Sunday, September 23, 2018

कॉलेजच्या वाटेवर भेटलेले मेंढपाळ बांधव

"राष्ट्र भारती" ने मेंढपाळ बांधवांशी साधला संवाद.


 विल्गिंडन काॅलेजच्या मैदानाशेजारी मेंढपाळांचे पाल दिसले. तळावर वागरात कोंडलेल्या कोकरांची राखण करत बसलेला मेंढका पाहून मी जय मल्हार म्हणालो, तसा तो मेंढका दबक्या आवाजात जय मल्हार म्हणाला. मेंढक्याला विश्वास देत मेंढपाळांना  बोलते केले. इतक्यात बाकीचे मेंढके वझ्यावर आले तसा कोकरी सांभाळणारा मेंढका म्हणाला हे आपल्यातलेच धनगर आहेत. अंधार पडायला लागला होता, तितक्यात एक मेंढका बोलला आम्हाला पाण्याची सुय कुठ व्हयान? मी आजुबाजुचा अंदाज घेतला परंतु मेंढपाळांना पाण्याची सोय होईल अशी हक्काची एकही जागा सापडली नाही. शेवटी मी होस्टेलवर मेंढपाळाची पाण्याची सोय करून दिली.

बांधवांनो..... मैदानावर चिखल होता. त्या चिखलात माझ्या मेंढपाळ बांधवाने पाल ठोकल होत. त्या पालात फाटक्या तुटक्या पिशवीत भरलेल संसारिक साहित्याचे वझ(मेंढपाळाच साहित्याने एकत्रित केलल पिशव्या, पोत्याच ठिकाण) होत. चोहीकडून थंडगार वारा सुटला होता. त्या वा-यात हातात काठी, खांद्यावर घोंगड घेऊन मेंढपाळ उभा होता.  आभाळातुन मेघराजा बरसत होता. त्या मेघसरीत न्हाऊन निघालेला मेंढपाळ बांधव मेंढ्याला चारा, गवत शोधत होता.टोलेजंग आलिशान इमारतीने गजबजलेला परिसरात गटर, नाल्याभोवती चारा शोधणारा मेंढका मेंढराना बोलवत होता. त्याच नाला, गटारीला भयंकर दुर्गंधी होती, डास मच्छरांच प्याव होत अशातच माझा मेंढपाळ तिथे मेंढ्या चारत उभा होता.इतके सर्व भयानक परिस्थितीवर मात केल्यानंतरही पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. असे सांगण-या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात माझा धनगर, मेंढपाळ बांधव अंधा-या काळोख्या रात्री पिण्याच्या पाण्याच्या शोधात होता.....?



कॉलेजच्या रस्त्यावर मेंढपाळ बांधवास जनजागृती पुस्तक भेट देत असताना

२१ व्या शतकातही माझा मेंढपाळ धनगर बांधव अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण यापासून वंचित उपेक्षित आहे याच हे धगधगत वास्तव. पूर्वी धनगर ज्या मोठ्या कात्रीने मेंढराची लोकर कातरायचा त्याच कात्रीने मेंढपाळ बांधव आजही लोकर कातरतो. पर्वी साहित्यांच ओझ वाहण्यासाठी आदिमानव घोडयाचा वापर करायचा माझा मेंढपाळ बांधव आजही घोड्यावर ओझं टाकून पालावरच जीण जगत आज हितं तर उद्या तिथं रानोमाळ धुंडत आहे. धनदांडगे व जातदांडगे वर्गाची मारझोड सहन करत आहे. पूर्वी जसा माझा मेंढपाळ होता तसाच आजही माझा मेंढपाळ धनगर उघड्यावरच द-या खो-यात, कड्या कपारीत, ओसाड माळरानावर जीवन जगतो आहे. याच्यापेक्षा भयानक वास्तवात मुळ आदिवासीच जीवन जगणा-या धनगर मेंढपाळ बांधवांच्या हितार्थ घटनेतील ३४२ व्या कलमाची अंमलबजावणी का होत नाही? या प्रश्नाने पछाडलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात मेंढराच्या वाड्यात जन्माला आलेला मुलगा पुढे सुवर्णपदक अभियंता बनतो व आपल्या माय-बापजाद्यांनी सोसलेली सोशीक परिस्थिती बदलवण्यासाठी लग्न, घर, संसाराचा त्याग करून सर्व समस्यांच प्रश्नाचे मुळ, सोल्युशन असलेल्या 'राजकीय सत्ते'साठी भारतीय लोकशाहीत संसदेत जाणारा मार्गाची निवडणुका महाराष्ट्रासह देशभर लढवतो. मात्र त्याची जात मेंढपाळ धनगर असल्याने महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारे प्रस्थापित जातदांडगे पुढारी प्रचार, प्रसार माध्यमातून जातीचाच नेता ठरवून स्वतःची घर, पै पाहुण्यांची घर भरून पोळी भाजून घेतात.बांधवानो, ज्यांच्यासाठी त्यागी तरूण  निवडणुका लढवतो तो खराखुरा मतदार मात्र मेंढपाळ धनगर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकशाहीतील मतदान बुथ केंद्रापासून कोसो दूर गेलेला असतो.जो जवळ असतो तो मात्र प्रस्थापित व्यवस्थेला बळी पडून आपल्यातल्याच सुवर्णपदक इंजिनीयर बुध्दीजीवी असलेल्या त्यागीपुत्राची मापे काढण्यात फुशारकी मारतो इतका तो व्यवस्थेचा गुलाम बनलेला आहे. सांगा आम्हा मेंढपाळ धनगरावर विश्वास कोण ठेवणार? माय बाप होऊन आम्हा न्याय कोण देणार? बांधवांनो अशा संक्रमणाच्या परिस्थितीत हेलकावे घेणारा मेंढपाळ धनगर समाज केव्हा स्थिर होईल ? हा मुख्य प्रश्न आहे.


अधिक अभ्यासाठी काही मेंढपाळाची नाव, वय, शिक्षणाची माहीती साठी देत आहे. सुरेश रामा बंडगर (वय ३५ - शिक्षण - ००वी), शरद सुभाष तादंळे(वय २७ - शिक्षण १० वी), विठ्ठल बाळू रानगे(वय ४२ - शिक्षण ००), आप्पा सोमा बंडगर (वय ३५ - शिक्षण ००), तानाजी बाळू रानगे (वय ४० - शिक्षण ००), कृष्णा बिरू रानगे (वय ४५ -शिक्षण ००), धनाजी यशवंत कोळेकर (वय ४१-शिक्षण ००), प्रकाश सु-याप्पा बंडगर (वय ६५-शिक्षण ००), लहान मुले - कुमार कृष्णा रानगे(वय ११- शिक्षण ५ वी), संदिप प्रकाश बंडगर (वय १२ -शिक्षण ६ वी) यातील बहुतांश बांधव अनपड आहेत. यांनी एकच सांगितले की आम्ही मागासवर्गीय आहोत. काय तरी करायचं अन् पोटाला खायाचं.. अन् जायाचं बक-या घेऊन रान चारत. घरी आणि मेंढराकडं न्यार असतंया. सोलापूर पतूर जायाचं आण परत कोल्हापूर जिल्ह्यापतूर यायाचं. नुसत राबतच फिरायचं..अन् पावल झिजवत फिरायचं..अन् रगात आटवायचं..! आमची दहावी बारावीची पोर बक-यात हायती. आम्ही आंगठा द्या म्हणलं तिथ देणार. आम्ही फिरलोय, गुडघं दुखायला लागल्यात. पावसा पाण्यात किती दिवसं बसायचं. मागासवर्गीय समाजाच आमचबी एखादं पाॅर लागू दया की कामाला म्हणाव सरकाराला? असे 'राष्ट्र भारतीशी' बोलत होते आपली वयाची साठी ओलंडलेले प्रकाश सु-याबा बंडगर.

- आबासो पुकळे , पुकळेवाडी ता- माण
२० सप्टेंबर २०१६

2 comments:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete
    Replies
    1. आबासाहेब तुमच काम चांगल आसच चालू राहू दे यासाठी देवाला हात जाेडेन.

      Delete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...