Saturday, January 18, 2025

शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन

शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन


मेंढपाळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महादेव जानकरांचा रासप, बच्चू कडूचा प्रहार आक्रमक

अमरावती (७/१/२५) :  विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत सरकार संवेदनशील दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ का येत आहे, असा प्रश्न प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला आहे. 

बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन करण्यात आले. यादरम्यान बच्चू कडू बोलत होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. मात्र, तरीही सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. त्यामुळेच आम्ही शेतकरी शेतमजूर आणि मेंढपाळांच्या समस्यांना घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत. आंदोलन आमच्यासाठी नवीन नाही, आमचा जन्म आंदोलनासाठी झाला, पदावर असो किंवा नसो आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या आंदोलनात बच्चू कडू आणि महादेव जानकर हे मेंढपाळांच्या वेशात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.

या मागण्यांसाठी आंदोलन

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या घोषणांची पूर्तता करावी, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, चराई करता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, मेंढपाळांसाठी धोरण निश्चित करण्यात यावे, खोट्या केसेस मागे घेण्यात याव्या, मेंढ्यांचे मोबाईल हॉस्पिटल तयार करण्यात यावे, घरकुलसह स्थायी निवारा देण्यात यावा, चेक पोस्टवर झालेल्या कार्यवाहीचा मागील दोन वर्षाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात यावा, आदी मागण्या वाडा आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आहेत.

रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, देशात १८ टक्के असलेल्या धनगर समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. आजपर्यंत लोकसभेत एकही लोकप्रतिनिधी या समाजातून खासदार म्हणून निवडून गेला नाही अथवा निवडून जाऊ दिला गेला नाही. जाती धर्माच्या नावाने निवडणूक केंद्रित करण्यात आल्या. सर्वसामान्य आणि लोकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पराभव करण्यात आला, अशी खंत महादेव जानकर यांनी व्यक्त केली.  सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी असलेल्या योजना करता पैसा दिला नाही, तर यापुढे मोठे जोरदार आंदोलन करू, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला. हा आजचा मोर्चा म्हणजे एक झलक असून, यानंतरही प्रशासन व पोलिसांकडून मेंढपाळ बांधवांवर दमन करण्यात आले तर ते खपवून घेणार नाही, अशा शब्दांत ठणकावले.  विशेष म्हणजे काँग्रेस हा गद्दार पक्ष असून भाजप हा महागद्दार असल्याचा  हल्लाबोल महादेव जानकर यांनी आंदोलनादरम्यान केला. श्री. जानकर पुढे म्हणाले, गद्दारांच्या मागे उभे राहू नका. प्रहार व राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी व मेंढपाळ यांच्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार आहे. अमरावतीचा मोर्चा ही याची सुरुवात आहे. पुणे, औरंगाबादलाही मोर्चा काढू, असे सांगितले.

आंदोलनात रासपचे पदाधिकारी/कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भाचे माजी अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, यवतमाळ माजी जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकूर, अकोला   जिल्हा माजी अध्यक्ष दादाराव ढगे, माजी कार्यकारणी महाराष्ट्र सदस्य नानाजी देशमुख, गणेश मानकर, आनंदराव घोटाकडे, विष्णू पाटील, मंगेश शेळके, प्रदिप गावंडे, किरण होले पाटील, अब्दुल भाई, यश सोनटक्के व अन्य राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...