोमहर्षक आहे. त्यांच्यावर वादळासारखी एकामागोमाग एक अशी कितीतरी संकटं आलीत. परंतू त्यांच्यात असणारा औदार्य, दुर्दम्य आशावाद व आत्मविश्वास, परधर्म सहिष्णुता , अफाट नेतृत्व क्षमता, पराकोटीचे युद्ध कौशल्य, प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची जिगरबाज वृत्ती, स्वार्थत्याग, माणसाची अचूक पारख, कर्तव्यदक्षता, स्वराज्य व देशाभिमान या गुणांमुळे त्यांनी स्वकियांशी आणि परकियांशी युद्धाचा केलेला झंझावात भारतीयांच्या व जगाच्या चिरकाल स्मरणात राहील असा आहे. दौलतराव शिंदे व बाजीराव पेशव्यांनी गिळंकृत केलेले होळकराचे प्रांत राजे यशवंत यांनी स्वतःच्या हिंमतीवर पुन्हा मिळवीले. होळकर साम्राज्याची नव्याने पायाभरणी केली.
"मराठेशाहीच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या पडत्या काळात यशवंतराव. होळकर हा मोठा हिराच अल्पकाल चमकून गेला आणि त्या हिर्याने आपल्या तेजाने त्या कालांतील निबिड अंधार किंचित काल दूर सारिला. त्याचवेळी त्याच्या तोडिचा सेनानायक मराठ्यांकडे दुसरा कोणी नव्हता. अंतकरणाचा उदार, गरिबांचा कनवाळू , हाताखालच्या मंडळीस जिवापाड जपणारा, स्वतःच्या मुखाविषयी अत्यंत निरिच्छ, पण समरांगणी कर्दनकाळ असे यशवंतरावांसारखे पुरूष आपल्या इतिहासात कितीसे दाखवता येतील " गो. स. सरदेसाई यांचे हे विश्लेषण यथार्थ असून महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे आहे. तद्वतच त्यांचे ऐतेहासिक अद्वितीय महत्त्वही त्यांनी अधोरेखीत केलेले आहे.
राजे यशवंत हे अतिशय महापराक्रमी व लढवय्ये योद्धे होते. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारताला मुक्त. करण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. ते इंग्रजांचे केवळ शत्रुच नव्हे तर कर्दनकाळ ठरलेले होते. त्यांनी इंग्रजांच्या बलाढ्य सेनेस सलग 18 वेळा पराभूत करून धुळ चारली. अजेय ठरत ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले.
यशवंतरावांच्या काळात त्यांचे चारही बाजूने स्वकीय व परकीय अनेक शत्रू होते. सर्वसामान्यांना तथा हिन, दिन, दलितांना राजे यशवंत आपलेसे वाटत असल्यामुळे बिकट प्रसंगी त्यांना याच वर्गाकडून साथ मिळाली. विशाल सैन्यबळ उभारले. बुडणारी होळकरशाही तारली. इंग्रजांच्या बेबंदशाहीला लगाम घालून अजेय ठरलेला एकमेव भारतरत्न नावाप्रमाणे सार्थकता ठरविणारा 'यशवंत' होय.
राजपुतांवर मराठी व मोघल सत्तांनी खंडणी लादली. तेव्हा ती भरपाई करतांना त्यांचा कोषागार रिता झाला. राज्यात आर्थिक टंचाई निर्माण झाली. त्यांच्या राज्यातील मंदिरात अमाप संपत्ती असतांना सुद्धा ना पुजारी मदतीला पुढे आलेत, ना राजपूत राजांना मंदिरातील पैसा अडचणीच्या काळात वापरावासा वाटला. शेवटी राजस्त्रियांचे अलंकार उतरवून राजपूतांना खंडणीची भरपाई करावी लागली.
परंतू राजे यशवंत यांनी इंग्रजाविरूद्ध लढा उभारतांना आर्थिक टंचाईची भरपाई करण्याकरिता मंदिरातील संपत्तीचा उपयोग करण्यासही मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी देवापेक्षा देश श्रेष्ठ मानला. म्हणून ते हे करण्याचे धाडस करू शकलेत.
आज भारतात सर्वात जास्त कुपोषित, दारिद्री, बेघर, बेरोजगार, भूमिहीन, आत्महत्या करणारे अल्पभूधारक शेतकरी हे सबंध मोठ्या प्रमाणात हिंदूच आहेत. शासनाला आजपर्यंत मंदिरातील अमाप पैसा निरूपयोगी पडून असतांना तो हिंदुच्याच प्रगतीसाठी, विकासासाठी वापरावसा का वाटू नये? हे सबंध करण्यासाठी राजे यशवंत सारखा जिगरबाज सिना असावा लागतो.
राजा म्हणून लोकमान्यता प्राप्त करण्याकरिता तेंव्हा वैदिक पद्धतीने राज्यभिषेक करून घ्यावा लागत असे. म्हणूनच छत्रपती शिवरायांनाही तो करावा लागला होता. छ. शिवाजी नंतर वैदिक पद्धतीने राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा यशवंत होय.
महाराजांनी ब्रटिशांविरूद्ध दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही. भारतातील सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख आपल्या पोवाड्यात म्हणतात --
" करिन रक्तबंबाळ देश ब्रिटीशांनो तुमचा
भारतभूच्या तसू तसूवर हक्क फक्त अमुचा ।।
फंदफितूरी बंद करा अन् या मैदानाला
मेल्या आईचं दूध होळकर नाही हो प्याला ।।
नेपोलीयन युरोपात 'ह्यो होळकर ' हिकडं
अडकित्यातली जशी सुपारी करू तुकडं तुकडं ।।
राजे यशवंत याच्या अंगी असणारी जाज्वल देशभक्ती, देश स्वतंत्र करण्याची तळमळ आणि नेपोलियन बोनापार्ट यांच्याशी तुलना करत महाराजांची प्रगट केलेली शुरवीरता या बाबी शाहीर अमर शेख यांनी नेमक्या शब्दात टिपलेल्या आहेत.
राजे यशवंत यांच्या तडफत्या समशेरीचे पाणी ब्रिटीशांसह बलाढ्य म्हणवून घेणाऱ्या अनेक संस्थानिकांनीही चाखलेले होते. त्यामुळे महाराजांचे साधे नावही उच्चारले तरी शत्रुचा थरकाप उडायचा.एवढी जरब त्यांची होती.
ब्रिटीशांनी भारत मातेला गुलामीच्या साखळ दंडाने जखडलेले होते. त्यातून मुक्त करण्यासाठी महाराजांनी जी रणधुमाळी माजवली तसे इतर संस्थानिकांना जमले नाही. नव्हे ती जिगरबाज वृत्ती त्यांनी दाखवलीच नाही.
भारतातील बहुतांश संस्थानिकांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करलेले होते. ते त्यांनी झुंगारून द्यावे आणि स्वातंत्र्य लढ्यात सामिल व्हावे. भारतातून ब्रिटीशांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सामुहिकपणे लढा उभारावा. अशी डरकाळी फोडून राजे यशवंत यांनी स्वातंत्र्य समराची आर्त हाक दिली. पण त्यांना कोणत्याही भारतीय संस्थानिकांनी प्रतिसाद दिला नाही. हे भारतीय इतिहासाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
महाराजांच्या हाकेला इतरांनी साद घातली असती तर भारत केव्हाच स्वतंत्र झाला असता. स्वतःस हिंदू धर्मीय म्हणवून घेणारे भारतातील संस्थानिक हे राजे यशवंत यांना ब्रिटीशांविरूद्ध देशास स्वतंत्र करण्याकरिता सहकार्य करीत नाहीत; हे बघून महाराजांनी हिंदू धर्माचा त्याग करून शीख वा मुस्लीम धर्म स्वीकारण्याची घोषणा केली; ती केवळ इंग्रजांविरूद्ध इतर धर्मीय संस्थानिकांचे सहकार्य मिळविण्यासाठी. मुस्लीम व शीख धर्मीय धर्मगुरू व मुस्लीम बादशहा तथा शिख राजा रणजितसिंग यांनी महाराजांच्या धर्म परिवर्तनाचे स्वागत केले. परंतु ब्रिटीशांविरूद्ध सहकार्य करण्याचे नाकारले. हिंदू, मुस्लीम व शीख या धर्माच्या संस्थानिकांना देशप्रेमापेक्षा धर्मप्रेम मोठे वाटत होते.
भारतातून ब्रिटीशांना हाकलून लावण्याकरिता इतर धर्मीय राजांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी राजे यशवंत यांनी स्वधर्म त्यागाची केलेली घोषणा ही धर्मापेक्षा देश श्रेष्ठ आहे हे दर्शविते. देशापेक्षा स्वधर्मास श्रेष्ठ ठरविणाऱ्या व मानणाऱ्या धर्ममार्तंडांनी राजे यशवंत यांच्या पासून बोध घ्यावा.
न.र.फाटक राजे यशवंत बद्दल म्हणतात,
"लाथ मारिन तेथे पाणी काढीन अशा कर्तबगारीचा पुरूष जसा वागेल तसाच महाराजांचा वर्तनक्रम या काळात दिसतो. महाराज लढाई करीत होते सगळ्या स्वराज्यासाठी, - एकट्या होळकरशाहीसाठी नव्हे. - त्यांनी यासाठीच हत्यार उपसले होते. त्यांच्या अनेक पत्रांतून ' स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी आपण साऱ्या देशाला रणांगणाचे रूप दिले आहे.' अशा भावना दृष्टिस पडते. हे शब्द भोसल्यांनी देखील वापरले आहे. कदाचित ती महाराजांची उसनावारीही असेल. या शब्दाचा वापर भोसल्यांनी फक्त लेखणीने केला. त्यांना तलवारीचे पाठबळ मात्र पुरवू शकले नाही. महाराज व पेशवाईंचे तत्कालीन घटक सरदार यांचातला हा फरक लक्षात घेऊनच महाराजांच्या कर्तृत्वाचे परीक्षण केल्याशिवाय महाराजांना न्याय मिळण्याची आशा नको --- महाराज हे इंग्रजांसारख्या सेनाबलाढ्यालासुद्धा खडे चारू शकणारा युद्धकुशल वीरपुरूष, अशी त्यांनी देशभर ख्याती संपादली." (मराठेशाहीचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर, पृ. क्र. ९१)
शिंदे - भोसले - पेशवे - होळकर व तत्सम मराठी सत्तेच्या सर्व सरदारांनी आपसी मतभेद विसरून फिरंग्यांना देशाबाहेर घालविण्यासाठी एकजुुटिने प्रयत्न करावे असे महाराज वारंवार निक्षून सांगत होते. परंतू मराठी सत्तेचे सर्व सुत्रधार हात गंडाळून बसलेत. महाराज यशवंत हे इंग्रजांशी एकाकी झुंजत असतांना हे सर्व सत्ताधीश हे केवळ झुंज पाहत होते.
राजे यशवंत यांना इंग्रजांशी लढण्यापेक्षा इतर संस्थानांचा भाग काबिज करून होळकर व पर्यायाने मराठी साम्राज्याचा विस्तार सहज करता आला असता. पण त्यांनी देशास महत्त्वाचे मानले.
होळकर रियासतीचा सास्कृतिक इतिहास लिहितांना गणेश मतकर म्हणतात , " मराठी इतिहासात त्याचा झालेला आकस्मिक. उदय , त्यानं उमटवलेला ठसा आणि अजिंक्य समजल्या गेलेल्या फौजांना त्यानं शिकवलेला धडा हे पाहिले की नेपोलियनची आठवण होते. योगायोग असा की नेपोलियन व यशवंतराव हे समकालीन होते आणि दोघांनीही एकाच शत्रूला तोंड दिले." ( पृष्ठ क्र. १६४ )
राजे यशवंतरावांचे जाज्वल राष्ट्रप्रेम व इग्रजांचा धोका इतरांना ओळखता आला नाही. इतरांच्या सहकार्याची वाट न पाहता, ना उमेद न होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांविरूद्ध राजे यशवंत यांनी झूंज दिली. इंग्रजांविरूद्ध स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी भानापूर येथे तोफा व दारूगोळा बनवण्याचा कारखानाच काढला होता. काही काळासाठी भानापूरास होळकर संस्थानाची राजधानी बनवली. कर्नल मान्सम सारख्या बलाढ्य इंग्रज सेनापतीची भंबेरी उडवली.
ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ यांनी सुद्धा राजे यशवंत यांची मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे . महाराजांचे मराठी शिवाय फार्शी भाषेवरही प्रभुत्व होते. सैनिकांची मनं आकर्षित करून घेण्याची कला त्यांनी साधली होती असे ते म्हणतात .
" शिपायांनी कुशलते मार्ग स्वधर्म आणि स्वराज्य या संबंधाचा जीव ओवाळून टाकणारा अभिमान होता. ' स्वातंत्र्य ' हा शब्द तेव्हा अपरिचित होता. ' स्वधर्म ' आणि ' स्वराज ' या दोन शब्दांनी यशवंतराव आपली मराठेशाहीच्या स्वातंत्र्याची तळमळ व्यक्त करीत इंग्रजांशी चालविलेले युद्ध या तळमळीची साक्ष देणारे आहे. यशवंतरावांना मराठेशाहीतील स्वातंत्र्यवीर समजायचे ते याचसाठी ...... ते नेहमी म्हणत , " मी घोड्यावर असेपर्यंत. होळकरशाहीच नव्हे तर सारे जग माझेच आहे." शेवटी त्यांना होळकरशाही मिळाली पण इंग्रजांना जिकण्यासाठी आणि त्यांना देशातून हाकून लावण्यासाठी आग्रह सफल व्हावा म्हणून इंदूरहून दूर अशा भानापूरा या गावी त्यांनी तोफांचा कारखाना उघडला. मोठाल्या तोफा व तसेच गोळे तयार करण्याच्या उद्योगात चूर असता त्यांची प्रकृति ढासळली आणि वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले." डॉ. गणेश मतकरांचे हे विधान महाराज यशवंत यांच्या वास्तव लढ्यावर प्रकाश टाकणारे आहे. (मतकर महाराजांच्या जन्म इ.स. बद्दल साशंक असल्यामुळे ते ३४ वर्ष धरतात.)
भारतात इंग्रजांचा नशा फक्त यशवंतरावांनीच उतरवली. शेवटपर्यंत इंग्रजांचा तैनाती फौजेचा करार न स्वीकारता आपले स्वातंत्र्य अबाधित राखले. कमी वयात लढणाऱ्या या युद्धकुशल महायोध्याने, या स्वातंत्र्यवीराने अवघ्या ३५ व्या वर्षी ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर असतांना ऐन तारुण्यात २८ आक्टोबर १८११ मध्ये भानापूर येथे एकाकी देह त्यागला.
भानपूर येथे महाराजांची भव्य छत्री माँसाहेब कृष्णाबाई व तुळसाबाई यांनी उभारलेली आहे. महाराजांचे नित्य स्मरण करण्यासाठी भानापूरवाशी बिगुरू वाजवून सलामी देतात. तसेच दर रविवारी राजे यशवंतराव यांची प्रतिमा असलेल्या पालखीची मिरवणूक काढतात अशी माहिती डॉ. मतकर यांनी त्यांच्या 'होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास' या ग्रंथात पृष्ठ क्र. २१३ वर नोंदवलेली आहे.
अशा महान देशभक्त स्वातंत्र्यवीराचा इतिहास कित्येक वर्षे जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलल्या गेला. महाराजांच्या नसानसात व रक्ताच्या थेंबाथेंबात देशभक्ती ओतप्रोत भरलेली होती. हे इतिहासातून स्पष्ट होते. भारताचे खरे आद्य स्वातंत्र्यवीर हे महाराज यशवंत होळकर आहेत. परंतु प्रचारकांचे बोंड खपतात आणि मुक्यांचे हिरे लपतात असा हा प्रकार आहे.
आज दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, धर्मांधता, जातीयता, विषमता, दारिद्रयता, भुकमरी, अत्याचार, भाववाढ, या विनाशकारी जंतूंनी भारताला ग्रासलेले आहे. देशातील संविधान व लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहेत. समस्यात उच्चवर्णीय एकवटून संवैधानिक मानवाधिकाराचा गळा घोटू पाहत आहे. शासन प्रायोजित जातिधर्मातील हिंसेने पराकोटीची उसळी घेतलेली आहे. या सबंध बाबीं पासून मुक्ततेसाठी देशातील बालकांना व तरूणांना राजे यशवंत यांच्या देशभक्तीच्या जाज्वल इतिहासाची यशोगाथा सांगणे व त्यांच्या मन - मस्तिष्कावर बिंबवणे अगत्याचे आहे . समग्र क्रांतीची ज्योत प्रज्वलीत करून व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी राजे यशवंत यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत राष्ट्रभक्त निर्माण झाल्याखेरिज देशाला भावी दृष्टी प्राप्त होणे नाही.
महाराजांचे आणखी विशेष म्हणजे राजे यशवंत हे कलाप्रेमीही होते. वास्तुकला, भिंतीचित्रे, भानापूर येथे बांधलेला रंगमहाल, महेश्वर येथिल अहिल्याईची छत्री, वडील तुकोजी व बंधू विठोजी यांची छत्री हे त्यांच्या कलात्मक दृष्टीचे प्रतिक आहेत.
अशा या महान आद्य स्वातंत्र्यवीरास, परमवीरास, स्वातंत्र्याच्या प्रणेत्यास, राष्ट्रभक्तास जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !!!
— होमेश भुजाडे,
नागपूर
(आगामी प्रकाशित होणाऱ्या 'आद्य स्वातंत्र्यवीर महाराज यशवंतराव होळकर ' या ग्रंथातून )
No comments:
Post a Comment