Sunday, September 23, 2018

श्रमदानात अग्रभागी असणारी बालिका : संस्कृती

पुकळेवाडीची कन्या : संस्कृती
"पहिल्या वर्षी श्रमदान करायचं, पुढच्या वर्षी शाळा शिकायची" : संस्कृती पुकळे
                   
कायम दुष्काळ अशीच माणदेशाची ओळख जनमाणसात रूजलेली आहे.  सामाजिक, भौगोलिक, क्रिडा, राजकीय दृष्ट्या माणदेशाचे रूप अलिकडच्या काळात कमालीचे बदलत आहे. दिनांक ८ एप्रिल रोजी सिने अभिनेता अमिर खान यांच्या 'पाणी फाॅडेंशन' आयोजीत 'वाटर कप' स्पर्धेस सुरुवात झाली आहे. राज्यभरात गांवागावात लोक गावाचा कायापालट करण्याचा मनामध्ये चंग बांधून श्रमदानासाठी घराबाहेर पडत आहेत. पाणी व श्रमदानाचे महत्व उमगलेले नागरीक गावगाड्यात जनमाणसात जाऊन जनजागृती करताहेत. माण देशातील ६० गांवे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. चारी बाजूंनी श्री शंभू महादेवाच्या डोंगर रांगात वसलेले कष्टकरी, मेंढपाळाचं पुकळेवाडी गांवही त्या स्पर्धेत सहभागी झाले आहे.  पुकळेवाडीत शेकडो नागरीकांचे हात प्रत्यक्षात गावाचा कायापालट करायचाचं संकल्प करून रात्रंदिवस तळमळीने झटत आहेत. सर्व थरातील लोक तसेच लहान-थोर मुलेही श्रमदानात सहभागी झाली आहेत. 

लहान मुलीचा आदर्श समाजाने घ्यावाच
वडिलांसोबत हातात घम्याल घेऊन श्रमदानासाठी निघालेली लहान बालिका संस्कृती पुकळे 

अजून गावाची सीमा न ओलांडलेली. घर ते शाळा. शाळा ते रानं, घरी पाळलेले पशूधन बैल, गाय, शेळ्या- मेंढ्या इतकेच जग माहीत असलेली 'संस्कृती' नावाची  वय वर्ष 5 असणारी पुकळेवाडीच्या उत्तम वस्ताद पुकळे यांची तृतीया कन्या.
आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळणारी संस्कृती तिच्या पेक्षा वयाने मोठी असलेल्या बहिणीच्या बोटाला धरून आताशा शाळेत जायाला लागली होती. अशातच पुकळेवाडी मायभूमीत श्रमदानाचे काम सुरू झाले आणि संस्कृती शाळेत न जाता घरातील आई वडिलांसोबत हातात घमेल घेऊन श्रमदानासाठी न चुकता हजर राहु लागली.  खरेतर मी संस्कृतीला संकर म्हणतो. कारण तीचे दिवगंत आजोबा वस्ताद (नाना) पुकळे हे तीला लाडाने संकर म्हणायचे. मीही तीच्या आजोबांच्या सुरात सुर मिसळून तिला संस्कृती न म्हणता संकरच म्हणतो. संस्कृतीला संकर म्हणून संबोधने यातच माणदेशी संस्कृतीचा बोली भाषेतील ढंग समजून येतो. 

मंगळवारच्या रात्री बारा वाजले तरी गांव पंढरीचे भले व्हावे यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच गांवकरी कामाचा आढावा घेत होते. मीही मंदिराच्या कट्यावर बसून त्यांच्या धडपडीस मनापासून दाद देत होतो. पहाटे तुफान आलंय गाण्यानं झोपेतून जागे केले. बुधवारी सकाळच्या उन्हाला उन्ह खांत बसलेले काही गावकरी मंडळी गप्पात रंगले होते. अशातच मी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन कुलस्वामीनी आई मायाक्कादेवी मंदिरा जवळ उन्हाची किरणे आघांवर घेत थांबलो होतो. इतक्यात लहान असलेली संस्कृती तिच्या वडिलांच्या सोबत हातात पाटी घेऊन श्रमदानासाठी जाताना दिसली. मी सहजच संस्कृतीच्या वडिलांशी म्हणजे उत्तम आण्णांशी बोललो, तर उत्तम (आण्णा) म्हणाले,  "संस्कृती शाळेत जायाच सोडून,  काम चालू झाल्यापासून रोज श्रमदानाला करायला चला म्हणून आमच्या घरी सगळ्यात अगोदर हजर असते."  संस्कृती शाळेत का येत नाही याची तिच्या मोठ्या बहिणीकडें गुरूजी चौकशी करू लागले. संस्कृतीला शाळेत आणा म्हणून गुरूजींनी घरी सांगावा धाडला. पण गावासाठी श्रमदानाचा निर्धार केलेल्या लहानशा संस्कृतीने घरच्यांना सांगितले की, 'शाळा पुढच्या वर्षी जायाला येईल, पण पाणी फाॅडेंशन पुन्हा नाही. संस्कृतीने सलग दहा दिवस शाळेच नाव देखील घरी काढू दिले नाही. खरेतर पुढच्या वर्षीपासून कायमस्वरूपी संकरीच नाव शाळेत  दाखल करायचं आहे असे संस्कृतीची आजी सुमन पुकळे सांगत होत्या.

संस्कृतीचे वडिल अनपढ आहेत. आजोबांसोबत संस्कृतीच्या वडिलांनी जन्मापासून माणदेश ते कराड वाळवा इस्लामपूर पर्यंत मेंढर राखली. कदाचित आपल्या आजोबांच्या, वडिलांच्या वाटेला आलेली भंटकती थांबावी यासाठी संस्कृतीने श्रमदान करून गांव पाणीदार करण्याचा निर्धार तर केला नसावा ना ? असा प्रश्न कोणापुढेही उभा राहू शकतो. शाळेत गेल्यानंतर, थोडेसे ज्ञान आले की लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शाळा करणारी माणसे समाजात दिसतात तर दुसरीकडे शाळेत दाखल होण्यापूर्वी श्रमदानाचं महत्व जाणून आपल्या वडीलांसोबत हजर राहणारी संस्कृती जनमाणसाला बरेच काही शिकवते.

माणदेशी संस्कृती आणि अस्मिता काय असते  हे पुकळेवाडीच्या संस्कृती उत्तम पुकळे या लहान अहिल्या कन्येकडून जरूर शिकावे.पुकळेवाडीच्या संस्कृतीचे बोल ऐकले आणि गांवकरीही भारावून गेले. "धन्य ती संस्कृती ,पवित्र ते कुळ पावनभूमी पुकळेवाडी असेच म्हणावे लागेल. पुढील वर्षापासून शाळेत जाऊ इच्छिणा-या संस्कृतीला शैक्षणिक प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा....!
✍ आबासो पुकळे, पुकळेवाडी ता-माण.
दिनांक : ११ मे २०१८

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...