Tuesday, August 27, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानाची २१ वर्ष

राष्ट्रीय समाज पक्ष 
स्वाभिमानाची २१ वर्ष 

ना राजकीय वारसा, ना पैसा! केवळ स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते सत्यात उतरविण्यासाठी कितीही मेहनत घ्यायची तयारी. या जोरावरच एका मेंढपाळाच्या मुलाने आपला पक्ष महाराष्ट्रच नव्हे तर देशातील चार राज्यात दखलपात्र पक्ष बनवला. एवढेच नव्हे तर, देशातील २३ राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाने आपले कमी किंवा जास्त प्रमाणात अस्तित्व निर्माण केले आहे. दुसऱ्याच्या महलात राहण्यापेक्षा स्वत:ची झोपडी महत्वाची, "आयएम नॉट डिमांडर , वी आर ए कमांडर," हे वाक्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या तोंडात नेहमी असते. आयुष्यात सर्वात महत्वाचे काय असेल तर तो "स्वाभिमान". तो कोणत्याही परिस्थीतीत जपला गेलाच पाहिजे हे आज वरच्या वाटचालीत त्यांनी नेहमी दाखवून दिले आहे. सर्वसामान्यांच्या हातात सत्ता आणण्यासाठी सुरू झालेली त्यांची लढाई २१ वर्षात पोहचली आहे. राज्यातीलच नव्हे तर, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या देशातील प्रत्येक युवकांसाठी रासपची ही २१ वर्षाची स्वाभिमानाची लढाई एक प्रेरनास्थान बनली आहे. राज्याच्या सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये या लढाईची नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंद होणारी अशीही संघर्ष कहाणी आहे. 

महादेव जानकर : स्वाभिमानी राष्ट्रीय नेता

मोदी सरकारच्या काळात देशातील अनेक दिग्गजांना नमते घ्यावे लागले. देशातील महत्वाच्या राजकीय स्थित्यंतराच्या काळात महादेव जानकर यांनी आपला स्वाभीमान नेहमीच जपला. त्यामुळेच अनेक बडया हस्ती लोकसभेच्या तिकिटासाठी रांगेत थांबले असताना, महादेव जानकर यांना महायुतीने बोलावून उमेदवारी बहाल केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारासाठी आले, महादेव जानकर हे माझे भाऊ आहे, अस संबोधले. असा हा नेता संघर्षातून तयार झालेला आहे. महादेव जगन्नाथ जानकर देशाच्या राजकारणातील लाखात एक असे व्यक्तिमत्त्व आहे. सुशिक्षित, उच्च ध्येय, दूरदृष्टी, स्पष्ट लक्ष्य, सातत्यपूर्ण कार्यक्रम, राजकीय ध्येयवाद, अथक परिश्रम, त्याग, संघर्ष तसेच ज्ञान आणि नीतीचा उत्कृष्ट संगम आहेत. राज्याचे मंत्रिपद भोगलेल्या या नेत्याला गर्वाने कधीच शिवले नाही. आजही ते कार्यकर्त्याच्या गराड्यातच त्यांच्यातीलच एक होऊन मिळून जातात. अशा या राष्ट्रीय नेत्याचा जन्म नेहमी भटकंतीवर असणाऱ्या माता गुणाबाई आणि पिता जगन्नाथ यांच्या पोटी सातारा तालुक्यातील वाढे गावातील एका रानमाळावर झाला. गावी, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत इंजिनिअर झाले. कॉलेज जीवनापासून नेतृत्व करणारे महादेव जानकर १९९३ साली ‘यशवंत सेना प्रमुख’ बनले. चांगली नोकरी करून सुखाचा संसार थाटण्याचे सोडून, तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करून, ‘समाजाचा संसार’ थाटण्याचा निर्धार महादेव जानकर यांनी केला. ‘घरी जाणार नाही, नातेसंबंध ठेवणार नाही, लग्न करणार नाही आणि ‘राष्ट्रीय समाज’ला सत्ता, संपत्ती, सन्मान मिळवून देण्यासाठी आजन्म कार्यरत राहीन,’ अशी भीष्म प्रतिज्ञा ‘महादेव’ यांनी घेतली. एका खडतर प्रवासाचा आरंभ महादेव जानकर यांनी सुरू केला. १९९३ ते आजतागायत या शपथेस जागले आहेत. २९ ऑगस्टला त्यांच्या या राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रवासाला २१ वर्षे पुर्ण होत आहेत.

 सर्व समाज घटकांबाबाबत ममत्व बाळगून यशवंत सेनेत कार्यरत असताना ते मान्यवर कांशिराम यांच्याकडे आकर्षित झाले. कांशिरामांना भेटायला गेले. त्यांची प्रतिज्ञा ऐकून तेही प्रभावित झाले. ‘हमे तो हम जैसा एक और पागल मिल गया,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. पहिल्या भेटीतच त्यांनी महादेव जानकरांना मुलगा मानले. प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्याबरोबर असायचे. त्यांचे केडर कँप प्रशिक्षण घेतले. समाजाची व सिस्टमची माहिती जाणून घेतली. बहुजन समाज पक्षातून (बीएसपी) त्यांनी पहिल्यांदा नांदेडची लोकसभा लढली. त्यावेळी बीएसपीच्या उमेदवारांमध्ये त्यांना राज्यात सर्वाधिक मते मिळाली होती. प्रस्थापित पक्षात हे नेते आपले आणि आपल्या समाजाचे स्थान शोधत असताना महादेव जानकर यांनी आपला राजकीय पक्ष स्थापन करून केवळ धनगरच नव्हे तर तमाम उपेक्षित, दुर्लक्षित, दलित, मागास ‘राष्ट्रीय समाजा’साठी स्थान शोधत आहेत. ब्राह्मण, मराठा ते जैन, मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतात. ‘एकात्म राष्ट्र निर्माण’ हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्यासारखी दुसऱ्या कोणा राजकीय नेत्याची वाटचाल नाही. 

राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना

"राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाति, राष्ट्र ही धर्म हमारा, राष्ट्र बने बलशाली यह भाषासूत्र हमारा !" ही रासप पक्षाची सामाजिक- राजकीय विचारधारा आहे. सत्यशोधन! समाज प्रबोधन!! आणि राष्ट्र संघटन!!! ही त्यांची त्रीसूत्री आहे. राष्ट्र सर्वापरी मानणारा समाज-राष्ट्रीय समाज हा पक्षाचा सामाजिक आधार आहे. ब्राह्मण, मराठा ते जैन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन पासून भारतात राहणाऱ्या सर्वदूर पसरेल्या बहुभाषिक राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानले जातात. राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन मानून महादेव जानकर कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या हतात सत्तेची दोर असेली पाहिजे या हेतूनेच त्यांनी ३१ मे २००३ रोजी चौंडी येथे पक्षाची घोषणा केली. पुढे २९ ऑगस्ट २००३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय समाज पक्ष नोंदणीकृत पक्ष झाला. उपेक्षित, दुर्लक्षित बहुजन समाजाला ओबीसी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक समाजाला सत्तेत घेऊन जाणे, हे त्यांनी मुख्य लक्ष्य केले. त्यातून ते राज्यात बहुसंख्य बहुजनांचा नेता म्हणून पुढे आले. धनगर समाजातून कामाला सुरुवात केली तरी त्यांनी पक्षाला व त्यांच्या कार्याला कोणत्याही एका जातीच्या चौकटीत अडकविले नाही. समतावादी समाज व्यवस्थेचे प्रेषक असल्यामुळे मराठा, माळी, साळी, कोळी, वाणी, वंजारी, मुस्लिम अशा सर्वच बहुजन समाजाने त्यांना साथ दिली. पक्षाचा पहिला आमदार मराठा समाजाचा. नंतरही मराठा समाजाचा आला, हेच त्यांच्या विचारधारेचे यश आहे. त्यातून संपूर्ण देशभरात महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे. 


२३ राज्यांत रासपचे अस्तित्व

पक्ष स्थापनेनंतर रासपाने ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही. २००९ साली पक्षाचा एक आमदार निवडून आणला. स्वत: महादेव जानकर यांनी सर्वप्रथम १९९८ साली नांदेड लोकसभा लढविली, तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. २००६ साली सांगली लोकसभा पोटनिवडणूक लढविली. राष्ट्रीय समाज पक्षाने २००४ सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतून संसदीय लढाईत प्रवेश केला. महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये जागा स्वबळावर लढविली. पहिल्याच निवडणुकीत दीड लाखापेक्षा जास्त मते मिळवून महाराष्ट्रात दहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला. पुढे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दीड लाखापेक्षा जास्त मते मिळवून राज्यात आठव्या क्रमांकाचा पक्ष ठरला. २००९ साली रासपने महाराष्ट्र - कर्नाटक - आसाम - गुजरात - बिहार अशा ३४ जागा स्वबळावर लढविल्या. स्वत: महादेव जानकर यांनी माढा येथून शरद पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून लाखभर मते मिळवली. रासप दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळवून महाराष्ट्रात पाचव्या नंबरचा पक्ष बनला. नंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक आमदार निवडून आला. २०१४ साली महादेव जानकर यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात साडेचार लाखांपेक्षा अधिक मते मिळवून आपली ताकद दाखवून दिली. पुढे ते २०१५ ला विधानपरिषदेचे आमदार बनले. 

महाराष्ट्रा बरोबर अन्य राज्यांतही पक्ष विस्तारत चालला आहे. गुजरात राज्यातून पक्षाचे १८ नगरसेवक निवडून आले. मते मिळवण्यात गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सातव्या क्रमांकाचा पक्ष ठरला. गुजरात विधानसभा निवडणुकीत वडोदरा - सयाजीगंज मतदारसंघातून राज्याचे पक्षाध्यक्ष राजेश आयरेंनी कडवी झुंज दिली. तृतीय क्रमांकाची मते मिळवली. दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांत पक्ष जोमाने वाढू लागला आहे. गोवा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, हरियाना, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांत पक्ष मूळ धरू लागला आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही; परंतु १.२ टक्के मते पक्षाने संपूर्ण राज्यात मिळविली आहेत. अकेला चला... कारवा बनता गया! हे महादेव जानकर यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. 

रानोमाळ ते कॅबिनेटमंत्री 

रानामाळातून विधानभवन- कॅबिनेट मंत्रिपद असा महादेव जानकर यांचा प्रवास आहे. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचे पशू, दुग्ध व मत्स्य खात्याचे मंत्री झाले. याचवेळी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्त्याला राज्यमंत्री दर्जाच्या पदावर बसविले. शेकडो सर्वसामन्य कार्यकर्त्याना विविध शासकीय समित्यांवर वर्णी लावली. मंत्रिपदाच्या जोरावर अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या खात्यांतर्गत महामंडळ नफ्यात, तसेच प्रकाशझोतात आणण्याची कर्तबगारी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात करून दाखविली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून या क्षेत्रांच्या वृद्धीसाठी विविध नवीन निर्णय घेतले. उत्कृष्ट दुग्धोत्पादन देणाऱ्या गोवंशीय व म्हैसवर्गीय पशूंचे संवर्धन पशुपालकांकडून होण्यासाठी प्रोत्साहन दिले. कुक्कुटपालन, तसेच अंडी उत्पादन वाढण्यासाठी आर्थिकसाह्याच्या योजना राबविल्या. महादेव जानकर यांच्या काळात नीलक्रांती धोरणातून राज्यात मत्स्योत्पादनात वाढ केली गेली. चांदा ते बांदा योजनेंतर्गत चंद्रपूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी व्हेनामी कोळंबीच्या बीज उत्पादन केंद्र (हॅचरी), खेकडा हॅचरीज, जिताडा मासा हॅचरीज व संवर्धन, खारे व गोड्या पाण्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, मासेमारी जेट्टींचे आधुनिकीकरणाबाबत निर्णय घेतला गेला. शेतकऱ्यांच्या दारात गायी- म्हशीमध्ये कृत्रिम रेतन सेवा उपलब्ध करून देणे, संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा पुरविणे, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पूरक पशुखाद्य पुरवठा, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत बहुवार्षिक गवत लागवड, मुरघास व कडबा कुट्टी यंत्रवाटप, गाव पातळीवर लसीकरण, गोचीड निर्मूलन व वंध्यत्व निदान आदींचा समावेश, दुधाळ जनावरांचे वाटप, तसेच दुग्धव्यवसायासाठी संस्थात्मक उभारणीचे काम केले. चारायुक्त शिवार योजना, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, पशुपालक उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेसाठी अभ्यासगटाची स्थापना, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने अनुसूचित क्षेत्र/आदिवासी क्षेत्रासाठी स्वयम योजना, विदर्भ, मराठवाड्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दूध उत्पादन वाढीकरिता दुग्धविकास प्रकल्प, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, कामधेनू दत्तक ग्राम योजना, दूध योजना व शीतकरण केंद्राचे खासगी सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनरुज्जीवन व अत्याधुनिक गोठा अशा विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याचे प्रयत्न झाले. विशेष म्हणजे दूध दरात पाच रुपयांची वाढ करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनाचा कणा असलेला पशुपालन व्यवसायास उभारी देण्यास मदत केली. पक्ष आणि कार्यकर्ते यांना जनतेत सन्मानास पात्र बनविले. त्यांचा हा प्रवास दैदीप्यमान आहे. 

कार्यकर्त्यांना सर्वस्व मानणारे नेतृत्व 

महादेव जानकर कार्यकर्त्यापासून नेता बनले. लोकशाही भारतात अजून राजतंत्र आहे, घराणेशाही आहे आणि ही घराणेशाही सर्व देशातील सर्व छोट्या-मोठ्या पक्षात दिसून येते. राष्ट्रीय समाज पक्ष मात्र याला अपवाद आहे. संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी २०१८ साली राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद श्री. एस. एल. अक्कीसागर यांच्याकडे मोठ्या विश्‍वासाने आणि सन्मानाने सोपविले. श्री. एस. एल. अक्कीसागर मूळचे कर्नाटक राज्याचे आहेत. त्यांची जन्मभूमी जबलपूर मध्य प्रदेश आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि हे सर्व महादेव जानकर यांच्या स्वतंत्र, स्वाधीन आणि कुशल नेतृत्वाधीन झाले आहे. 

समान शिक्षण व जातिनिहाय जनगणना अजेंडा

देशामध्ये सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, हा महादेव जानकर यांचा मुख्य अजेंडा आहे. आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार आणि धनदांडग्यांची इंग्रजी शाळांमध्ये. समान दर्जाचे शिक्षण नसलेल्यांना नोकऱ्यांच्या परीक्षेत मात्र एकत्र पळवणार, अशी आपली शिक्षण पद्धती आहे. ती बदलली गेली पाहिजे. तुम्ही एसीत शिका, आम्ही साध्या शाळेत; परंतु सर्वांना अभ्यासक्रम एकच पाहिजे. बोर्ड एकच पाहिजे. तरच सर्वसामान्यांची पोरं सध्याच्या स्पर्धेच्या जगात टिकतील, असा जानकर यांचा विश्‍वास आहे. आपली मुलंही नोबेल पारितोषिक विजेती बनली पाहिजेत, अशी शिक्षण पद्धती आणणे आवश्यक असल्याचेही ते म्हणतात. 

देशामध्ये जातिनिहाय जनगणना न झाल्याने समाजाच्या विकासाचे निश्‍चित असे धोरण ठरवता येत नाही. सर्व समाजाला विकासाच्या प्रक्रियेत समान वाटा मिळत नाही. त्यासाठी जातिनिहाय जनगणना हा एकमेव पर्याय आहे. ती झालीच पाहिजे, हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आगामी काळात मुख्य अजेंडा असणार असल्याचे जानकर सांगतात. 

जन्मभूमीच्या विकासात योगदान 

राजकीयदृष्ट्या सातारा जिल्ह्यापेक्षा विदर्भ - मराठवाड्यातील लोकांनी महादेव जानकर यांना साथ दिली. भरभरून प्रेम केले, तरीही जन्मभूमी म्हणून त्यांचे साताऱ्याच्या विकासाकडे नेहमीच लक्ष राहिले आहे. देशात कुठेही फिरत असलो तरी साताऱ्यावर नेहमी लक्ष असतेच, असे महादेव जानकर आवर्जून सांगतात. विदर्भ- मराठवाड्यासाठी असलेल्या योजनांमध्येही त्यांनी सातारा जिल्ह्याचा आग्रहाने समावेश करून घेतला आहे. मत्स्य व्यवसायासाठी कण्हेर, राजेवाडी, तारळी धरणावर प्रोजेक्‍ट देण्यात आले. माणमध्ये सोलर प्रोजेक्‍ट आणण्यासाठी प्रयत्न केले. भाडेतत्त्वावर जमिनी देऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मालक ठेऊन हे प्रोजेक्‍ट करण्याचा त्यांचा मनोदय आहे. माणमध्ये रेल्वे आणण्यासाठीही त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. माण तालुक्‍यात मुंबई - बंगळूर कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक वसाहत उभारण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. मंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी महत्त्वाच्या बैठका घेतल्या. जलयुक्त शिवार योजना, पाणंद रस्ते योजना याची जिल्ह्यात विशेषत: माण तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या उद्योगांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला. दुष्काळी भागाला पाइपलाईनने पाणी देण्याची भूमिका त्यांनी मांडली. या पद्धतीमुळे आता माणच्या दुष्काळी भागात पाणी आले. त्यामुळे शेतकरी बागायती पीक घेऊ लागले आहेत. 

........... 

राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल 

पक्ष नावाची घोषणा : ३१ मे २००३ (चौंडी, अहमदनगर, महाराष्ट्र) 

नोंदणीकृत स्थापना : २९ ऑगस्ट २००३ ( दिल्ली) 

आजवरच्या निवडणुकातील सहभाग 

पहिली निवडणूक : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२००४ 

एकुण उमेदवार : १३ एकूण मिळालेली मते : १४६५७६ 

महाराष्ट्र , कर्नाटक, 

.................. 

महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २००४ 

उमेदवार : ३८ एकूण मिळालेली मते : १४४७५३ 

............

सांगली लोकसभा पोटनिवडणूक २००६ 

.................. 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २००९ 

एकुण उमेदवार : ३२ एकूण मिळालेली मते : २१५०४२ 

महाराष्ट्र, गुजरात, आसाम 

................... 

सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ 

उमेदवार : २६ विजयी उमेदवार: ०१ (अहमदपूर) श्री. बाबासाहेब पाटील

एकुण मिळालेली मते : १८७१२६ 

.................. 

सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०१२ 

उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : १७२१ 

............... 

सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक २०१३ 

एकूण उमेदवार : ०१ मिळालेली मते : ३६३३ 

.............. 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१४ 

एकूण उमेदवार : ०५ मिळालेली मते : ७५८५८४ 

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू , कर्नाटक, उत्तर प्रदेश 

................... 

सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ 

उमेदवार : ०६ विजयी उमेदवार : ०१ (दौंड) श्री.राहूल कुल 

एकूण मिळालेली मते : २५६६६२ 

.................. 

सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुक २०१६ 

एकूण उमेदवार : ०४ एकूण मिळालेली मते : ८७६८ 

............... 

सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०१७ 

एकूण उमेदवार : १२ एकुण मिळालेली मते : ४१८३४ 

.............. 

सार्वत्रिक राजस्थान विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०३ एकुण मिळालेली मते : ७८१२ 

.................. 

सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०४ एकुण मिळालेली मते : ९५८३३ 

............... 

सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : ७३२७ 

............... 

सार्वत्रिक मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : ४३११ 

................. 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ 

एकुण उमेदवार : ११ एकूण मिळालेली मते : २५८५४२ 

महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान 

.................. 

सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ 

उमेदवार : ०१ विजयी उमेदवार : ०१ (गंगाखेड) आमदार डॉ. श्री.रत्नाकर गुट्टे 

एकुण मिळालेली मते : ८११६९ 

.................. 

सार्वत्रिक बिहार विधानसभा निवडणुक २०२० 

एकूण उमेदवार : ०५ एकूण मिळालेली मते : १०४१४ 

.............. 

उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुक २०२० 

उमेदवार : ०१ (३६७ - मल्हणी) 

................ 

सार्वत्रिक दिल्ली विधानसभा निवडणुक २०२० 

एकुण उमेदवार : ०३ एकूण मिळालेली मते : २४८१ 

............. 

सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुक २०२१ 

एकूण उमेदवार : ०२ एकूण मिळालेली मते : ७३६१ 

........... 

सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२ 

उमेदवार : ३० एकूण मिळालेली मते : ९५९६३ 

............. 

सार्वत्रिक तेलंगणा विधानसभा निवडणुक २०२३ 

एकूण उमेदवार : ०१ एकूण मिळालेली मते : १९०७ 

................ 

सार्वत्रिक मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक : २०२३ 

एकूण उमेदवार : ०२ एकूण मिळालेली मते : ३५९७ 

............. 

सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक : २०२३ 

एकूण उमेदवार : ०५ एकूण मिळालेली मते : १४६८९ 

................ 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक : २०२४ 

एकूण उमेदवार : २० एकूण मिळालेली मते : ८५६७८९ 

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू , कर्नाटक , मध्यप्रदेश, बिहार , दिल्ली , उत्तर प्रदेश 

.............. 

अकोल्यात २१ वा वर्धापन दिन 

राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला वर्धापन दिन २००४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय कार्यालय, मुंबई येथे पार पडला. त्यानंतर आजवर राज्य व देशातील विविध ठिकाणी पक्षाचे २० वर्धापन दिन थाटात पार पडले. २१ वा वर्धापनदिन पक्षासाठी विशेष महत्वाचा आहे. तो २९ ऑगस्ट २०२४ ला दुपारी साडेबाराला अकोला येथील मराठा मंगल कार्यालयात पार पडणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध राज्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुक येऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोबत तन, मन, धन देऊन सहकार्य करावे. वर्धापदिनानिमित्त यशवंत नायक परिवाराकडून पुढील यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..!

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...