Monday, May 26, 2025

मुंबईत सावधानतेचा इशारा ! पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार

मुंबईत सावधानतेचा इशारा ! पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार



मुंबई : (26/5/2025) | दिनांक रविवार 25 मे 2025 रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला खरा. पण, त्याआधीपासून राज्यात पावसाचा मारा मात्र सुरूच होता आणि मुंबईसुद्धा या माऱ्यापासून बचाव करु शकली नाही. रविवारपासूनच शहरात सुरु असणारी संततधार दिवस मावळतीला गेल्यानंतर मुसळधारीमध्ये रुपांतरीत झाली आणि रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणु उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला.


शहरातील सागरी किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, तर पश्चिम उपनगरांसह ठाणे आणि शहरालगत असणाऱ्या पालघरलाही पावसानं झोडपलं.


मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात पावसानं


26 मे 2025 रोजी सकाळी 6 ते 7 या कालावधीत मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली. यानंतर आय हॉस्पिटल (ग्रँट रोड) येथे 36 मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र आणि सी वॉर्ड कार्यालय येथे 35 मिमी, कोलाबा अग्निशमन केंद्र येथे 31 मिमी, बी वॉर्ड कार्यालय येथे 30 मिमी, मांडवी अग्निशमन केंद्र येथे 24 मिमी, भायखळा अग्निशमन केंद्र येथे 21 मिमी, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर येथे 18 मिमी आणि नायर हॉस्पिटल येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली.


याशिवाय, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पावासाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार असून सोसाट्याचे वारेही वाहतील असा इशारा देत हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025