भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांचे भविष्य : राष्ट्रीय समाज पक्ष
आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुसंख्यांक हिंदू समाजाला ज्ञानाची, शिक्षणाची कवाडे खुली करून दिली, त्या पुणे शहरात उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या अनुषंगाने आमचे मित्र 'धनगर माझा'चे संपादक श्री. धनंजय तानले यांचा फोन आला, रासपच्या वर्धापन दिनानिमित्त लेख लिहिलाय का? मला लेख लिहायचा आहे, पण माझ्या व्यस्त कामातून मी लिहलेला नाही, पण तुमच्यासाठी मी जरूर लेख लिहीन असा त्यांना शब्द दिला. मी विटा - मायणी प्रवासात होतो, माझ्या दुचाकीचा बिघाड झाल्याने मायणी ता- खटाव येथे दुरुस्तीला घेऊन गेलो. तेथे असणारे निलेश मिस्त्री यांना बोललो, तुम्ही गाडी दुरुस्त करा, मला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त धनगर माझाच्या वाचकांसाठी लेख लिहायचा आहे. त्यावर मिस्त्री बोलत होते, आता जानकर साहेबांनी फिरायची आवश्यकता नाही. त्यांनी अनेक निवडणुका लढल्या, त्यांनी समाजाला जागृत केले. त्यांच्या पक्षातून चांगले उमेदवार लढले. जानकर साहेब हे स्वाभिमानी नेतृत्व आहे. त्यांनी व्यासपीठ उभे करून दिले आहे. आता युवकांनी पुढे येऊन जानकर साहेबांना साथ दिली पाहिजे. रासपचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जुन्या पुढाऱ्यांच्या नादाला लागू नये. मटण, पैसे अशा प्रलोभनाला बळी न पडता आपल्या सन्मानासाठी स्वतःच अस्तित्व दाखवण्याची संधी केवळ जानकर साहेबामुळे आली आहे. या संधीच सोन करायचं हे युवकांच्या हातात आहे. जानकर साहेब बोलतात त्याप्रमाणे करतात. येत्या निवडणुकीत जानकर साहेबांच्या पक्षाचे आमदार निवडून दिले तर खरोखरच ते म्हणतात तसे मुख्यमंत्री कुणाला करायचे जानकर साहेब ठरवतील.
भारतात धनगर समाजातून अनेक लोकांनी राजकीय पक्ष जन्माला घातले, काही दिवस चालवले, पुढे थांबले, स्वतःच संपले. अलीकडेच कर्नाटक राज्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेले सिद्धरामय्या जनता दलात कार्यरत असताना, त्यांचे पक्षप्रमुखांशी बिनसले. पुढे त्यांनी जनता दलातून बाहेर पडून, स्वतःचा पक्ष काढण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वडील एस. आर. बोम्मई यांचा प्रगतीपर जनता दल सिद्धरामय्या यांनी स्वतःकडे घेऊन एक स्थानिक नगरपालिका निवडणुक लढली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, आपण पक्ष चालवू शकत नाही. तो पक्ष जेमतेम फक्त आठ महिने चालला. सिद्धरामय्यानी तो पक्ष गुंडाळून ठेवला. पुढे ते बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी पार्टी अशा वेगवेगळ्या पक्षांच्या शोधात गेले. असे करत शेवटी ते काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. प्रवेश केल्यानंतर त्यांना दोन वर्षे पक्षात स्थान दिले नाही. हळूहळू सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षात बस्तान बसवत कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची दोन वेळा शपथ घेतली. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर धनगर समाज बांधवांच्या प्रेमाखातर ते महाराष्ट्रातही आले होते. तत्पूर्वी ते सांगलीमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला आले होते. सिद्धरामय्यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी धनगर समाज खुणावतोय पण राष्ट्रीय नेतृत्व करण्यासाठी जे कौशल्य लागतं ते त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते मर्यादित ठरत आहेत. इकडे महाराष्ट्रात रासपची स्थापना झाल्यानंतर भाजपचे सर्वात मोठे नेते, विरोधी पक्षनेता, सर्वाधिक खात्याचे मंत्री असणारे अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमधून बाहेर पडून लोकराज्य पार्टी काढली. लोकराज्य पक्ष फक्त दोन वर्षे चालला. अण्णासाहेब डांगे यांच्याकडे सूतगिरणी, शिक्षण संस्था आहे, तरीही त्यांनी पक्ष बंद करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपल्या रोखठोक विधानासाठी प्रसिद्ध असणारे अनिल अण्णा गोटे यांनी लोकसंग्राम पक्ष काढला. त्यांनी धुळे शहरातून आमदारकी जिंकली. पुढे त्यांचा प्रवास भाजपमध्ये झाला. आता ते राष्ट्रवादी पक्षात कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक पार्ट्या जन्माला आल्या, पण त्यातली एकही पार्टी टीकलेली नाही. वर्ष दोन वर्षासाठी पक्ष काढतात, दबावगट तयार करतात, त्यांचा सत्तेत भागीदारी मिळवणे हा हेतू नसतो, केवळ झोळी बनवून आपल्या झोळीत काय तरी मिळावे यासाठी ते काम करतात. बाकीच्या राज्यात तर न लिहलेच बरं.
असे सर्व असताना भारताच्या विशाल भूमीत दिनांक ३१ मे २००३ रोजी महाराणी अहिल्यामाता होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा केली. तत्पूर्वी महादेव जानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 'आपला प्रतिनिधी, आयपीएस, आयएस अधिकारी शोधयात्रा' काढली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे २९ ऑगस्ट २००३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची अधिकृत नोंदणी झाली. सहा महिन्यातच कोणतीही साधन, माहिती, अनुभव नसताना महाराष्ट्रात १२ आणि कर्नाटकातून १ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीला सामोरा गेला. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखवले. पुढे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवून अनेक मतदारसंघात दखलपात्र मते मिळवली. रासपने पुढे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, सार्वत्रिक विधानसभा निवडणुका स्वतःच्या ताकतीवर लढल्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली. २००९ च्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत रिडालोस प्रयोग केला. मराठवाडा विभागात अहमदपूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने प्रथमच खाते उघडले. राष्ट्रीय समाज पक्षाचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती झाली. रासपने पश्चिम महाराष्ट्रात दौंड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवत आपले अस्तित्व राखले. दरम्यान ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी निवडणुका लढवून अनेक ठिकाणी यश मिळवले. गुजरात राज्यात प्रधानमंत्री निवडून गेलेल्या बडोदा लोकसभा मतदार क्षेत्रात येणाऱ्या बडोदा महानगरपालिकेत भाजप काँग्रेसला समोरासमोर थेट लढत देऊन रासपने आपले आठ नगरसेवक जिंकून आणले. पुढे जानकर साहेब लोकांच्या इच्छेखातर आमदार झाले. मंत्री झाले. राज्यमंत्रीपद, जिल्हा नियोजन समिती, शासकीय कमिटी यावर रासपच्या शिलेदारांची वर्णी लावली. पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या जागा देण्याचे आमिष दाखवून राष्ट्रीय समाज पक्षाला शांत केले. महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्ली लक्ष्य करून निघालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला महाराष्ट्रातच संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी महादेव जानकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बाहेर लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर भारतातील सहा राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठ्या ताकतीने उमेदवार उभे केले. महादेव जानकर साहेब यांनी देशभरात उमेदवारांचा प्रचार केला. लक्षणीय मते मिळवली, राष्ट्रीय समाज पक्षाचे देशात अस्तित्व सिद्ध केले. पुढे विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन जागा देऊ केल्या, त्याही विश्वासघात करून पळवल्या. एकमेव गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचा उमेदवार कारागृहात जानकर साहेबांचा फोटो, चिन्ह घेऊन रणमैदानात लढला. विजय मिळवला. भाजपने रासपला कायमचे मारून टाकण्यासाठी प्रयत्न केला, पण महादेव जानकर यांच्या नेतृत्वात गंगाखेडच्या विजयाने राष्ट्रीय समाज पक्षाला नवसंजीवनी मिळाली.
राष्ट्रीय समाज पक्षावर अनेक संकट आली, रासपने अनेक चढ उतार पाहिले. राष्ट्रीय समाज पक्षाची 2003 सालापासून कठीण परिस्थितीतून सुरुवात झाली. अनेक खचखळगे आडवे आले, त्यातूनही सावरत स्वयंभूपणे राष्ट्रीय समाज पक्ष चालत राहिला. स्वाभिमानाची, दिल्लीची भाषा बोलत राहिला. विश्वासू सर्वसामान्य जनतेच्या साथीवर, स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावर, आपली स्वतंत्र मानवतावादी विचारधारा घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष ताट मानाने लोकशाही भारतात २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतात धनगर समाजात अनेकांनी पक्ष काढले. लोकशाही राजकरणात टिकले नाहीत. एकमात्र महादेव जानकर असे नेते आहेत, पुरेस साधन नसताना केवळ मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय समाज पक्षाला वेगळ्या उंचीवर पोहचवले आहे. महादेव जानकर आणि एकूणच राष्ट्रीय समाज पक्ष रानामाळातून संसदभवनाच्या दिशेने प्रवास सुरू आहे. भारताच्या राजकारणाला वेगळी दिशा रासपच्या माध्यमातुन देऊ पहात आहेत. जगजेत्या सिकंदराला हरवणाऱ्या धनगरपुत्र चंद्रगुप्त मौर्याचा वारसा सिद्ध करायच्या प्रयत्न करत आहेत. सम्राट अशोकाने निर्माण केलेला सुवर्णमय भारत घडवू इच्छितात. टिव्ही वरचा नेता न बनता, थेट जनतेच्या हृदयात जागा निर्माण करणारे महादेव जानकर जन स्वराज यात्रेच्या माध्यमातुन थेट जनतेत जात आहेत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. दडपलेल्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. दिल्ली काबीज करण्याची भाषा बोलत आहेत. संधी एकदाच येते त्याप्रमाणे लोकसभेत आपला उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्यासाठी तमाम लोकांनी राष्ट्रीय समाज पक्षास ताकद देऊन स्वतःचे लोकशाहीतील मूल्य वाढवावे. लोकशाही देशात सत्ता मिळवण्यासाठी मते मिळवावी लागतात. निवडणुकीत मते मोजतात, पैसा मोजत नाहीत. दाखलपात्र समाजाला दखलपात्र समाज बनण्यासाठी रासपला मतांचे पाठबळ देऊन सत्तेत बसवण्याची योग्य वेळ आलेली आहे. अमेरिकेत मतदारद्वारे बदल होतो. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होतात. मग भारतात देखील मतदारांनी मनावर घेतले तर सत्तेचे चित्र बदलू शकतात. भारतीयांनी देखील केवळ 'मत'दान न करता मताधिकारद्वारे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षास सत्तेत जाण्याचा मार्ग बनवावा. येणारी प्रत्येक निवडणुक खूप महत्वाची आहे. तुमचे आमचे भविष्य ठरवणारी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष अधिक जोमाने वाढावा, लोकसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संसद सदस्य, विधानसभेत विधीमंडळ सदस्य निवडून जावेत यासाठी शुभेच्छा. जय भारत..!
- आबासो पुकळे, माजी उपसंपादक दैनिक केसरी.
(२८/८/२०२३)
No comments:
Post a Comment