Saturday, September 22, 2018

भटक्या-विमुक्त समाज शहरात भटकतोय

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही भटक्या-विमुक्त समाजाची परवड सुरूच
कळंबोली- नवी मुंबई शहरात भटके समाजातील लोक

भारत देश परकीयांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला परंतु भारतीय स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटल्यानंतरही भारतातील भटका समाज स्वकीयांच्या कट कारस्थानाचा बळी ठरल्याच चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत सांस्कृतिक वारसा जपणार्र्या भटक्या समाजाची शासनाकडून परवड सुरूच असल्याचं धक्कादायक वास्तव चित्र खेड्यासह शहरात पाहायला मिळत आहे. 
स्वत:चे गाव नाही की राहते घर. जन्माच्या नोंदी झालेल्या नाहीत की महसुली पुरावे नाहीत. शाळेलाच गेलो नाही, तर शाळा सोडल्याचा दाखला कोण देणार, गाव-घर नसल्याने रेशनकार्ड नाही, अशा बिकट स्थितीत जीवन जगणार्र्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या-विमुक्त समाजाला न्याय मिळावा म्हणून गेली काही वर्षे लढा सुरू आहे; पण सरकार भटक्या समाजाला न्याय द्यायलाच तयार नाही. धनगर समाज, गवळी समाज, बेलदार समाज, मसनजोगी समाज, बंजारा समाज, वंजारी समाज, घिसाडी समाज, लोहार समाज, गोसावी समाज, रामोशी समाज, दरवेशी समाज, कोरवी समाज,कैकाडी समाज, डोंबारी समाज, कोल्हाटी समाज, वडर समाज, भोई समाज, हेळवी समाज आदी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.   
राज्यात संख्येने दुसर्र्या क्रमांकावर असणारा धनगर समाज अनुसचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करून दाखले मिळवण्यासाठी शासनदरबारात लाखोंचे मोर्चे काढताना दिसतोय. मात्र राज्यकर्ते धनगर समाजाच्या नेहमी तोंडाला पाने पुसत आले आहे. धनगर-धनगड वेगळे आहे, तिसरी सुची शिफारस, आदिवासी समाजाचा विरोध, चुकीच्या पद्धतीने TIIS कडून अभ्यास या सर्व गोष्टी धनगर समाजाची दिशाभृल करणार्र्या आहेत. अनुसुचित जमातीचे दाखले मिळवण्यासाठी धनगर समाजाची राज्य व केंद्र शासनाकडून परवड सुरू आहे. वर्षातील आठ महिने ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करत उघड्यावर पालातल जिवन जगणारा धनगर समाज परिस्थितीला सामोरा जातोय.सरकार समाजाची परवड थांबवेल या आशेवर आपला संसार घोड्याच्या पाठीवर लादून भटकंती करत आहे. धनगर समाज मेंढ्याचे कळप घेऊन कोकणात दाखल झाला आहे. निसर्गाशी जुळवून घेत मेंढ्या हाकणारे धनगर तरूण माथाडी कामाच्या निमित्ताने शहरात विसावलेत. पनवेल शहरात सध्या नंदिवाले समाजाची पाल खांदा काॅलनीत दाखल झाले आहेत. नंदीबैल घेऊन नंदिवाले समाजाची मुल कामोठे, कळंबोली, पनवेल शहरात दारोदार फिरताना दिसत आहे. नंदिवाले समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप दरवर भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे.नंदिवाले समाजाने दारोदार फिरून भांडी विकण्याचा धंदा सुरू केला आहे. नंदिवाले समाज अंत्यत हालाखीचे जीवन जगत आहे. शहरात ना चारा, ना पाणी अशा अवस्थेत नंदिवाले समाजाला नंदी पाळताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. कंळबोली बसस्थानका शेजारी बेलदार समाजातील महिला उघड्यावरच रात्री थंडीचा सामना करत मुक्काम करताना आढळत आहेत. दिवसभर दगडी पाटा-वरवंटा डोक्यावर घेऊन शहरात भटकत आहेत. आधुनिक सुख-सुविधांच्या जमान्यात पाटा-वरवंटयाच्या मागणीत घट होत आहे. परिस्थितीने नाडलेल्या बेलदार समाजाची भटकंती थांबवणे क्रमप्राप्त आहे. महिला,बाल-कल्याण सक्षमी करणाच्या गप्पा मारणार सरकार भटक्या-विमुक्त समाजातील महिलांची परवड थांबवेल का ? शहारातील रस्त्या-रस्त्यांवर डोक्यावर मरीआईचा गाडा घेऊन अंगावर चाबकाचे वळ उठवून घेणारा कडक लक्ष्मीवाले समाज भटकताना दिसत आहे. भारतीय महासत्तेच्या वलग्ना करणार्र्या केंद्र व राज्यातील शासनाला भटक्या-विमुक्त समाजाची परवड थांबवावी लागेल. शासनाच्या समाज-कल्याण खात्याने भटक्या -विमुक्त समाजासाठी कोणत्याही प्रकारच्या ठोस योजना आखलेल्या नाहीत. अ.जा./ अ.ज.सारख्या शासकीय योजना भटक्या-विमुक्त सामाजासाठी सुरू कराव्यात अशा प्रकारच्या मागण्या भटक्या-विमुक्त समाजातून व्यक्त केल्या जात आहेत. 

- आबासो पुकळे, कळंबोली ता- पनवेल
 दि- १० डिसेंबर २०१५

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...