देशाची सत्ता मिळवायची असल्याने संघर्ष हा करावाच लागेल : आ. महादेव जानकर
मुंबई महानगरपालिका प्रचारासाठी प्रत्येक ठिकाणी पोहचणार
मुंबई | (३०/०८/२३) ए. पी. यशवंत
टीका टिपणी करून काही होणार नाही. आपण आपली ताकद वाढवली पाहिजे. शांत डोक्याने चालले पाहिजे. आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही. कोर्ट पोलीस कचेरी यात वेळ जाऊन कार्यकर्ता बरबाद होतो. आपल्याला देशाची सत्ता ताब्यात घ्यायची आहे, त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल. त्यांनी आपल्याला रोखले तर आपण त्यांना सत्तेत जाण्यापासून रोखू,असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. मुंबईतील ६ लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित जन स्वराज यात्रेत वायबी सेंटर सभागृहात मार्गदर्शन करताना आ. महादेव जानकर बोलत होते.
आ. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाची पार्टी आहे. गुजरातमध्ये मुस्लिम, ब्राह्मण,जैन, मराठा, ठाकूर, परमार समाजाचे नगरसेवक रासपातुन जिंकले. काँग्रेसला हटवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो. मी स्वतः भाजपपासून दूर गेलो तर भाजप सत्तेत राहणार नाही, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.
मी मीडियावर अवलंबून असणारा नेता नाही. कोणी छापो अगर न छापो, माझं काम मी करत राहतो. हवेत फिरणारा मी नेता नाही. जनतेत जाऊन काम करणारा नेता आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ वार्ड फिरणार आहे. सोबत कोण येऊ न येऊ आपला स्वतंत्र मार्ग आहे. वाराणसी, मेहसाणा, गांधीनगर, बंगळूर, इटावा, कोलार आदी मतदारसंघात जन स्वराज यात्रेचे नियोजन करावे. आम्ही जिंकणारी माणसे आहोत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक जिंकण्यासाठीची तयारी करा. एक सभा झाली तर तेथील आमदार पडला पाहिजे, अशी तयारी ठेवावी लागेल. शनिवार रविवारी जन स्वराज यात्रेचे नियोजन न करता इतर वारी देखील यात्रेचे नियोजन करावे, तरच 543 मतदारसंघात जन स्वराज यात्रा पोहोचेल. जर मी लोकांना पैसे दिले तर माझ्यामागे ईडी लागेल. लोकांकडून पैसे घेतले तर ईडी कशी माझ्यामागे येईल? असा टोला लगावला.
महाराष्ट्रात संभाव्य उमेदवारांची यादी तयार
राष्ट्रीय समाज पक्षाची 48 लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगून महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेब लेंगरे, काशिनाथ शेवते, रविंद्र कोठारी, तोसिफ शेख, भाऊसाहेब वाघचौरे यांचा संभाव्य उमेदवार म्हणून नामोल्लेख केला.
येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. जनतेत मिसळणारे, जनतेत राहणारे नेते रासपला घडवायचे आहेत. महाराष्ट्रात निश्चितपणे बदल घडवू. उत्तर भारतीयांनी पक्षाचे नेतृत्व करावे. या देशावर जनतेचे राज आले पाहिजे, यासाठी जन स्वराज यात्रा सुरू आहे. यापूर्वी अनेक यात्रा काढल्यामुळे पक्ष इथपर्यंत पोहचला. राष्ट्रीय समाज पक्षाला देशाची सत्ता पाहिजे. आमच्या योजना आम्ही बनवू. आम्ही 1000 कोटी रुपयांची योजना दिली पण ती योजना राबवण्यासाठी त्याच समाजाचा मंत्री पाहिजे. लवकरच दिल्लीच्या रामलीला मैदानावर दहा लाख लोकांचा मेळावा घेऊ. चौंडीमध्ये महारानी अहिल्याबाई होळकर जयंतीस ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले, त्यादिवशी मी चोंडी सोडली. आता दिल्लीच्या अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमाला पंतप्रधान येतील, असा मनोदय आमदार महादेव जानकर यांनी बोलून दाखवला. या सभेत ईशान्य भारत प्रभारी रामभाई पाल, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्र्वर सलगर, जिवाजी लेंगरे, राम पाल, अजित पाटील, सुवर्णा जऱ्हाड व मुंबई शहर पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.
Great sir👏👍
ReplyDelete