ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात, राष्ट्रीय समाज पक्ष उठवणार देशभर रान
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे दिल्लीत मोठे विधान
नवी दिल्ली : ईव्हीएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. महादेव जानकर दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, दिल्ली रासेफ अध्यक्ष वीर पाल उपस्थित होते. भाजपने महाराष्ट्रात विरोधी पक्ष देखील राहू नये, याचा बंदोबस्त केला आहे. आता त्यांचे सरकार आले आहे तर त्यांनी शेतकरी, युवकांचे, महिलांचे जेवढे हित करता येईल तेवढे करावे, देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर यावे, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या त्यांना शुभेच्छ्या आहेत. स्वाभिमानाने आणि सन्मानाने 'एकला चलो रे'ची भूमिका घेऊन दिल्लीला कसे पोहचू याचा रासप विचार करत आहे. महायुतीने पाठिंबा दिला नसता तरीही राष्ट्रीय समाज पक्षाची एक जागा येत होती. पाथरीचा उमेदवार थोड्या मताने गेलेला आहे. बहुतांश ठिकाणी माझ्या उमेदवाराच मत असताना शून्य मते मिळाली आहेत. अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मधे घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ‘ईव्हीएम’वर माझा आक्षेप आहे, देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करु, असा इशारा जानकर यांनी दिला. प्लेन हॅक करता येत, सर्व हॅक करता येत मग ईव्हीएम हॅक करता येत नाही का? असा सवाल जानकर यांनी केला. मी स्वतः इंजिनियर आहे, ‘ईव्हीएम’ हॅक करता येते, असे जानकर म्हणाले. ‘ईव्हीएम’मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, याला केंद्र आणि राज्य सरकार जिम्मेदार आहे. ईव्हीएम विरोधात आम्ही आमची भूमिका घेऊन देशभर जाणार आहे, समविचारी पक्ष सोबत येत असतील तर त्यांचे स्वागत करू, असे जानकर म्हणाले.
सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, उद्योग सगळे सरकारचे आहे, प्रसार माध्यमही त्यांचीच आहेत. लोकशाहीच्या चारही स्तंभावर त्यांचेच राज आहे. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याच काम झाले असल्याचे जानकर म्हणाले. लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर बॅलेट पेपरवर मत घ्यावे, आम्ही त्याचे स्वागत करू. माझी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या बोलण्याला अर्थ आहे, सर्व मशीन सुरत वरूनच का आल्या, असा संशय जानकर यांनी व्यक्त केला. ईव्हीएम वर बंदी आणा हा मुद्दा घेऊन आम्ही राज्या राज्यात जाणार आहे, असे विधान करून राष्ट्रीय समाज पक्ष देशभर रान उठवणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीचा विजय ही सूज आहे, हे जास्त काळ टिकणार नाही. त्याचा देखील कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही पैशावर विकू नका, अन्यथा तुमचा सन्मान विकत घेणार, असे आवाहन तमाम भारतीय जनतेला जानकर यांनी केले आहे. धनशक्तीच्या जोरावर मते विकत घ्यायची, सरकार बनवून धन कमवायचा हा धंदा विद्यमान सरकारचा चालू झालेला आहे. मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळे मी त्यांच्यापासून बाहेर आहे. काँग्रेसचा आणखी अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता, स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले. महायुतीला एवढे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण बसवायचा? हे त्यांचे ते ठरवतील असे जानकर म्हणाले.
एक दोन आमदार असल्यावर शेपटीही झाकता येत नाही आणि शरीरही झाकता येत नाही. माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे, कोणासोबत जायचे याचा अजून निर्णय झालेला नाही. पण आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर केंद्रीय समिती निर्णय घेईल. आज सध्या तरी आमदार माझ्या बरोबर आहेत.
No comments:
Post a Comment