महाराष्ट्रात सत्ताधारी तर विरोधक कोण हे समजत नाही? - महादेव जानकर
![]() |
सिंधूदुर्ग जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष मेळाव्यात बोलताना आ. महादेव जानकर. |
कुडाळ-सिंधुदुर्ग : यशवंत नायक ब्यूरो
आज महाराष्ट्रात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण आहे? कोणती विचारधारा, आयडोलोजी कोणती समजत नाही, अशा शब्दांत महादेव जानकर यांनी राज्यांत सुरु असलेल्या राजकारणावर जोरदार टोला लगावला आहे. आमचा राष्ट्रीय समाज पक्ष राज्यातील ४८ लोकसभा मतदार क्षेत्रात स्वबळावर लढणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे मराठा समाज हॉल मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात आ.महादेव जानकर बोलत होते.
आ. जानकर पुढे म्हणाले, मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी जनस्वराज यात्रा सुरू आहे. फुले, शाहू, आंबेड़कर यांची विचारधारा घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. पक्षाला वीस वर्ष पूर्ण होत असून, विसावा वर्धापन दिन सोहळा २९ आँगस्टला पुणे येथे साजरा करणार आहोत, महाराष्ट्रात सत्ता कोणाची हेच समजत नाही. येत्या काळात विधानसभेत आमचे २० आमदार जिंकून येतील, असा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चमत्कार घडेल. महाराष्ट्रातील जनता सत्य जाणते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पक्षांचे मनसुबे उधळले जातील"
भाजप आणि ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत युती केली; पण पक्षाला सापत्न वागणूक मिळाली. मोठा मासा छोट्या माणसाला गिळतो, ही भाजप आणि कॉँग्रेसची पॉलीसी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष देशातही सक्रिय आहे. उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, कर्नाटक राज्यात स्थान निर्माण केले. येत्या काळात कोकणातही पक्षाचे काम वाढविणार आहे. कोकणात १५ दिवस दौरा करणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात यश मिळाले आहे; पण कोकणात पक्ष कमी आहे. पक्षाला कोकणात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश नक्कीच मिळेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.
सत्ता आमच्याशिवाय बनू शकणार नाही, हे दाखवून देऊ, असा इशारा देऊन जानकर म्हणाले, राज्यातील सर्व विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार असून, महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राष्ट्रीय समाज पक्ष खाते उघडेल. यावेळी बबन बोडेकर व सिंधुदूर्ग जिल्हा यांच्याकडून ५५ हजार रुपये नोटांचा हार घालण्यात आला. जिल्हा दौऱ्यात आ. जानकर यांनी अनेक राजकीय गाठीभेटी घेतल्याने भविष्यात नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
भिडेंवर योग्य ती कारवाई शासनाने करावी : जानकर
वारंवार युग पुरुषांवर बोलून संभाजी भिडेंकडून त्यांचा अपमान केला जातोय. भिडेंना यातून काय अभिप्रेत आहे? समाजा-समाजामध्ये त्यांना भांडणं लावायची आहेत का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे संभाजी भिडेंवर योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे.
यावेळी आ. जानकर यांच्या समवेत कोकण विभागाचे अध्यक्ष भगवान ढेबे, कोकण विभाग संघटक तानाजी गुरव, सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष एड. किशोर वरक, जिल्हा सरचिटणीस जाफर शेख, जिल्हा संघटक राजेंद्र माने, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश झोरे, आदी पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment