अचानक अंगावर विजेची तार पडल्याने मेंढपाळ जागीच ठार; नांदेड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू – सरकारने घ्यावी दखल, मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आवश्यक
मौजे बरबडा (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील एक प्रामाणिक व मेहनती मेंढपाळ कोंडिबा खंडू धुमाळे यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. आपल्या मेंढ्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय करत असताना, ते शिखांची वाडी (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील शिवारात मेंढ्या घेऊन गेले होते. मात्र, अचानक मेन लाईनवरील विजेची तार तुटून खाली पडल्यामुळे त्यांना तीव्र विद्युतशॉक बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धुमाळे हे अत्यंत कष्टकरी, शांत स्वभावाचे व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार असून, या कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.
शासनाकडे मागणी – मदत व उपाययोजना
ही केवळ एक अपघाती घटना नसून, ही मेंढपाळांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्काळ दखल घेऊन धुमाळे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी व मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, ही समाजाची अपेक्षा आहे.
सावध रहा, सुरक्षित रहा
सर्व मेंढपाळ बांधवांना विनंती आहे की, मेंढ्या चराई करिता जाताना परिसरातील विजेच्या तारांची स्थिती लक्षात घ्यावी. जर कुठे धोकादायक वीज तार आढळल्यास तत्काळ वीज वितरण कंपनीला कळवावे. आपली सुरक्षा हीच आपल्या कुटुंबाची ताकद आहे....
No comments:
Post a Comment