धनगर आरक्षण पदयात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत
अनुसूचित जमाती आरक्षण अमंलबजावणीसाठी दिनांक ४ डिसेंबर ला मंत्रालयावर धडक
कळंबोली : दहिवडी या ठिकाणी उपोषणकर्ते यांना दिलेले आश्वासनाचे पूर्तता न करता, वेळ संपल्यानंतर समिती नेमून धनगर समाजाची फसवणूक करत असलेल्या राज्य शासनाला जाग आणण्यासाठी, तसेच राज्य व केंद्र सरकारने धनगर समाज बांधवांची अनुसुचित जमाती आरक्षणाची अमंलबजावणी तत्काळ करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे दिनांक २१ नोव्हेंबर पासून म्हसवड ते मंत्रालय काढण्यात आलेली पदयात्रा दिनांक १ डिसेंबर रोजी मुंबईचे प्रवेशव्दार असणाऱ्या कळंबोली शहरात दाखल झाली. यावेळी कळंबोली, कामोठे, करंजाडे येथील धनगर समाज बांधवांनी कळंबोली कॉलनी येथे धनगर समाज आरक्षण पदयात्रेचे ढोल कैताळसह वाजत गाजत जोरदार स्वागत केले.
म्हसवड येथून मंत्रालयाच्या दिशेने निघालेले माणदेशी युवक उत्तम विरकर, शरद गोरड, सुरेश गोरड, नितीन सुळ, वैभव गोरड यांचे टाळ्या वाजवून अभिंनदन केले. आरक्षण आमच्या हक्काचे, धनगर आरक्षण एकजुटीचा विजय असो, धनगर बांधवांची एकच मागणी - एस. टी आरक्षणाची अंमलबजावणी, एकच मिशन - धनगर आरक्षण, यळकोट यळकोट जय मल्हार अशा घोषणांनी पदयात्रा मायाक्कादेवी मंदिरपर्यंत पोहचली. मायाक्कादेवी मंदिरात पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले. कळंबोली कामोठे शहरातील सर्वपक्षीय धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडत सरकार विरोधात धनगर समाज आक्रमक असल्याचे स्पष्ट केले.
दि. ४ डिसेंबर रोजी ही पदयात्रा मंत्रालयावर जाऊन धडकणार आहे. यावेळी माजी नगरसेविका मोनिकाताई महानवर, सुदामशेठ जरग, अशोक मोटे, आण्णासाहेब वावरे, प्रा. एन.पी खरजे, विद्याताई तामखडे, शीतल दिंडे, रावसाहेब बुधे, शशिकांत मोरे, हरी लवटे, आशुतोष शेंडगे यांच्यासह हजारो धनगर समाज बांधव पदयात्रेत सहभागी झाले.
No comments:
Post a Comment