Sunday, September 23, 2018

महाराष्ट्र धनगर समाजाची संस्कृती

"महाराष्ट्रातील - धनगर संस्कृती"



यात्रेत तालासुरात ओव्या म्हणताना धनगर समाजातील शाहिर


'धनगरी गीते , धनगरी ओवी'
महाराष्ट्रातील साहित्यात धनगर समाजातील संस्कृतीला स्थान नसल्याचे आढळते, तेव्हा धनगर समाजातील गीते व ओवी यांची थोडक्यात ओळख करून घेऊया आणि धनगर समाज संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा घेऊया.
    धनगर गीतांनी पंरपरेने लोकवाड्मय टिकवून ठेवले आहे. सुंबरान मांडिलं, बिरोबाची गीते,जोतिबाची गीते, खंडोबाची गीते, धुळोबाची गीते, मायाकका देवी गीते, स्त्रियांचे उखाणे, पोवाडे, लग्नाची गीते, मांडवाची गीते, (मायाक्कादेवी)  माखूबाई सवासन्या, गजीनृत्य व भाकणूक इत्यादी गीतांमधून मागील इतिहास, परंपरा, रूढी, चालीरीती, मानवतावाद या सर्वांवर प्रकाश पडतो.पारंपारीक जीवन जगणारे धनगर लोक महाराष्ट्रातल्या समाजजीवनाशी एकरूप झालेले दिसतात.धनगर समाजाचे  सांस्कृतीक आणि धार्मिक जीवन इतर समाजाच्या सांस्कृतीक, धार्मिक जीवनापेक्षा निराळे आहेत. 

महाराष्ट्रात प्रदेशानुसार धनगर समाजात राहणीमानात भेद असल्याचे आढळते परंतु कुलाचार, आणि देव-देवता यामध्ये साधर्म्य पाहायला मिळते. धनगरांच्या जत्रा आगळ्यावेगळ्या पध्दतीच्या असतात.  धनगर समाजात दोन प्रकारच्या जत्रा पाहयला मिळतात. गोडवी जत्रा, बक-र्या कोकराची जत्रा(मांसाहारी) असते. धनगर समाजात शाकाहारी जेवणाला  'गोडव' बोलतात तर मांसाहारी जेवणाला 'वशाट' (वसकाट) बोलतात.  बक-या कोकराची जत्रा 'दावन, खेळ, मेंढक्याची जत्रा, आकाडी जत्रा, वाडजत्रा, सटवाई या विशिष्ट नावाने ओळखल्या जातात. 

धनगरांची गीते हा लोकजीवनाचा एक अनमोल ठेवा आहे. आपल्या मनातील अनेक भाव, प्रसंग, भक्ती आणि समाजाविषयी असणारे आंतरिक प्रेम धनगर लोक आपल्या बोलीभाषेतच गीतांतून व्यक्त करतात.  शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या अशिक्षित, अडाणी, ग्रामीण आणि आदिवासी भागात राहणा-या तसेच वर्षातील काही दिवस भटकंती करणा-या धनगर जमातीचा विचार करता, धनगर समाज मेंढपाळ व्यवसायाशी व काही प्रमाणात कृषी व्यवसायाशी निगडीत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाशी जुळवून घेत त्यांच्याबरोबर मैत्री करणारा आणि अतिशय जवळचे नाते सांगणारा एकमेव धनगर समाज आहे. धनगर हा कधिही मुळापासून झाडे तोडत नाही. परंतु त्या झाडांना सवळून (झाडाच्या फांदया तोडून व वळण देणे) झाडे जोमाने वाढवतो. शेळ्या-मेंढ्यांना शेताममध्ये बसवून खतवल्याने शेतातील माती 'सुपीकता' व उत्पादकता' धारण करते. ज्या शेतात मेंढ्या बसवल्या जातात अथवा मेंढी खत घातले जाते त्या शेतातील पीक अतिशय जोमदार येते व उत्पादन अनेक पटीने वाढलेले पाहायला मिळते. 

धनगर समाजातील ओव्या ह्या मौखीक वाड्मय स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केल्या असून धनगरी ओव्या अस्सल धनगरी भाषेतील अनमोल ठेवा आहे. धनगरी ओवी सम्राट कै. नाना रामचंद्र बनगर यांचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला होता. बनगर यांनी पुणे आकाशवाणीवर १९९५ साली धनगरी ओव्यांच सुंभरान सादर केले. 

आबासो पुकळे
 मु- पुकळेवाडी ता- माण जि- सातारा
१४ जानेवारी २०१६

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...