Sunday, September 23, 2018

माणदेशी : बुद्धिमान आजोबा - श्रद्धांजली लेख

"पुकळेवाडीचा कोहिनुर हिरा काळाच्या पडद्याआड"

बापू आण्णाच्या  जाण्याने पुकळेवाडी पोरकी झाली....!

गत आठवड्यात अचानक सेल फोन बंद पडल्याने आठवडाभरात कुणाशीही सपंर्क होऊ शकला नाही. रात्री दुरूस्त केलेला सेल फोन चालू करून सकाळी सकाळी सोशल माध्यमात सेल फोन बंद होता ; त्यातील संपादित माहीती कमी झाली आहे तरी संपर्क नंबर देऊन सहकार्य करावे. अशी विनंतीवजा संदेश टाकला. आणि अनेकांचे क्रमांक मिळवत होतो. इतक्यात सागर बाळासो पुकळे यांच्या व्हाॅट्सअप डीपीला आण्णांची प्रतिमा दिसली. क्षणभर स्तब्ध झालो. गावात काहीतरी शोकमय घडल्याचा भास झाला अन् माझ्या घरी वडिलांना तातडीने भ्रमणध्वनी केला. पलिकडून तात्यांनी आपल्यातली चांगली माणस या हपत्यात सोडून गेली अशी खबर दिली. शामराव शेळके(मामा) आणि बापू (आण्णा) सोडून गेल्याचे कळताच अति वेदना झाल्या. जोतिबाच्या मंदिराकडे जाताना शेळके मामांची आपुलकीने ऐकू येणारी हाक आता बंद झाली. दिपवाळीच्या सट्टीत बापू (आण्णा) सारख्या महान युगपुरूषाला भेटण्याची आशा आता कायमची संपूष्टात आली याची सल कायम मनाला बोचत राहिल.

डोंगराच्या कड्याकपारीत वसलेल्या पुकळेवाडीसारख्या दुर्गम अशा गावात आप्पा पुकळे यांच्या पोटी जन्माला आलेला सुपुत्र, आपल्या कार्य कर्तुत्वाने कुकुडवाड, विरळी, म्हसवड, दहिवडी, वडूज, मायणी, पाचवड परिसरात नावलौकीक मिळवलेला, भारताचा स्वातंत्र्यपूर्वकाळ व स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचा एकमेव साक्षीदार असणारा पुकळेवाडीच्या मातीतला 'मायबाप' बापू आप्पा पुकळे (आण्णा) वयाच्या १०२ व्या वर्षी वार-सोमवार दि- ९ ऑक्टोबर रोजी पुकळेवाडीच्या लेकरांना सोडून ते काळाच्या पडद्याआड झाले. आण्णा म्हणजे माझ्या गावातील कोहिनुर हिराच होते.  आण्णांच्या जाण्याने पुकळेवाडी गावाची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कदापी भरून येणार नाही. समाज जीवनात वावरत असताना आण्णांनी केलेले कार्य हे पुकळेवाडीच्या इतिहासात अजोड असे ठरले आहे.

ब्रिटीश काळात कुकुडवाडच्या पंचक्रोशीत घडलेल्या 'माणदेशी बंडा'ची वास्तववादी माहीती आण्णा जवळ होती. माणदेशातील घडामोडींचा खजाना आण्णाजवळ होता. आण्णांच्या डोळ्यादेखत घडलेली माणदेशी बंडाची कहाणी पुकळेवाडीतील गावक-यांना घटनाक्रमानुसार सांगायचे. ते एक उत्तम इतिहासकार होते. पुकळेवाडी गावाच्या निर्मितीपासून ते प्राचिन मंदिर, शेती, घर, कूळ पुरूषाची माहीती , भावकी रचना कशी झाली याचा सर्व अभ्यास आण्णाजवळ होता. शाळेत गेले नसले तरी ते एक चांगले अभ्यासक होते. अक्षरांची ओळख असती तर आण्णानी अतुलनीय साहित्य निर्मीले असते यात तिळमात्र शंका नाही.

अन्न-धान्याची टंचाई निर्माण झालेल्या घरी आण्णा स्वतःच्या कोतळीतील (कणगी) धान्य काढून तेथे पोहोच करायचे. गावच्या लेकीबाळींना जाच होणा-या गावात जाऊन लेकींचा छळ करणा-यांचा सौम्य तर कधी कडकपणे समाचार घ्यायचे. एकदा एका गावात आण्णांनी गावच्या लेकीसाठी पाहूण्यांच्या दारातच रात्री मूक्काम केल्याची आठवन सांगतात. आण्णांना स्वतःची अशी लेक नव्हती, मात्र गावगाड्यातील लेकींचा विवाह करून संसार फुलवणारे आण्णा पुकळेवाडीतील लेकींचे आधारस्तंभ होते.


पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढर घेऊन भटकणा-या मेंढपाळांच्या मुलांचा सांभाळ करून शाळेत घालणारे आण्णा एक उत्तम पालक होते. आयुष्यभर स्वतःसाठी न जगता इतरांसाठीही जगायला शिकवणारे आण्णा खरेखुरे गरिबांचे कैवारी होते. गावात घडणा-या अन्यायाची चीड बाळगत न्यायाची बाजू सतत लावून धरत न्याय देणारे आण्णा उत्तम न्यायाधीश होते. गावातील लहानापासून थोरांपर्यत सर्वांप्रती आदर बाळगणारे आण्णा आदरणीय होते. अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला श्रध्देची उपासना करायला लावून जुनाट पंरपरा मोडीत काढणारे कर्ते सुधारक होते. आण्णांनी घालून दिलेल्या मार्गाने गत दहा वर्षापासून त्यांचे पुतणे, विद्यमान सरपंच ब्रम्हदेव पुकळे हे स्वतः अतिशय प्रामाणिकपणे कुणावरही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीने आण्णांच्या पाऊलावर पाऊल टाकत पुकळेवाडी नगरीची सेवा करत आहेत.


१३ ऑगस्ट २०१७ वार- रविवार रोजीची भेट - आण्णांची अखेरची भेट

तब्येत साथ देत नसतानाही मानदेशी बंडाची कहाणी सांगताना आण्णा 

माणदेशी बंड जाणून घेण्याची खूप दिवसांपासूनची धडपड सुरू होती. घरी तात्यांशी याबाबत बोललो, तात्यांनी बापू(आण्णा)सोडून दुसरे कोण माहीती देणार नाही असे सांगितले. गावातील बुजर्गांकडे चौकशी केल्यावरही आण्णांचे नाव सर्वांनी घेतले. १३ ऑगस्ट रोजी आण्णा सारख्या महान इतिहासकार, अभ्यासक, बुध्दीमान आजोबाला भेटलो. आण्णांची प्रकृती थोडी बिघडली होती तरीपण आण्णांचे कनिष्ठ सुपुत्र मारूती पुकळे यांनी मी बंडाची कहाणीसाठी आलोय. असे सांगितल्यावर कणखर बाण्याचे बापू (आण्णा) ज्या शैलीत बंड कथन करत होते, तिथे कसलेला शिकला सवरलेला इतिहासकारही आण्णापुढे नक्कीच नतमस्तक झाला असता हे आवर्जुन नमूद करावे लागेल. भेटीतील आण्णांचे रूबाबदार लयबध्द बोल कायम स्मरणात राहतील. आण्णाच्या जाण्याने एका महान आजोबाला मुकलो. आण्णांनी समाजातील थोरांकडे दिलेले मौखीक ज्ञान लिखीत करणे काळाची गरज आहे.


"माणूस जन्माला येतो तेव्हा श्वास चालू असतो नाव नसते आणि माणूस संपतो त्यावेळी श्वास बंद पडतो पण नाव असते" श्वास आणी नाव यातला जो काळ आहे तेच माणसाचे खरे जीवन आहे. . आण्णांच्या पशच्यात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लहानपणापासून अखेरच्या क्षणापर्यंत जनसेवेची आस बाळगून लोकाभिमूख कार्याची उर्मी बाळगून जीवन जगणारे आण्णांचे कार्य, विचार अजरामर ठरेल अशी आण्णांना भावपूर्ण श्रद्धाजंली.

शोकाकुल - आबासो सुखदेव पुकळे.


2 comments:

  1. उत्कृष्ट इतिहास अभ्यासक आणि लिखाणाचे एक धारदार शस्त्र हे नेहमी तुमच्या लिखाणातून पुढे येतेच , तसेच कोणत्याही गोष्टीचा खोल अभ्यास व तुमची बुद्धीमत्ता ही कोणत्या स्तरावर आहे ही या लिखाणातून समोर येते.एक लेखक म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.

    ReplyDelete
  2. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...