Monday, December 25, 2023

समाजाचे हित होत नसेल तर अशा आमदरक्या आणि मंत्रिपद आम्ही फेकून देऊ : महादेव जानकर

समाजाचे हित होत नसेल तर अशा आमदरक्या आणि मंत्रिपद आम्ही फेकून देऊ : महादेव जानकर

वर्धा (१७/१२/२०२३) : यशवंत नायक ब्यूरो 

ज्या मंत्रिपदामुळे आणि आमदारकीमुळे समाजाचं हित होत नसेल तर असल्या आमदारक्या आणि मंत्रिपदं आम्ही फेकून देतो. त्या आमदारक्या आणि मंत्रिपदाशी आम्हाला काही देणंघेणं नाही, अशा शब्दांत महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावर लढण्याची आक्रमक भूमिका स्पष्ट केली.


वर्धा ओबीसींचा चौथा महाएल्गार मेळावा झाला. त्यात माजी मंत्री महादेव जानकर बोलत होते. ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ओबीसींचे तुफान वादळ चालले आहे. मात्र, खासदार रामदास तडस मला सांगत होते की, वर्धा जिल्ह्यात एक खासदार आणि चारपैकी तीन आमदार हे ओबीसींचे आहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारखी आमच्याकडे धग नाही. पण तडस साहेब, थोड्या थोड्या लोकांनीच या देशाचा इतिहास घडविला आहे. भुजबळ यांना मी सांगू इच्छितो की, नाउमेद व्हायचं नाही. ज्या समाजासाठी आपला संघर्ष सुरू आहे, त्यांना आपली भाषा कळालेली नाही. पण हा लढा आपणच जिंकणार आहोत. सभागृहात अनेक आमदार मताच्या दृष्टीने दोन्ही बाजूंकडून बोलत होते. पण, हा महादेव जानकर मी बोललो की, एकाच माणसाला खलनायक करता येणार नाही. घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.


ते म्हणाले की, या देशावर खरं तर ओबीसींचं राज्य असायला पाहिजे होते. मात्र, आमच्यातील कमजोरीमुळे नको त्या माणसाच्या हातात सत्ता असल्यामुळे आम्हाला भीक मागावी लागते आहे, हे आपलं दुखणं आहे. ज्याची लायकी नाही तो सत्तेत बसले आहेत. पण आमची लायकी असतानाही आम्हाला सत्तेत बसता येत नाही. ही व्यवस्था बदलली पाहिजे. ओबीसींनो तुम्ही जागे झाले पाहिजे.


आम्ही आमच्या पोरांबाळांसाठी करत नाही. तरीही आम्हाला खलनायक ठरवलं जात आहे. पण आम्ही खलनायक नाही. छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केली आहे. पण, आजही अशा काही जाती आहेत. त्यांच्या घरात स्वातंत्र्याची पहाट उगवली नाही. काही जातींचे अजूनही एकही नगरसेवक झालेला नाही. त्याचा विचार बहुजन समाजातील लोकांनी केला पाहिजे. तुम्ही सत्ताधारी बनायला लागले पाहिजे, असे आवाहनही जानकर यांनी केले.


ओबीसींच्या हक्काला धक्का लागणार नाही, याची जबाबदारी कॅप्टन छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, प्राचार्य बबनराव तायवडे आणि रामदास तडस आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. सभागृहात आमच्यातील काही लोकं खलनायकी करत होते. पण मी आमदार आहे. पुढच्यावेळी मी खासदार असणार आहे. तोही माझ्या पक्षाचा असणार आहे. काँग्रेस किंवा भाजपचा असणार नाही, असेही जानकर यांनी ठणकावले.


मराठा समाजाला आमचा विरोध नाही. पण आमच्या ताट्यातील घेण्याच्या भानगडीत पडता आहात, त्यामुळे आम्हाला हा संघर्ष करावा लागत आहे. आमच्या ५२ टक्के असलेल्या ओबीसींचे अजून नऊ टक्केही आरक्षण भरलं गेलं नाही. आम्हाला ४५ कोटींचंही बजेट दिलं जात नाही. काय त्या सत्तेला करायचं आहे, असा सवालही जानकर यांनी केला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...