Sunday, September 23, 2018

कोळहोळराजा : श्री क्षेत्र नागोबा दर्शन

"कोळहोळचा राजा श्री.नागोबा देवदर्शनासाठी माणदेशात...





नागोबा यात्रेत झाडाखाली सावलीचा आनंद घेताना
विलिंग्डन काॅलेजमधील सत्र परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन माझ्या माणदेशातील पुकळेवाडी या मातृभूमीत पाऊल टाकतो न टाकतो तोच मला 'नागोबा यात्रा' असल्याचे समजले. क्षणभर घरी थांबून नागोबा यात्रेस जाण्याचा बेत केला आणि तडक रस्ता धरला तोच आठवड्याच्या सुट्टीवर आलेल्या नेव्ही कामगार सचिन पुकळे मोटारसायकलचा हाॅर्न वाजवतच माझ्याजवळ पोहचले. सचिन पुकळे यांच्या दुचाकीवरून माणदेशातील कोळहोळ राजाच्या दर्शनासाठी थेट नागोबा यात्रेतच विसावलो. म्हसवड-मायणी मार्गावर म्हसवड जवळच काही अंतरावर श्री नागोबा मंदिराकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे. मुख्य रस्त्याला लागूनच भव्य असे श्री. नागोबा मंदिर प्रवेशद्वार उभारले आहे. श्री नागोबा देवाची यात्रा ही माणदेशातील भाविक-भक्तांचे आकर्षण केंद्र आहे. माणदेशाच्या सीमेपलिकडून  या यात्रेसाठी लोक येत असतात. खानदेशातील जळगांव, धुळे, नंदुरबार, चाळीसगांव, अमळनेर येथून भाविक भक्त माणदेशातील नागोबाच्या चरणी लीन होण्यासाठी येत आसतात. तसेच दौंड, माळशिरस, जत, बारामतीसह कर्नाटकातील अनंतपुर जि- विजापूर परिसरातून भाविक नागोबा यात्रेला हजेरी लावतात. नागोबा देव हा मुख्यत्वे विरकर या आडनावाच्या लोकांचे प्रमुख दैवत आहे. जसा विरकरांचा देव आहे तसा तो विरकरांच्या माणदेशातील पै-पाहुण्यांचा- नातेवाईंकांचा, माणदेशातील प्रत्येक जाती-धर्माचे लोकांचा लोकप्रिय देव नागोबा आहे. नागोबाचा मंदिर परिसर ज्या भागात आहे त्या क्षेत्राला 'कोळहोळ' या नावाने माणदेशात ओळखले जाते. तेथून वाहणाऱ्या ओढयाचे प्रचलित नाव कोळहोळ आहे.  या ओढ्याचा आणि नागोबा- बिरोबाच्या कथेत सार आहे. 

नागोबा -बिरोबा मंदिर 


घोंगडी सहित नागोबा यात्रेत
नागोबा यात्रेत जातीवंत माणदेशी खिलार बैलजोडीचे प्रदर्शन भरते. खिलार बैलांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. यात्रेच्या सुरूवातीपासून यात्रेच्या शेवटपर्यंत गजीनृत्याचा कलाअविष्काराने यात्रेकरू आनंद लुटतात. ढोल-कैताळाच्या निनादात, सनईच्या सुरात खेळले जाणारे गजीनृत्याच्या लयबद्ध घाई पाहण्यासाठी अलिकडे परदेशी पर्यटकासह, सांस्कृतिक अभ्यासक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. जिलेबी, मेवा मिठाई सारखे खाद्य पदार्थांचे भव्य स्टॉल उभारलेले पाहयला मिळतात. माणदेशी घोंगडी, जेन, लोकरीच्या कानटोप्या, संसारपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीस येते.
अश्वाची भव्य मूर्ती
यात्रा काळात कुस्त्यांचे जंगी फड भरवला जातो. नामंवत मल्लांच्या कुस्ती आखाड्यात पाहयला मिळतात. पाळणे, रसवंतीगृहे, बांगडीवाले, फिरते विक्रेते यांची रेलचेल पाहयला मिळते. पाकाळणी हा उत्सव यात्रेचा शेवटचा दिवस. पाकाळणीला माणदेशातील दूर-दूरवरचे खेडेगांवातून महिला-लहान बालके, नवविवाहित मोठ्या प्रमाणात मिळेल त्या, बैलगाडी, चारचाकी, दुचाकी वाहनाने, पायी चालत नागोबा दर्शनासाठी उपस्थिती लावतात. दहिवडी आगाराच्या म्हसवड बसस्थानकातून यात्रा काळात एसटी बसची सुविधा उपलब्ध होती. माझे स्नेही दिवगंत पत्रकार, शाहीर बाबासाहेब विरकर यांनी 'कोळहोळराजा नागोबा देव महात्म्य' ओव्या गायल्या आहेत.  यात्रेतून फेरफटका मारत असताना मेवा मिठाई विक्रीस घेऊन आलेल्या विक्रेते नबीलाल मुलाणी रा.शिवपुरी, घोंगडी विक्रीस आलेले बंगाळे(सणगर) रा.देवराष्ट्रे यांच्याकडे यात्रा कशी जाणवली? असा प्रश्नार्थक उदगार टाकल्यावर दोघांनीही यावर्षी यात्रा तशी सर्वसाधारणच होती असे सांगितले.


नागोबा येथिल बारवेच पाणि झाडांना घालताना
माणदेशातील नागोबा देवस्थानचा म्हणावा इतका विकास झालेला नाही. नागोबाचा पर्यटनस्थळाच्या दृष्टीने विकास करता येईल का यावर माणदेशी जनतेलाच निर्णय घ्यावा लागणार आहे असे वाटते. माणदेशाच्या अवती भवतीचा विचार केला तर खूप बदल जाणवतो मात्र माझा माणदेश पूर्वीसारखाच सुख-सोईअभावी विकासापासून कोसो मैलाच्या दूर अंतरावर आहे.
पुरातन काळापासून मार्गशिर्ष महिन्यात होणारी माणदेशातील प्रसिद्ध श्री. नागोबा यात्रेत खूप वर्षांनंतर कोळहोळचा राजा दर्शनासाठी जाण्याचे भाग्य लाभले. यावेळी इंडियन नेव्ही कामगार सचिन पुकळे सोबत स्वतः मी संपूर्ण यात्रेत भटकंती केली. यात्रेत फेर फटका मारत आसताना माणदेशी रंग आणि ढंगातील सर्व क्षणचित्रे सचिन पुकळे यांनी घेतली आहेत.
✍ आबासो पुकळे, १२ डिसेंबर २०१७.

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...