Sunday, September 23, 2018

इंग्रजांना रेल्वेचा मार्ग दाखवणारा हुतात्मा शिंग्रोबा

'स्वतंत्र भारतात शिंग्रोबा धनगरावर राज्यकर्त्याकडून अन्याय'
इंग्रजांना रेल्वेचा मार्ग दाखवणारा हुतात्मा शिंग्रोबा

नसानसात भारतमातेविषयी राष्ट्रप्रेम असल्यामुळेच राष्ट्रनायक शिंग्रोबा धनगरास गोर्र्याकातडीच्या साहेबांनी गोळ्या घालून ठार केले. भारतीय स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या शिंग्रोबा धनगराची स्वतंत्र भारतात उपेक्षाच झाली.
        "शिंग्रोबा''
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रोबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा "रस्ता' कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रोबा! धनगरांची स्वतःची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रोबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रोबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेंढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न्‌ खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रोबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रोबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रोबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रोबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रोबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते. जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्‌मयाचे "छापील' ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व १९६६ ते १९९१ या काळात धनगरांच्या चालीरीती, संस्कृती, ओव्या, इतिहास, पशुपाल
न पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले.

मौखिक परंपरेने चालत आलेली शिंग्रोबाची धनगरी ओवी 

       "शिंग्रोबा ओवी''
इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु महादबुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं (दोन वेळा म्हणणे)
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
(सुंबरान याचा अर्थ स्मरण, इथे अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण)
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
पइल्या सत यौगाला आता। 
खंडाळ्याच्या घाटाला खंडाळ्याच्या घाटाला। गोरा मंग सायेब ॥
शिंग्रोबा हे नावाचा। रहात व्हता धनगर ॥
खंडाळ्याच्या घाटाला। शेळ्या-मेंड्या राकाइला ॥
गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला ॥
खंडाळ्याच्या घाटाला। रस्ता नव्हता घावत ॥
गोरा मंग सायब। शिंग्रोबाला बोलतो 
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला ॥
हर हर म्हादेवा ।  हर हर शंकरा ॥
आता ऐका! गोऱ्या साहेबाला शिंग्रोबा धनगराने रस्ता दाखविल्यावर काय बक्षीस गोऱ्या सायबानं शिंग्रोबाला दिलं त्याची कथा! (निर्दयी ब्रिटिशांनी शिंग्रोबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलं.) 

गोऱ्या मंग सायबानं हो। बंदुकीला गोळी या आन्‌ गोळी त्यानं भरले। शिंग्रोबाला मारले गोळी त्यानं भरलं। शिंग्रुबाला मारलं ॥
गोळियांचा आवाज गं। मेंड्यांच्या ये कानाला ॥
आन्‌ गोळी मग आइकून। शिंग्रोबाच्या भवतनं ॥
गोळी मग आइकून। शिंग्रोबाच्या भवतनं ॥
शेळ्या बगा मेंड्या या। शिंग्रोबाच्या भवतनं ॥
आन्‌ गोळा बगा वव्हून। वर्डायाला लागल्या ॥
आन्‌ नाराळाचं फळ या। फळ बगा देऊन ॥
आन्‌ खंडाळ्याच्या या घाटाला। गाडी उबा या राहिलं ॥
नाराळाचं फळ या । फळ बगा देऊन ॥
गाडी गेली निगून । पुण्याच्या हे जाग्याला ॥
हर हर महादेवा ।  हर हर ये शंकरा ॥
सुंबरान मांडिलं । सुंबरान मांडिलं ॥
- मुंबई - पुणे राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग शिंग्रोबा धनगर यांच नाव देण्यात यावे.
- कोकण रेल्वे मुख्यालय, बेलापूर यांस शिंग्रोबा धनगर यांच नाव देऊन भारतमातेच्या भुमीपुत्रास स्वतंत्र भारतात न्याय द्यावा अशा प्रकारची राष्ट्रीय समाज पक्षाने, हिंदुस्थान प्रजा पक्षाने वेळोवेळी शासन दरबारी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे परंतु शासनाने अजून कोणतीही दखल घेतल्याचे दिसत नाही .-मुंबई द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे प्रसंगी रास्ता रोकोही केलेले आहेत. नवी मुंबई  पोलीसांनी अांदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. प्रत्येक  वर्षी १ मे ला सह्याद्रीच्या घाटात हुतात्मा शिंग्रुबाच्या मंदिराजवळ कार्यक्रम आयोजित केला जातो. कोकणातील बांधव उपस्थित राहतात.
खंडाऴा घाटातील शिंग्रोबा मंदिर
✍ कळंबोलीहून  आबासो पुकळे, मु. पुकळेवाडी ता- माण
१४ जानेवारी २०१६

4 comments:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...