Thursday, March 27, 2025

व्यवस्था बदलण्यासाठी राजकीय परिवर्तन करणे हीच माझी आयडॉलॉजी : महादेव जानकर

व्यवस्था बदलण्यासाठी राजकीय परिवर्तन करणे हीच माझी आयडॉलॉजी : महादेव जानकर

जगात भारी कृषी पर्यटन केंद्र कुंभारीत राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर 

कुंभारी (२२/३/२०२५) : व्यवस्था बदलण्यासाठी राजकीय परिवर्तन करणे, हीच आपले राजकीय आयडॉलॉजी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासपच्या शिबिरात बोलताना केले. जगात भारी कृषी पर्यटन केंद्र कुंभारी तालुका - जामनेर जिल्हा - जळगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनात रासप पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. 



श्री. जानकर  शिबीरात बोलताना म्हणाले, मी इंटीलेक्चल बिलकुल नाही, मी प्रॅक्टिकलचा स्टुडन्ट आहे. या देशात सत्ता कशी मिळवायची, याचे गणित माझ्या डोक्यात आहे. आपल्याला कोणत्याही वादात अडकायचे नाही. आजच्या शिबिराला कुमार केतकर सारखे लोक बोलवले होते, पण त्यांची मुलगी अमेरिकेला जायचे असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. हुशार लोकांना मी रासपच्या शिबिराला बोलावले होते. अक्कीसागर साहेब म्हणाले, बदलत्या काळाप्रमाणे जगाप्रमाणे तंत्रज्ञानाबरोबर गेलं पाहिजे, काळासोबत गेले पाहिजे.  मा. म. देशमुख माझा प्राण होते. ते गेल्याचे कळल्यानंतर डोळ्यातून पाणी आले. पी. बी. सावंत, आ. ह. साळुंखे आपले आयडॉल आहेत हे लक्षात ठेवा. मराठ्यांनो आपल भल करायचे असेल तर, मा .म. देशमुख, आ. ह. साळुंखे, पी. बी. सावंत यांचे साहित्य वाचले पाहिजे. कोळसे पाटलाला जवळ घेतलं पाहिजे. मी खासदारकिला पडेल, अजून पडेल पण माझाच पक्षाचा खासदार या देशाचा पंतप्रधान होईल, असाल विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, मी पक्षाचे रोपटे लावले आहे, कुणाचे तरी पोरग एखादेवेळेस पंतप्रधान होईल. आताही मला ऑफर होती मंत्रिपदासाठी, पण मेलो तरी चालेल पण तुम्हाला मातीत घातल्याशिवाय तुमच्यासोबत येणार नाही, असा गौप्यस्फोट जानकर यांनी केला. कार्यकर्त्यांनो खचू नका, आपण पुन्हा मनगटावर लढू. निश्चितपणे रासपाची पोरं निवडून आणू. रासपात पैसेवाले माणसं आल्याशिवाय महत्व वाढणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे सोडून, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. आज आपली सत्ता नाही, सत्ता नसताना जी माणसं आपल्याबरोबर असतात ती आपली असतात. सत्ता होती तेव्हा सूज होती, तेव्हा सारी माणसे जवळ येतात. आज जे शिबिराला आलेत, त्यांचा इतिहास लिहिला जाईल. दिगंबर राठोडमुळे मराठवाडा व विदर्भात आपल्या पक्षाला फायदा होईल. बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा समाजाला फायदा झाला नाही.  माळी, वंजारी, मराठा, ओबीसी समाजाला आपल्या शिवाय पर्याय नाही. मुसलमान समाज आपला आहे. मुसलमानाच्या बद्दल आपली भूमिका स्पष्ट आहे. मुसलमानाला देखील राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे, पक्षाच्या झेंड्यात देखील हिरवा रंग आहे. 

श्री जानकर पुढे म्हणाले आरएसएसचे महाराष्ट्रात मोठे षड्यंत्र चाललेले आहे, ओबीसीला हिंदू म्हणत आहे आणि ओबीसीच वाटोळ बीजेपीच करत आहे. आरएसएस ओबीसी मराठा भांडण लावतय. ओबीसी मुस्लिमात भांडण लावतय. ओबीसी दलितात भांडण लावतय, यापासून सावध राहण्याचा सल्ला जानकर यांनी दिलाय. सर्व समाजाला राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजा उघडे आहेत. कोणत्याही समाजावर टीका करून मोठे होणार नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. मी विधानसभेला एकनाथ काटकर ला उभे केले, धनगराच्या गावात त्याला मते मिळाली नाहीत. मराठ्यांच्या गावात त्याला मते मिळाली, मराठ्याला वाईट कसे म्हणता येईल. मला मोदी चांगले ओळखतात. काशीराम यांनी पहिल्यांदा मला विमानात बसवलं. बेल्ट कसा लावायचा ते शिकवलं. पक्ष कसा रजिस्टर करायचा, हे काशीराम यांनी सांगितले आहे. बुद्धिजीवी मराठा, ब्राम्हण महादेव जानकर बरोबर आहे. फसलेला ओबीसी माझ्या विरोधात आहे. ते म्हणतात जानकर साहेबा बरोबर राहून काय आपल्याला मिळणार आहे. पक्ष वाढवणाऱ्यापेक्षा पक्ष रोखणाऱ्या माणसापासून देखील सावध राहिल पाहिजे. 

आमदार, खासदार मोठा नसतो. आमदार खासदार बनवणारा माणूस मोठा असतो, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचे प्रगती होणार नाही. सत्ता हे मृगजळ आहे, त्याच्यामागे किती वाहवत जायचे, ते आपण ठरवलं पाहिजे. पक्ष काढणे हेच मोठे डेरिंग आहे. पक्ष काढणे आणि टिकवणे येऱ्यागबळ्याचे काम नाही. पैसेवाल्या लोकांनी पक्ष काढले. पक्ष टिकवणे सोपे नसतय. ज्या लोकांनी पैसे दिले नाहीत, तेच ९० टक्के लोक खोट बोलतात. राष्ट्रीय समाज पक्ष भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. एक दिवस दिल्लीवर स्वारी मारणार, आपला आत्मविश्वास दांडगा आहे.

दोन दिवसीय शिबिरासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी विविध जिल्ह्यातून उपस्थित होते. पहिल्याच दिवशी कोणत्या जिल्ह्यातून किती पदाधिकारी आले आहेत, याचा आढावा महादेव जानकर यांनी स्वतः घेतला.  मार्गदर्शन शिबिरात कालिदास गाढवे, एस. एल. अक्कीसागर, कुशप्पा, डॉ. प्रभाकर साळवे, बाळकृष्ण लेंगरे मामा, गोविंदराम शुरनर, कुमार सुशील, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, अश्रूबा कोळेकर व अन्य पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले. पहिल्या दिवशी सायंकाळी विठ्ठल मूर्ती समोर आरतीचा मान एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळाला. मार्गदर्शन शिबिरात आलेल्या कार्यकर्त्यांना जेवण बनवताना भाजी चिरण्याचे देखील काम, महादेव जानकर यांनी कार्यकार्यकर्तेसह केले.  

राष्ट्रीय समाज पक्षाचे आगामी धोरण, पक्षाची बूथ बांधणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दिल्लीत त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा, 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांचा 57 वा वाढदिवसानिमित 'राष्ट्रीय समाज दिवस' साजरा करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी याचबरोबर अनेक महत्त्वाच्या विषयावर या शिबीरात चर्चा घडून आली.  शिबिरस्थळ निश्चित करण्यापासून पार पडेपर्यंत राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी विशेष परिश्रम घेतले. 

शिबिरास राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व आघाड्यांचे प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पातळीवर काम करणारे पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी या शिबीरास हजेरी लावली. अनुपस्थित पदाधिकाऱ्याबद्दल नाराजी दर्शवली.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025