राज्य सरकारमधील आमदार मंत्र्यांमुळेच धार्मिक जातीय तणाव निर्माण होत आहे : महादेव जानकर यांचे टीकास्त्र
जनतेच्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईपासून लक्ष हटवण्यासाठी जातीय धार्मिक मुद्दे
मुंबई (१९/३/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष वर्षातून दोनदा राज्य कार्यकारणी, जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांना ट्रेनिंग देत असते. राष्ट्रीय समाज पक्ष महाराणी अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती तालकटोरा मैदान येथे साजरी करत आहे, त्याची व्यूहरचना आम्ही आखत आहोत, जामनेरच्या दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिरात पक्षाचं चिंतन होणार आहे. विद्यमान सरकारची जिम्मेदारी असती की, कायदा आणि सुव्यवस्था ठेवणे, परंतु सरकार मधलेच काही मंत्री, आमदार अवास्तव चर्चा करतात, त्यामुळे तेढ निर्माण होते, जातीय दंगली घडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दोन धर्मात भांडण लावणं योग्य नाही, आणि त्यांच्या त्यांच्या मंत्र्याच्या तोंडाला आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका मराठी वृत्त वाहिणीशी बोलताना दिली.
श्री. जानकर यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले आहे, महाराष्ट्रात सुशिक्षित मुलांच्या बेकारीचा प्रश्न आहे, जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न आहेत, बजेटमध्ये ओबीसीच्या मुलांसाठी पैशाची तरतूद नाही, 'एमपीएससी'च्या परीक्षा होत नाहीत, परीक्षा व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही, दुधाचे दर पडलेले आहेत, या विषयावरून लक्ष वळवण्यासाठी सरकारने धार्मिक तिढा निर्माण करू नये. लोकांनी देखील शहाणे व्हावे, शिवाजी महाराजांच्या काळात धार्मिक युद्ध नव्हते, राजा राजाची लढाई होती. या देशात समतामुलक समाज निर्माण झाला पाहिजे. मुस्लिम असेल, बहुजन असेल, ओबीसी, गोरगरीब समाज सुखी राहिला पाहिजे, ही भूमिका राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. इथे मात्र वेगळच नाटक दिसायला लागलं. धार्मिक मुद्दा उपस्थित करायचा, कुठेतरी समाजात दंगली घडवायच्या, हे राज्याच्या हिताच नाही. त्यासाठी उद्या आम्ही पक्षाचं चिंतन करणार आहे. आंदोलनाच्या देखील तयारीत आहोत. जनतेचे हक्क आणि अधिकाराचे विषय बाजूला ठेवण्यासाठी असे विषय काढले जातात, त्यातून जनतेची प्रगती होत नाही.
ते पुढे म्हणाले, ओबीसी मुलांना, मराठा मुलाना आरक्षण कुठे आहे, नोकरी नाही, प्रत्येक ठिकाणी खासगीकरण व्हायला लागले आहे. एक दोन उद्योगपतींकडे रेल्वे, मेट्रोपासून सर्व त्यांच्याकडे जायाला लागलं, म्हणजे सर्वांना समानतेची वागणूक देणारे संविधान राहणार आहे की नाही असा प्रश्न देखील महादेव जानकर यांनी उपस्थित केलाय. इतिहासाची पान उलगडताना जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे, जेथे वादाचा आहे, तिथे कटाक्षाने थांबलं पाहिजे.
राज्यात नवीन उद्योग आले पाहिजे, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना पगार नाही, शिक्षकांना पगार नाही, पोलिसांची बोंबाबोंब आहे, कल्याणकारी योजनाना कात्री द्यायला लागलेत. हजारो कंत्राटदार परवा मला भेटायला आले, त्यांची बिल अडलेली आहेत, त्यांना द्यायला पैसा नाही. ही व्यवस्था सोडून जातीय धार्मिक भांडण लावायचा, यास सरकार जबाबदार आहे. विकासाचे राजकारण झालं पाहिजे. हिंदू विरुद्ध मुस्लिम लढाई होण, आपल्या राज्याच्या हिताच नाही. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते, शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता. औरंगजेब देखील राजा होता, औरंगजेबाच चुकीच असेल तर त्याच उदात्तीकरण करण्याची गरज नाही. यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडू नये. इतिहासाच्या इतिहासकारांनी कोणत्या कुचापती काढायच्या, त्याचा विचार केला पाहिजे. पिक्चर काढले जातात, पिक्चरवरून भावना भडकवल्या जातात. ही भूमी साधू संतांची आहे, संत महातम्याची आहे. फुले, शाहू, आंबेडकरांची, संत तुकारामांची, संत ज्ञानेश्वरांची भूमी आहे. त्या दृष्टीने कारभार व्हावा, ही राष्ट्रीय समाज पक्षाची मुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडे विनंती आहे. जो दोषी असेल, त्याला पकडलं पाहिजे. धार्मिक तणाव निर्माण होता कामा नये, त्याला मुख्यमंत्री गृहमंत्र्याने आवर घातला पाहिजे. हजारो पिढ्यांनी नाव काढलं पाहिजे, असे बहुमताने आलेल्या सरकारने काम केले पाहिजे.
No comments:
Post a Comment