मेंढपाळांच्या मुलांनी राज्यकर्ते बनायचेच नाही का? : महादेव जानकर
अमरावती (७/१/२५) : अमरावती नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे येथे मेंढपाळांच्या मुलांना वसतिगृहासाठी जागा दिली होती. त्यातील नाशिक येथे चालू झाले, पण इतर वसतीगृह झाली नाहीत, यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. मेंढपाळांच्या मुलांनी राज्यकर्ते बनायचे नाही का.? असा संतप्त सवाल ही महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. महादेव जानकर प्रसार माध्यमांशी अमरावतीत बोलत होते.
श्री. जानकर म्हणाले, मेंढपाळ आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्याची पोरं मंत्री असतात, तरीही त्यांना शेतकऱ्यांचे हित करता येत नाही. प्रशासन आणि न्यायपालिकेत शेतकऱ्यांच्या मुलाने एन्ट्री केल्याशिवाय शेतकऱ्याचं भलं होणार नाही. हीच अवस्था मेंढपाळांची आहे मी ज्यावेळेस कॅबिनेटमंत्री होतो त्यावेळेस राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, शेतकऱ्यांसाठी चारा युक्त योजना सारख्या अशा बऱ्याच योजना आणल्या होत्या, पण नंतर त्या योजना कागदावरच राहिल्या. मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जर नियत चांगली असेल तर शेतकरी, कामगार पर्यंत त्या योजना जातात.
श्री. जानकर पुढे म्हणाले, शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. मेंढपाळालां तर काही माहीत नसत, वनविभागात जिथे मोठी झाडे झालीत तिथे चराईसाठी परवानगी देईला पाहिजे होती, पण ते देतच नाहीत, उलट मेंढपाळ बांधवांवर गुन्हे दाखल करतात. जे झाड शेळी मेंढी खात असेल तर ठीक आहे, पण जिथे झाडे मोठी झालेत तिथे ते जाऊ देत नाहीत. तिथला चारा वाळून जातो. एक मेंढी किंवा दिडशे मेंढ्या मेल्या तर मेंढपाळाला त्याचा मोबदला मिळत नाही. मेंढपाळांच्या मुलांसाठी आम्ही वसतीगृह दिली होती, ती वसतीगृह देखील आज लागू झालेली नाहीत. त्यांनी आयुष्यभर मेंढरच राखायचे का? असा संताप महादेव जानकर यांनी व्यक्त केला. मेंढपाळाच्या मुलांनी देखील या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, मुख्यमंत्री, कलेक्टर झाले पाहिजे ना, प्रसार माध्यमांत संपादक झाले पाहिजे. उपेक्षित लोकांसाठी आमची लढाई आहे. तुम्ही कधी धर्मावर जाता, मेंढपाळ हिंदूच आहे ना? पुढील काळात शेतकरी, मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला. प्रशासनाने अमचे ऐकले पाहिजे, आज आम्ही सत्तेबाहेर असलो तरी भविष्यात सत्तेत जाऊ, काळजी करू नका.
No comments:
Post a Comment