रायगडावरील घरांना वन विभागकडून नोटीस; राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अलिबाग (१४/५/२०२५) : रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांपासून धनगर समाजाची वस्ती असून, येथील घरांना आता वनविभागाने अधिकृत ठरवत घरे हटवण्यासाठी नोटीस देण्यात आल्याने, या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रायगड किल्ल्यावर धनगर समाजाची वस्ती आहे, हा समाज किल्ल्यावर दही, दूध, तूप विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे, मात्र आताच वन विभागाला जाग येऊन वस्ती हटवण्याची मागणी केली आहे, असा प्रश्न राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते भगवान ढेबे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी होत असताना, त्याला महाराष्ट्रातील धनगर समाजाने तीव्र विरोध केला आहे. हा वाद आता शांत होत असताना, नुकतेच वनविभागाने दिलेल्या नोटिसाबाबत समाजात तीव्र संताप पाहायला मिळत आहे.
ऐतिहासिक वारशाचा दर्जा देण्याची मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, रायगड जिल्हा हर हर चांगभलं संस्थेचे हरीश ढेबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात घरांना दिलेल्या बेकायदेशीर नोटीस तात्काळ रद्द करून कारवाई थांबवावी, वस्तीला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा देऊन कायदेशीर मान्यता द्यावी, वन विभागाने दिलेल्या नोटिसा रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, कोणत्याही कुटुंबाला हटवू नये, असे मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment