Thursday, August 1, 2024

आगामी काळात मोठ्या ताकदीने राष्ट्रीय समाज पक्ष उभारणार : महादेव जानकर

आगामी काळात मोठ्या ताकदीने राष्ट्रीय समाज पक्ष उभारणार : महादेव जानकर 

मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व मंचावर अन्य रासप नेते मान्यवर.

दादर येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी, मुंबई प्रदेश पदाधिकारी यांची संयुक्त बैठक 

मुंबई (३०/०६/२०२४) : देशातील डावे, उजवे, सर्व प्रकारचे राजकारण अनुभवले असून, आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष मोठ्या ताकदीने उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दादर येथे बोलताना केले. जानकर पुढे म्हणाले, मोठी धनशक्ती असणाऱ्या लोकांनी देखील आपले राजकीय पक्ष गुंडाळले आहेत, आपण मात्र सर्वसामान्य राष्ट्रीय समाजाला सोबत घेऊन लढत राहणार आहे. मान्यवर कांशीराम यांना पराजित करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्षाला त्यांच्या विरोधात उभे करत होते, मात्र कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात स्वत:चे सरकार बनवलेच, असा उच्चार करून जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष देखील सत्ताधारी पक्ष बनवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील महायुती आघाडीचे राजकारणातील मोठमोठे गौप्यस्फोट देखील जानकर यांनी केले. आगामी काळात पक्षाच्या वाटचालीबद्दल भाष्य करताना महादेव जानकर यांनी आपले मन मोकळं केले. 

राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी यांच्या समवेत राज्य कार्यकारणीची बैठक दादर मुंबई येथे विविध विषयावर रविवारी आयोजित केली होती. बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारणी पदाधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन, गैरहजर पदाधिकारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच निष्क्रिय पदाधिकारी यांना पदमुक्त करण्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारणी समोर ठेवण्यात आले. तसेच विदर्भातील नवीन पदाधिकारी यांना राज्य कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आले. विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे अध्यक्ष तोसिफ शेख यांची विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. तसेच उर्वरित पदाधिकारी यांनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली. 

राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी राज्यातील विभागीय अध्यक्ष यांना आपापल्या विभागातील जिल्ह्यातील कार्यकारणी याद्या प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे जमा करण्यास सांगितले व तसेच विभागाचा आढावा देण्यास सांगितले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने पाटील यांनी त्यांच्या विभागातील जिल्हा अध्यक्ष व कार्यकारणी यांचा आढावा देऊन विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची ताकद असणाऱ्या मतदारसंघाची पक्षाकडे नावे सुचवली. पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील यांनी युवक आघाडीचा आढावा दिला, तसेच अपूर्ण कार्यकारणी याद्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. खानदेश उत्तर महाराष्ट्र यांच्या तर्फे महिला आघाडीच्या सौ. अनिताताई वाघ यांनी नंदुरबार जिल्ह्याचा महिला आघाडीचा आढावा दिला. मुंबई विभागाचा आढावा मुंबई प्रदेश महासचिव संतोष ढवळे- धनवीकर यांनी आढावा सादर केला. कोकण, मराठवाडा या विभागातील राज्य व राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते, मात्र विभागाचे अध्यक्ष गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी संयुक्त चाललेल्या बैठकीस उपस्थित राहून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेवटच्या रांगेतील खुर्चीवर बसून सर्व पदाधिकारी यांचे मत जाणून घेतले. 'लोकसभा निवडणुकीतील परिणामांची चर्चा करून राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी राज्यातील कोणताही ग्रामीण क्षेत्रातील विधानसभा मतदारसंचाची बांधणी करू असे सांगितले.' यशाला अनेकजण धनी असतात, मात्र अपयाशाला कोणीही नसतात असे सांगून परभणी लोकसभेतील झालेल्या सर्व परिणामांची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच देशातील कोणत्याही एका मतदारसंघाची आपण जबाबदारी घेऊन तो संघटन बांधणी करणार असल्याचे जाहीर केले. तसेच सुकाणू समिती नेमण्याविषयी बैठकीत भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन बैठकीत मार्गदर्शन केले. निष्क्रिय पदाधिकारी यांना तत्काळ पदावरून हटविण्याच्या सक्त सूचना केंद्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणीस दिल्या. प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांना पक्षाचा शिष्टाचार पाळण्याविषयी सांगितले. काम करण्यास उत्सुक असणाऱ्यानाच पद द्यावे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक नेमण्याचे निर्देश यावेळी दिले.

राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिन विदर्भात साजरा करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. दिनांक ४ जुलैला मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शासकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. सदर बैठकीचे व्यवस्थापन मुंबई प्रदेश अध्यक्ष विठ्ठल यमकर व मुंबई प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांनी केले.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025