Tuesday, January 7, 2025

महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन

महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन. सर्वांना शुभेच्छा!

शिवरायांनंतर राज्याभिषेक करुन घेणारे एकमेव महाराजा राजराजेश्वर यशवंतराव होळकर...!

इंग्रजांचा धोका सर्वात आधी लक्षात घेवुन १८०३ पासुन इंग्रजांशी सर्वकश लढा पुकारत एकूण अथरा युद्धे करत व जिंकत त्यांना नामोहरम करणारे...ब्रिटीश पार्लमेंटला भारताबाबतची धोरणे बदलायला भाग पाडणारे महाराजा यशवंतराव होळकर! 

यशवंतराव हे शिवरायांनंतर ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करुन घेणारे एकमेव भारतीय महाराजा. त्यावेळीस यशवंतरावांचे वय होते फक्त २३. स्वबळावर राज्य जिंकून राज्याभिषेक करून घेणारे हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व. त्यांच्या अशा अद्वितीय राज्याभिषेकाची पार्श्वभूमीही तितकीच चित्त’थरारक आहे.

३ डिसेंबर १७७६ रोजी पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथील किल्ल्यात त्यांचा जन्म झाला. युवावस्थेत ते प्रवेशले तेंव्हापासून त्यांच्यावर संकटांची वादळे कोसळू लागली. महायोद्धे सुभेदार तुकोजीराजे होळकर यांचे ते कनिष्ठ पुत्र. अहिल्यादेवींच्या वत्सल आणि धोरणी सहवासात त्यांची वाढ झाली. पण १७९५मध्ये दुर्दैवाने अहिल्यादेवी गेल्या. पिता तुकोजीराजे होळकर यांचे त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात म्हणजे १७९७ मध्ये देहावसान झाले. याचा लाभ घेऊन दुस-या बाजीरावाने आपल्या बलाढ्य सरदारांची मदत घेत होळकर संस्थान हडप करण्याचा चंग बांधला. थोरले बंधू काशीराव बाजीरावाच्या कह्यात गेले. होळकर गादीचा लायक वारस मल्हारराव (द्वितीय) पेशव्यांची भेट घेऊन गादीचा मसला सोडवावा या विचाराने पुण्यात आपल्या बंधुंसह आले असताना मध्यरात्री अचानक हल्ला करुन खुन करण्यात आला. या हल्ल्यातुन वाचलेल्या यशवंतराव आणि त्यांचे बंधु विठोजी यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. नागपूरकर भोसलेंनी त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली कैदेत टाकले आणि त्यांना पेशव्यांच्या हवाली करण्याचा चंग बांधला. यशवंतरावांनी कडेकोट पहा-यातून, अकरा फुट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून तेथून पलायन केले. खिशात दमडी नाही, फक्त अन्यायी पेशवाई संपवायची ही आकांक्षा. अशा अवस्थेत त्यांनी खिशात दमडी नसता, शिंदे-पेशव्यांचे सैन्य त्यांना पकडण्यासाठी मागे लागले असता, त्यांनी हिमतीने खानदेशातील भिल्लांची सेना उभारत केवळ आपल्या पराक्रमाच्या जीवावर कसलेल्या सेनानींशी युद्धे करत माळवा व महेश्वर जिंकून घेतले. होळकर संस्थान पेशव्यांच्या घशातून काढून घेतले. पेशवाईशी पूर्ण संबंध तोडण्यासाठी त्यांनी स्वत:चे स्वातंत्र्य घोषित केले. महेश्वर जिंकल्यानंतर काही दिवसांत म्हणजे ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेत त्यांनी स्वत:ची राजमुद्रा घोषित केली. शिवरायांनंतर करून घेतलेला हा दुसरा आगळा राज्याभिषेक. आता ते इतिहासात राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर म्हणुन ओळखले जाणार होते.

खरे म्हणजे यशवंतरावांनी जुलमी पेशवाईविरुद्ध केलेले हे बंड तर होतेच पण पेशवाईशी सर्व संबंध तोडून टाकण्याची ही उद्घोषणा होती. राज्याभिषेकामुळे ते पेशव्यांपेक्षाही वरचढ बनले. भारतातील इतर रजवाडेही त्यांना बरोबरीचे मानु लागले. त्यांच्या आदेशांना वजन प्राप्त झाले. राज्याभिषेकानंतर संतापलेल्या पेशवे व दौलतराव शिंद्यांनी त्यांना स्वस्थता मिळू दिली नाही. जीवा नागोजीसारखे बलाढ्य सरदार पाठवले. यशवंतरावांनी त्यांचा धुव्वा उडवला. त्याच काळात त्यांचे ज्येष्ठ बंधू विठोजी होळकर यांनीही पंढरपूर आपली राजधानी करत महाराष्ट्रात पेशवाईविरुद्ध उठाव केला. पेशव्याने ब्रिटीश सैन्याची मदत घेऊन विठोजी होळकर यांचा पराभव करुन कैद केले . शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली चिरडून त्यांची निघृण हत्या केली गेली. 

त्यामुळे यशवंतराव पुण्यावर चालून आले. हडपसर येथे महायुद्ध झाले. पेशवे व दौलतराव यांच्या सेनेचा समूळ विनाश केला. बाजीराव पेशवा घाबरून पळत सुटला तो सरळ इंग्रजांना शरण गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी यशवंतराव त्यांना विनवण्या करत असतानाही वसईला त्यांच्याशी मांडलीकीचा तह करून पेशवाईचा अस्त करून घेतला. पेशवाईच्या अस्ताला खरे कारण घडले ते महाराजा यशवंतराव. पण क्षणापासून यशवंतराव इंग्रजांबाबत सावध झाले. इंग्रजांचा धोका विस्तारत चालला आहे हे त्यांच्या एव्हाना लक्षात आल्याने त्यांनी आपसांतील वैरभावाला मुठमाती देत, अगदी दौलतराव शिंद्यांशी व नागपुरकर भोसलेंशीही मेळ घालण्याचा प्रयत्न केला. देशभरच्या संस्थानिकांना पत्रे पाठवत, भेटत त्यांना भारत इंग्रजांपासुन स्वतंत्र करण्याचा चंग बांधला. पण यश मिळत नव्हते. सारे राजे-रजवाडे आपले मांडलिकत्व पत्करत असताना यशवंतराव का आपल्या बाजूने येत नाही या प्रश्नाने इंग्रजही चकित झाले. त्यांनी यशवंतरावाशी तह करण्याचा प्रयत्न केला तर यशवंतरावांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. शेवटी इंग्रजांनी १६ एप्रिल १८०४ रोजी युद्ध घोषित केले तर त्या युद्धाची सुरुवात यशवंतरावांनी केली. २२ मे १८०४ रोजी त्यांच्यावर चाल करून यायच्या तयारीत असलेल्या कर्नल फॉसेटच्या कुछ येथील तळावर अचानक हल्ला करून तेथील दोन बटालियन कापून काढल्या. इंग्रजांविरुद्ध सुरु केलेया स्वातंत्र्ययुद्धाची ही सलामी होती. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा इंग्रजांशी कडव्या लढाया देत अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवले. मुकुंद-याच्या युद्धात त्यांनी अभिनव युद्धतंत्र वापरत इंग्रजांची समुळ फौज कापुन काढली. याचे पडसाद इंग्लंडमधेही पडले आणि भारताबद्दलचे संपुर्ण धोरण बदलणे इंग्रजांना भाग पडले. 

"काय वाट्टेल त्या अटींवर यशवंतराव होळकरांशी शांततेचा तह करा..." असा आदेश घेऊन नवा गव्हर्नर जनरल भारतात आला. इकडे भरतपुरच्या युद्धात यशवंतरावांनी अजुन नव्या तंत्राने इंग्रजांना धुळ चारली. याच युद्धात सहभागी असणारे इंग्रज सेनानी नंतरच्या (१८१५ च्या) नेपोलियनच्या प्रसिद्ध वाटर्लू युद्धातही सामील होते आणि त्यांनी नोंदवुन ठेवलेय की ‘भरतपुरचे युद्ध वाटर्लुपेक्षा अवघड होते’. तेथपासुनच यशवंतराव व नेपोलियनची तुलना सुरु झाली.

"आधी देशाचे स्वातंत्र्य..." हा यशवंतरावांचा नारा १८०३ पासुन घुमला होता. पण या लढ्यात दुर्दैवाने कोणीही रजवाड्यांनी साथ न दिल्याने हा लढा एकाकीच राहिला. तरीही त्यांची विजयाची उमेद मिटली नाही. शीख तरी आपल्या युद्धात सामील होतील या आशेने जनरल लेक पाठीशी असतानाही पार लाहोर गाठले. पण त्यांनीही इंग्रजांच्या नीतीला बळी पडून यशवंतरावांना साथ देण्यास नकार दिला. पारतंत्र्याची मोहिनीच एवढी पडली होती कि स्वातंत्र्याचा अर्थच भारतीय रजवाडे विसरून गेले होते.

खरे म्हणजे राष्ट्राच्या स्वातन्त्र्याचा मुलमंत्र समजलेले ते भारतातील पहिले मुत्सद्दी महायोद्धे होते. भारतीय स्वातंत्र्याचा लढा त्यांच्यापासूनच सुरु होतो. त्यांना अन्य मांडलिक सरदार व रजवाड्यांचे थोडे जरी सहकार्य लाभले असते तर भारताचा इतिहासच बदलून गेला असता. 

त्यांचा राज्याभिषेक महत्वाचा यासाठी आहे कि अन्यायाविरुद्ध आणि पारतंत्र्याविरुद्ध केला गेलेला तो पहिला एल्गार होता. याचे आपण कृतज्ञतापूर्ण स्मरण ठेवले पाहिजे!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...