जनतेचा काँग्रेस, भाजपकडून भ्रमनिरास : महादेव जानकर
विदर्भ राष्ट्रीय समाज पक्षाचा बालेकिल्ला व्हावा यासाठी प्रयत्न
दर्यापूर (२३/११/२०२३) : यशवंत नायक ब्यूरो
भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, जनतेचा त्यांच्यापासून पुरता भ्रमनिरास झाला आहे, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोडले. रासपच्यावतीने दर्यापूर जिल्हा- अमरावती येथे आयोजित विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने आ. जानकर आले होते. तत्पूर्वी त्यांनी अमरावतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
श्री. जानकर म्हणाले, एकट्या समाजावर पक्ष चालत नाही. राष्ट्रात राहणारे सर्वच समाज हा राष्ट्रीय समाज आहे. धनगर समाजाला आदिवासी योजनेचा जीआर मीच काढला होता. धनगर समाजाच्या मुलांना हॉस्टेलसाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. दुधाचा मंत्री असताना सर्व निधी विदर्भ आणि मराठवाड्याला देण्याचा प्रयत्न. केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. लहान लहान पक्षांना सोबत घेऊन सत्तेची लालूच दाखवून पक्ष संपविण्याची एकमेव नीती भाजपची राहिली आहे. अकाली दल व अनेक पक्ष त्याचे उदाहरण आहे. राज्यात रासप हा पक्ष भाजप आणि काँग्रेस विरोधात लढणार आहे. आम्ही भाजपचे मित्र पक्ष असताना आम्हाला सुद्धा भाजपमध्ये पक्ष विलीन करा असे सांगण्यात आले होते. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला कोण ओळखत नव्हते. आम्ही भाजपसोबत होतो म्हणूनच भाजपला सत्ता मिळाली. विदर्भ राष्ट्रीय समाज पक्षाचा बालेकिल्ला व्हावा यासाठी पक्षाची ताकद विदर्भात वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
अमरावतीतही उमेदवार देणार
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी सुरू असून अमरावती लोकसभा व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. आमचा पक्ष आता कुणासोबतही आघाडी करणार नाही, असे स्पष्ट केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मला मुलगा मानला आहे. त्या नात्याने पंकजा मुंडे या माझ्या बहिणी आहेत. आमच्या पक्षाचे जर १४५ आमदार निवडून आले तर, मी माझ्या बहिणीलाच मुख्यमंत्री करेल, अशी घोषणा आ. जानकर यांनी केली. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, विदर्भ अध्यक्ष प्रा. रमेश पिसे, विदर्भ उपाध्यक्ष तौसीफ शेख, अजित पाटील, दत्ता मेश्राम, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment