नामाच्या हरीच चांगभल ! गज्या ढोल्याचं चांगभल !!
दडसवाडा गजीमंडळ ता- माण जि- सातारा |
नागोबा यात्रेतील गजनृत्य
अंगी शुभ्र सफेद तीन बटणी सदरा, धोतर, डोक्यास गुलाबी फेटा आणि प्रत्येकाच्या हाती रंग-बिरंगी रूमाल असा एकसारखा कपड्यांचा पेहराव केलेले तीस ते चाळीस (गजी)खेळाडू गोल रिंगण करून ढोलाच्या ठेक्यात, सनई पिपाणी, झांजाचा निनाद आणि भोंग्याच्या वाद्याच्या सुरात बेभान होऊन नृत्यात रंगलेल्या पारंपरिक गजीनृत्याच्या डावाने नागोबा मंदिराचे आवार फुलून गेले होते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील गजीनृत्यांची पारंपरिक कला पाहण्यासाठी दूर अंतरावरून आलेले शहरी व ग्रामीण ग्रामस्थ तल्लीन होऊन जात होते.नागोबा यात्रेचे औचित्य साधून कोळहोळचा राजा "नागोबा","बिरोबा", मायाक्का मंदिर परिसरातील खुल्या मैदानामध्ये देवस्थान समितीमार्फत गजीनृत्य स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाही येथे गेल्या तीन दिवसांपासून गजीनृत्य स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील ३० ते ३५ गावांतील नामांकित गजी पथकांनी भाग घेतला आहे. गजीनृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे या नृत्यात युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटाचा सहभाग पाहावयास मिळतो. खेळाडू (गजी), जत्रकरी बेभान होऊन गजीनृत्यातील डावपेच व आखाड्याची चुणूक उपस्थित प्रेक्षकांना दाखवून त्यांना तल्लीन करत होते. गजीनृत्यातील अखेरची "घाई‘ पाहून उपस्थित प्रेक्षकही तल्लीन होत असून नकळत त्यांचे पाय थिरकतात व नाचत त्यांना साथ देत आहेत. नृत्यातील ढोलाचा ठेका, हातातील रंगीत रूमालाचा झटका, सनई, पिपाणीचा मधुर सूर व झांजाच्या गजरावाद्यात अचानक नृत्याचा प्रकार बदलणे ही आव्हानात्मक बाब नकळत कशी केली जाते, याचे गूढ शहरी व ग्रामीण भागातील उपस्थित प्रेक्षकांना उमजत नाही.
Biroba tempel |
परदेशी पर्यटकांचीही हजेरी
गजीनृत्य स्पर्धेचे विशिष्ट्य म्हणजे जी पाहुणी मंडळी या खेळ पाहण्यास हजेरी लावतात, त्यांचाही फेटा बांधून व श्रीफळ देवून सत्कार केला जातो. विशेष बाब म्हणजे ही स्पर्धा पाहण्यासाठी आता परदेशी पर्यटकांचीही प्रत्येकवर्षी हजेरी लागू लागली आहे.
राजकारणात सभेसाठी जनता गोळा करण्यासाठी मुळआदिवासी धनगरांचा गजी घाया भरवून उपयोग नव्हे वापर करून घेतात. गजिनृत्य कला माणदेशाची शान आहे. नागोबा यात्रेच गजिनृत्य मुख्य आकर्षण आहे. ही कला जोपासणे व तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. गजिनृत्य ही परंपरा नुसती कला नाही तर जीवनाचा एक भाग आहे. गजिनृत्य कला निरनिरळ्या यात्रेत, सण, उत्सवात सादर केली जाते.
नामाच्या हरीच चांगभल ! गज्या ढोल्याचं चांगभल !!
-आबासो पुकळे २३ डिंसेबर २०१४
नागोबा बिरोबा गजात गजीनृत्य खेळताना गजीमंडळ.
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.