जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष जिंकत नाही, तोपर्यंत संघर्ष संपणार नाही : ज्ञानेश्वर सलगर
मुंबई (१०/१२/२४): महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत आणि पुरस्कृत असे 117 उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले. त्यांच्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जीवाचे रान करून प्रचार केला. परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीने अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवले, मग ते धनशक्तीचा वापर करून असेल, ईव्हीएमचा वापर करून असेल, सत्तेचा वापर करून असेल. शेवटी यश हे यश असतं. परंतु हे सरकार केवळ निव्वळ जनमताच्या आधारावर आलेलं सरकार नाही, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते जरी कमी दिसत असली, तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ केलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराची 90% मतं ही महायुतीच्या उमेदवाराला ट्रान्सफर मारलेली आहेत आणि दहाच टक्के मतं आपल्या उमेदवाराच्या रेकॉर्डला लागलेली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या लढ्यासाठी मैदानात उतरून संघर्षासाठी तयार राहायचे आहे. कारण आपण जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही.तरी तात्काळ आपल्या विभागातील बैठकीचे आयोजन करावे आम्ही लवकरच आपल्या भेटीस येत आहोत असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी रासप पदाधिकारी/कार्यकर्ते यांना समाज माध्यमातून केले आहे.
No comments:
Post a Comment