Friday, March 28, 2025

एक कोळीवाडा आणि मुंबईला चुना पुरवणारं गाव

एक कोळीवाडा आणि मुंबईला चुना पुरवणारं गाव



#chunabhatti #gtbnagar #koliwada #sion #swadeshimil #kurla #vadala #kingcircle #

पश्चिम उपनगरांच्या वांद्र्याहून पूर्व उपनगरातल्या शीव-सायनला आलो की त्याच दिशेनं पुढे आहे कोळीवाडा. तिथं रावळी डोंगर व त्या नावाचं गाव होतं. खाडी होती, मासेमारी केली जायची. त्यामुळे ते शीव कोळीवाडा गावठाण म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वडाळ्याहून कोळीवाड्याकडे जाताना एक भाग रावळी जंक्शन म्हणून ओळखला जायचा. पण त्या नावाच स्टेशन मात्र नव्हते. कसलंच स्टेशन नसताना जंक्शन म्हणून ओळखला जाणारा हा एकमेव भाग. शिवाय तिथला धारावीचा कोळीवाडा आणखी वेगळाच. 

 मुंबईत असे ४१ कोळीवाडे आहेत. म्हणजे तेवढ्या ठिकाणी समुद्र व खाडी होती आणि तिथं मासेमारीही व्हायची. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत शीव कोळीवाडा भागात फारशी वस्ती नव्हती. पण स्वातंत्र्याच्या वेळी फाळणी झाली आणि आताच्या पाकिस्तानचा सिंध व पंजाब प्रांतातून लाखो लोक भारतात व महाराष्ट्रात आहे. 

 बरेच पंजाबी लोक आले कोळीवाडा, किंग्ज सर्कल व अँटॉप हिल, वडाळा परिसरात. तिथं राहून त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. काही ऑटो पार्ट्स व्यवसायात गेले. एके काळी मुंबईतील बहुतांशी टॅक्सी ड्रायव्हर शीख असायचे. काही शीख मंडळींनी तिथं धाबेही सुरु केले. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या परिसरात गुरुद्वाराची उभारणी केली. त्याला गुरू तेंग बहादूर यांचं नाव दिलं. 

 तेव्हा तेथील रेल्वे स्टेशनचं नाव होतं कोळीवाडा. पण तेथील कोळी वस्ती कमी होत गेली आणि शीख व पंजाबी वस्ती वाढली. त्यांनी कोळीवाडा स्टेशनला गुरू तेंग बहादूर यांचं नाव देण्याची मागणी केली. त्यामुळे १९७० साली स्टेशनला ते नाव देण्यात आलं. 

 आता त्या स्टेशनच्या परिसरात प्रतीक्षा नगर नावाची म्हाडाची प्रचंड वसाहत उभी राहिली. अनेक पत्रकार तिथं राहू लागले. मुंबई शहर व उपनगरातल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी तिथं ट्रांझीट कॅंप म्हणजे तात्पुरत्या इमारती बांधण्यात आल्या. त्याही मोडकळीस आल्या, पण त्यातील अनेक लोकांना मूळ ठिकाणी घर मिळलेलं नाही. काहींनी ट्रांझिट कॅंपमधील घर विकून टाकलं व भाड्यानं दिलं. एके काळी फार वस्ती नसलेल्या कोळीवाडा-गुरू टेंग बहादूर नगर (जीटीबी नगर) आता गर्दीने ओसंडून वाहू लागला आहे. तेथील रहिवाशांना शीव, किंग्ज सर्कल, वडाळा ही तिन्ही स्टेशन जवळची आहेत. किंग्ज सर्कलचे गांधी मार्केट लागून आहे. तिथं खरेदीसाठी मुंबईभरातून महिला येत असतात. ईस्टर्न फ्री वे अगदी जवळून जातो. रखडत जाणारी मोनो रेलही जवळ आहे.तिथले कोळी, आगरी मात्र कमी झाले आहेत. 


स्वदेशी गिरणीचं गाव 

-----------------

 शीव-सायनकडून खाली उपनगरांकडे जाताना चुनाभट्टी नावाचं स्टेशन आहे. त्या भागात चुन्याच्या अनेक भट्ट्या होत्या. त्या केव्हाच बंद त्पडल्या, पण स्टेशनला मात्र तेच नाव मिळालं. परशुराम गायकर नावाच्या गृहस्थांच्या मालकीच्याही १२ मोठ्या चुनाभट्ट्या होत्या. साऱ्या मुंबईला तेथून चुना पुरवला जात असे.  याच भागात १८६८ साली जमशेदजी टाटा यांनी स्वदेशी कापड गिरणी उभारली. त्या मिलला आणि मुंबईभरातील बांधकामासाठी येथून चुना पाठवला जात असे. अर्थात संतकरूझ पश्चिमेच्या बेस्ट बस आगारापाशीही एक मोठी चुनाभट्टी होती. दुसरी चुनाभट्टी होती दाखन मुंबईतील मांडावी भागात. तेथील एक मशीद आजही चुनाभट्टी मशीद म्हणून ओळखली जाते. 

 चुनाभट्टी स्टेशन आणि आसपासचा परिसर सखल आहे. दरवर्षी पावसाळ्यात तिथं पाणी साचतं. स्टेशनबाहेरच्या इमारती पाण्याखाली जातात. येथील मराठी मंडळी विचार वसंत व्याख्यानमाला नियमित भरवतात. मराठी विज्ञान परिषदेचं काम येथून चालतं. हायवेला लागून शिवसृष्टी नावाची हाउसिंग सोसायटी आहे. अनेक नामवंत मंडळी तिथं राहतात. 

  चेंबूर, सायन व टिळक नगर पट्ट्यांत चुनाभट्टी हे स्टेशन आलं १९६० साली. तोपर्यंत तो भाग कुर्ल्याचा म्हणूनच ओळखलं जाई. अगदी स्वदेशी मिलचा पत्ताही कुर्ला असाच होता. मात्र आपल्यापैकी फारच कमी जण या चुनाभट्टी रेल्वे स्टेशनवर उतरले असतील.

© संजीव साबडे

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025