कांद्याला भाव नसल्याने पुणे - अहमदनगर महामार्गावर राष्ट्रीय समाज पक्षाचा रास्ता रोको
शेतकरी वाचवा देश वाचवा : रासपची जोरदार घोषणाबाजी
शिरूर : शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा, कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा, थकीत वीजबिल माफ करावे, गायरान जमिनी मेंढपाळ, पशुपालक यांचेसाठी खुली करावेत आदींसाठी आज शिरूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पुणे - अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. कांद्याच्या माळा गळ्यात घालत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेनी जोरदार घोषणाबाजी केली. रासपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे, त्यामुळे अर्थातच बाजारपेठेत आवक चांगली आहे. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जातो आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रती क्विंटल १५०० रू खर्च येतो परंतु आज बाजारात ३०० ते ५०० रू क्विंटल दराने विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होणार आहे, तरी महाराष्ट्र शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १००० रूपये अनुदान देण्यात यावे आणि यापुढे कांद्याला प्रती क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. आंदोलनात रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, ज्येष्ट नेते रामकृष्ण बिडगर, सागर देवकते व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment