इतिहासकार संशोधक प्रा. मा. म. देशमुख काळाच्या पडद्याआड..!
प्रा.मा. म. देशमुख यांना राष्ट्रभारती परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
इतिहासकार मा. म. देशमुख बहुजन समाजातील इतिहासतज्ञ, मान्यवर कांशीरामसाहेबांचे सुरुवातीच्या काळापासूनचे सहकारी त्यांचा अल्पपरिचय इथे देण्याचा प्रयत्न करीत आहे.
सरांचे पूर्ण नाव मारोती महादेव (मा.म.) देशमुख. महादेवराव आणि सखुबाई या शेतकरी दांपत्याच्या पोटी त्यांचा ११ जुलै १९३६ रोजी जन्म इसापूर येथे झाला. हलाखीची परिस्थिती असूनसुद्धा चिकाटी, जिद्द, शिक्षणाची जबरदस्त आवड यामुळे अध्ययन काळात आर्थिक प्रतिकूलतेवर त्यांनी मात केली. प्री. युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले. इतिहास हा त्यांच्या खास आवडीचा प्रांत. साधनसामुग्री, संदर्भ, पुरावे यांच्या आधारे इतिहासाची चिकित्सा, इतिहासाची सत्यता सिद्ध करण्याची वृत्ती आणि दृष्टी त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच जोपासली होती. १९६३ मध्ये इतिहास या विषयात एम. ए. परीक्षेत त्यांनी गौरवास्पद यश मिळवले.
१९५४ ते १९६३ पर्यंत ते नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून एक वर्ष कार्य केले. १९६४ साली ते कांग्रेस नगर, नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेज मध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, इतिहास प्रमुख म्हणून राहिले आणि येथेच १ ऑगस्ट १९९६ ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी 1968 ला लिहिलेल्या *मध्ययुगीन भारताचा इतिहास* ह्या पुस्तकावर देशभरात वादळ उठले होते. प्रतिगामी सवर्णांनी त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढून नागपूर विद्यापीठासमोर त्या ग्रंथाची होळी केली होती. आणि न्यायालयातून त्या ग्रंथावर बंदी तसेच जप्ती देखील आणली होती. परंतु बहुजन समाजातील विद्यार्थ्यी आणि तरुणांनी 27 जानेवारी 1969 रोजी प्रेम यात्रा (गौरव मिरवणूक) काढून प्रस्थापित ब्राह्मणांना उत्तर दिले होते. मान.मा. म देशमुख सर हे बसपा संस्थापक मान्यवर कांशीरामजींच्या संपर्कात आले. 14 एप्रिल 1984 रोजी स्थापना झाल्यावर त्याना गंगाधर फडणवीसांच्या विरोधात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर 1989 ला रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी हत्तीवर स्वारी केली होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्य केले होते. सरांनी इतिहासाची नवी मांडणी केली. बहुजन जागृती साठी त्यांनी इतिहासाचे नवीन दालन उघडले. लेख, भाषणे देऊन जनजागरण केले. सुधारकांप्रमाणे सरांना सुद्धा विरोध, शिव्याशाप, ग्रंथाच्या होळ्या, प्रेतयात्रा, ग्रंथबंदी इत्यादी प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पण मा. म. देशमुख हिमालयाप्रमाणे अढळ राहिले.
सरांनी अनेक पुस्तके/ग्रंथ निर्मिती केली:--
१) प्राचीन भारताचा इतिहास
२) मध्ययुगीन भारताचा इतिहास
३) दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास
४) मोगल कालीन भारताचा इतिहास
५) युगप्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांची शौर्यगाथा
६) अभिनव अभिरूप लोकसभा नाट्य
७) शिवशाही
८) सन्मार्ग
९) राष्ट्रनिर्माते
१०) मनुवाद्यांशी लढा
११) रामदास आणि पेशवाई
१२) मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
१३) महात्मा फुले यांचे सामाजिक प्रबोधनाचे प्रयत्न
१४) मराठ्यांचे दासीपुत्र
१५) साहित्यिकांची जबाबदारी
१६) शिवराज्य
१७) समाज प्रबोधन
१८) बहुजन समाज आणि परिवर्तन
यापैकी मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व संशोधक साहित्यिक क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण केली होती. यात छत्रपती शिवाजी महाराज, रामदास, पेशवे इत्यादींच्या बद्दल प्रा. मा. म देशमुख यांनी घडविलेल्या सत्य दर्शनाने कमालीचे वादळ निर्माण झाले. आचार्य अत्रे यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी झाली. ग. त्र्यं. माडखोलकर, दिवेकर शास्त्री यांनी वृत्तपत्रातून टीकात्मक लेख लिहिले. नागपूर मधील उच्चभ्रू, सनातनी व ढोंगी पुरोगामी वृत्तीच्या लोकांनी एकत्र येऊन सरांची प्रेतयात्रा काढण्याचे व आंदोलने करण्याचे ठरवले. त्यांच्या ग्रंथांच्या होळ्या करण्यात आल्या. त्यांच्या जीवाचे बरे वाईट होण्याचा क्षण आला होता. १७ जुलै १९६९ रोजी महाराष्ट्र शासनाने या ग्रंथावर ग्रंथ बंदी हुकूम जारी केला.
पण सरांनी याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टात अनुकूल -प्रतिकूल वादविवाद, साक्षी पुरावे चर्चा होऊन हायकोर्टाने ग्रंथावरील बंदी हुकूम रद्द ठरविला आणि ग्रंथ सन्मानपूर्वक बंदी हुकूमातून मुक्त केला.
भारतीय समाज उन्नती मंडळ, उल्हासनगर, संत शिरोमणी गुरु रविदास मंडळ, ठाणे, बुध्द विहार समन्वय समिती, संत गाडगे बाबा बहुद्देशीय आश्रमाचे वतीने त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना विनम्र अभिवादन आणि साश्रुनयनांनी आदरांजली अर्पण करतो. आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान त्यांचे जाण्याने झाले. कांशिरामजी यांचे सोबत बहुजन आंदोलन उभे करण्यात सरांचे मोठे योगदान आहे. त्यापूर्वी देखील ते ब्राम्हणेतर चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या अजरामर कार्याला करोडो तोफांची सलामी, मानाचा मुजरा तसेच त्यांच्या मृत्यात्म्यास चिरशांती लाभो हीच तथागतांच्या चरणी प्रार्थना 👏👏👏👏💐🌹🌺🌲🌻🍁🌺🌹☘️💐🌹🙏🙏🙏🙏👏👏👏
शोकाकुल
जे.आर. खैरनार
No comments:
Post a Comment