Wednesday, December 27, 2023

आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही : छगन भुजबळ

आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही : छगन भुजबळ

ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ

अंबड (१७/११/२०२३) : प्रतिनिधी

आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ७५ वर्ष झाली, दलित समाजाला संविधानानं आरक्षण दिलं, कलेक्टर झाले, आयपीएस झाले पण गरिबी दूर झाली नाही. ओबीसींची गरिबी दूर झाली नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. वर्षानुवर्षे जे दबलेले आहेत, पिचलेले आहेत त्यांना वर आणायसाठी आरक्षण आहे, ते समजून घ्याव असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले. ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे पार पडली. छगन भुजबळ यांनी भाषणाच्या सुरुवातीलाचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण केलं. 

भुजबळ पुढे म्हणाले, जालना जिल्ह्यात ६ जून १९९३ ला महात्मा फुले समता परिषदेची सभा झाली. त्या सभेत ओबीसी आरक्षण मंडल आयोग लागू करुन देण्याची मागणी केली. मंडल आयोग हा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला आणि ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मंडल यांचे सहकारी देशभर फिरले. आज मराठा समाजाचे नवे देव निर्माण झालेत त्यांचं म्हणनं असं आहे की धनगर, माळी, तेली मध्येच घुसले आहेत पण तुम्ही समजून घ्या, त्यांना कळणार नाही त्यांच्या डोक्या पलीकडील गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० व्या कलमात सांगितलं होतं की ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. १३ एप्रिल १९६८ ला ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. मंडल आयोगानं आरक्षण दिलं त्यावेळी पण कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टात ९ न्यायमूर्ती बसले होते, त्यात महाराष्ट्रातील थोर विचारवंत न्यायमूर्ती पी. बी. सावंत देखील त्यामध्ये होते. सुप्रीम कोर्टाच्या शिक्क्यानिशी मार्च १९९४ आरक्षणाचा जीआर निघाला.

सुप्रीम कोर्टानं इंद्रा सहाणी प्रकरणानंतर आयोग करुन ओबीसींना आरक्षण द्यायचं असं सांगितलं होतं. १६ नोव्हेंबर १९९२ ला आरक्षण देण्याचे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारकडून आयोगांकडे गेले होते. १९९२ नंतरच्या सगळ्या आयोगांनी देता येणार नाही हे सांगितलं हा आमचा दोष आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. आम्हाला आरक्षण संविधानानं, सुप्रीम कोर्टानं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे पण त्यांना काहीच माहिती नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

या ओबीसी एल्गार मेळाव्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, लक्ष्मण गायकवाड, प्रा. टी. पी. मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. राजेश राठोड, आ. देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...