Sunday, January 12, 2025

काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकर

काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा 

सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. श्री. यल्लालिंग महाराज पीठ होटगी जि - सोलापूर येथील कार्यक्रमात महादेव जानकर बोलत होते.

श्री. जानकर म्हणाले, येथील दलित, ओबीसी, मुस्लिम, लिंगायत सर्व समाजाला सांगू इच्छितो, ज्यांना आम्ही वर बसवले आहे, त्यांना खाली घ्यायची ताकद महादेव जानकर जवळ आहे, काळजी करायची नाही. आज मी बालयोंगीचा शिष्य म्हणून आलो आहे. केंद्रातले राज्यातले सरकार बदलता येते. येथील लिंगायत, धनगर, मुस्लिम समाजाला सांगतो, आपल्यातला एक माणूस चांगलं काम करत असताना तिथे राजकारण आणू नका. राजकारण करायचेच असेल तर आमच्याशी करा, आम्ही खंबीर आहोत. या मठाच्या पाठीशी मी उभा आहे, तुम्हाला जशाच तसे उत्तर देण्यासाठी खंबीर आहे. मी देखील ब्रह्मचारी आहे. फक्त यांनी भगवे कपडे घातले आहेत आणि मी पांढरे कपडे घातले आहेत, एवढाच फरक आहे. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, न विकणारा समाज तयार झाला, तर न विकणारा नेता तयार होईल. महाराष्ट्रात आमचा पराजय झाला असला तर मी नाउमेद नाही. आमचाही एक आमदार निवडून आला आहे. मुस्लिम समाजाचा रासपचा आमदार थोड्या मताने हरला आहे. भाजप आणि काँग्रेसची मस्ती जिरवण्यासाठी महादेव जानकरने जन्म घेतलेला आहे. भाजपने मस्तीत वागू नये, कितीही आमच्या समाजातील चमचे तयार केले, तरी महादेव जानकरला फरक पडणार नाही. महादेव जानकर हा महादेव जानकर आहे. केवळ धनगर समजाचीच नाही तर लिंगायत, मुस्लिम, ओबीसी समाज तुमची भागीदारी कुठे आहे? हिंदूचं नाव घ्यायचं आणि हिंदूंच्याच मठावर गुन्हे दाखल करायचे. यल्लालिंग महाराज हिंदूच आहेत ना?  

मुस्लिम भाईंना मी सांगू इच्छितो, शिक्षण आणि मतांसाठी तुम्ही एकत्र या. तुमची आणि माझी युती झाली तर देशाचं पंतप्रधानपद या मंचावर येईल. आपलं मतदान मोठे असूनही सत्तेबाहेर राहतो. पाच, दहा हजाराला मते विकले जातात. अक्कलकोट विधानसभेत सुनील दादा बंडगर यांना मी राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिली आणि धनगरांच्या गावात रेट वाढले, 50 हजार पासून लाखो रुपये वाटले. आम्ही पडू द्या, पण तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढत होतो. आज तुमचे सरकार आहे का.? केंद्रात नाही, महाराष्ट्रात नाही. तुम्हाला आरक्षण कोण देणार आहे? असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केलाय. जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार वाढणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कोणीही सत्ता देणार नाही. 

नेत्यावर कोण विश्वास ठेवत नाही, महाराजांनी एक टिळा लावला तर लोक विश्वास ठेवतात. उपेक्षितांचं, सर्वसामान्यांचं शासन या देशात आणि राज्यात आणण्यासाठी महाराज मंडळीनीं आमच्यासाठी ज्ञानाची कवाडे उघडी करावित, यासाठी आज तुमच्याकडे आलो आहे. या मठाकडे तिरक्या नजरेने कोणी बघितले तर त्याचा डोळा काढल्याशिवाय महादेव जानकर शांत राहणार नाही. आपल्यातले हेवेदावे विसरून बालयोगी श्री. यल्लालिंग महाराज यांच्या पाठीशी तन, मन, धनाने पाठीशी सर्वांनी उभे राहावे, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...