Friday, March 21, 2025

उद्यापासून 'जामनेर'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यांना दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर

उद्यापासून 'जामनेर'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यांना दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर 

राष्ट्रीय समाज पक्षाकडून पुढील राजकीय रणनीती आखायला सुरूवात..?

मुंबई (२१/३/२५)  आबासो पुकळे | उद्या दिनांक 22 मार्च शनिवार व 23 मार्च रविवार रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनात प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाड्याच्या त्रिवेणी संगमावर जामनेर जिल्हा जळगाव येथील डॉ. प्रभाकर साळवे यांच्या 'जगात भारी कृषी पर्यटन केंद्र कुंभारी' येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाने जाहीर केले आहे. हे प्रशिक्षण शिबिर रासपच्या सर्व पदाधिकारी यांना अनिर्वाय करण्यात आले आहे, असे स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले आहे.

यापूर्वी पैठण जिल्हा - छत्रपती संभाजीनगर, महाबळेश्वर जिल्हा - सातारा, भूगाव मुळशी जिल्हा - पुणे, वसई जिल्हा पालघर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची प्रशिक्षण शिबिर पार पडली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असताना, एकमेकावर चिखलफेक करून मंत्र्याचेच राजकीय धिंडवडे निघत आहेत तर प्रमुख विरोधी पक्षात राजकीय मरगळ आलेली असताना उद्या जामनेराच्या प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांना कोणते धडे देणार, कसे चार्ज करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पक्षाचे आगामी धोरण, पक्षाची बूथ बांधणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दिल्लीत त्रिशताब्दी जयंतीउत्सव सोहळा, 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांचा 57 वा वाढदिवसानिमित 'राष्ट्रीय समाज दिवस' साजरा करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी याचबरोबर अनेक महत्त्वाच्या विषयावर या शिबीरात चर्चा होईल, असे संकेत रासपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व आघाड्यांचे प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पातळीवर काम करणारे पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी या शिबीरास उपस्थित राहणे बंधनकारक आहे, जे पदाधिकारी गैरहजर राहतील त्यांच्यावर पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात येईल, असे सुतोवाच प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांनी केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्यातील माजी पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. रासपचे प्रशिक्षण शिबिर हे पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025