Monday, September 24, 2018

महाश्रमदान पुकळेवाडी

समाजसेवी संस्था, अधिकारी वर्गाची पुकळेवाडीच्या दिशेने लागली रीघ...!
श्री. शंभू महादेवाच्या डोंगर रागांनी तयार झालेल्या नैसर्गिक द्रोणीत वसलेल्या पुकळेवाडी ता- माण या छोटेश्या गांवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून समाजसेवी संस्थाचे पदाधिकारी, शासन, प्रशासनातील अधिकारी वर्गाची अक्षरशा रीघ लागली आहे.  पुकळेवाडीच्या मातीत श्रमदान करण्यासाठी हाजारो हात राबताहेत . त्या हाजारों बंधू भगिनींच्या हातात हात घालून काम करण्यासाठी, माणदेशाची भोगोलिक ओळख 'पाणीदार माणदेश' करण्यासाठी दिनांक १३ मे २०१८ रोजी पुकळेवाडी येथे रीघ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सर्वसाधारणतः रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असतो पण, सतत कष्ट करणे, संघर्षमय जीवन जगणे हा माणदेशी माणसासाठी नित्याचेच. पुकळेवाडी असो किंवा माणदेशातील अन्य गावे असोत यांना कसली आलीया ....सुट्टी ? विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस हा पुकळेवाडी गावाचा महाश्रमदानाचा दिवस असतो. सुट्टीनिमीत्त महाश्रमदानाचे औचीत्य साधून नेरूळ (नवी मुंबई) येथील श्री सदगुरु नागरी सहकारी पतसंस्था मुंबई यांच्याकडून  पुकळेवाडी ता- माण येथे श्रमकरी, गांवकरी यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. या भोजनाच्या तयारीची धावपळ चालू असतानाच पुकळेवाडीच्या मातीला आणि गावक-यांना वंदन करण्यासाठी लोधावडे ता-माण गावचे सुपुत्र तथा विद्यमान पुणे उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख साहेब व त्यांच्या समवेत वैभव मोरे, नथुराम जाधव, स्वप्नील काटकर, बंटी गायकवाड, ऋषी जगताप, अक्षय जाधव, गणेश माने व टिम गावात पोहचले आणि श्रमदानात सहभागी झाले. तसेच तालुक्यात प्रसिद्ध पुकळेवाडी जि/प शाळेस भेट देऊन ग्रामस्थ, शिक्षकांचे पुणे उपजिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी कौतुक केले.
क्षणभर जातो न जातो तोच 'म्हसवड मेडीकल आसोसिएशनचे सर्व डाॅक्टर व त्यांच्या समवेत रासपा माण खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे' श्रमदानासाठी पुकळेवाडीत दाखल झाले. 'सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मेहेर गांधी, म्हसवड शहर अध्यक्ष राजेश शहा, सत्यजीत दोशी (अकलूज) व त्यांच्या समवेत सेवा दलाचे युवक उपस्थित झाले.

श्रमदानात आघाडीवर असलेल्या पुकळेवाडी गावाचे कौतुक करण्यासाठी माणदेशाच्या भुमीकन्या माण तालुका तहसिलदार तथा नुकतीच उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळालेल्या सुरेखाताई माने, पुकळेवाडी गावाला सॅल्युट करण्यासाठी, कोणत्याही परिस्थीत पुकळेवाडी गावांत 'वाटर कप' आणायचाचं असा आत्मविश्वास बळगणारे 'पाणी फाॅडेंशन'चे समन्वयक  डाँ. प्रदीप पोळ हेही आवर्जुन उपस्थित राहीले. पाठोपाठ माणदेशाचा कायमचाच दुष्काळ संपवण्याचा संकल्प करून माण तालुक्यासाठी १४० यांत्रिक मशिनी  व  पुकळेवाडी गांवासाठी २ मशीनी उपलब्ध करून देणारे भारतीय जैन संघटनेचे  माण तालुका अध्यक्ष भरतेश गांधी व संघटनेचे पदाधिकारी /कार्यकर्ते  यांनी पुकळेवाडी भूमीत प्रवेश केला.

एक दिवस अगोदरच मुंबईहून पुकळेवाडीच्या दिशेने रवाना झालेले श्री सदगुरू नागरी सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र कलाकर संघाचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र लिगाडे, उपाध्यक्ष हणमंत गरड, सचिव महादेव बाबा पुकळे(मास्तर), बाबुराव विठोबा पुकळे, खजिनदार गणेश मोटे, व्यवस्थापक रामचंद्र राजाराम पुकळे, संचालक नामदेव मोहीते, मनिषा लिगाडे, साक्षी लिगाडे, संजय सिदरूख, महादेव आण्णा पुकळे सर हे शनिवारी मध्यरात्रीच पुकळेवाडीत दाखल झाले होते. पुकळेवाडी ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून श्री. लिगाडे परीवाराने श्रमदानात घेतलेला सहभाग हा उपस्थितांचा उत्साह वाढवणारा होता. या सर्वांचे पुकळेवाडी पाणी फाउंडेशन, ग्रामस्थांनी आगळ्यावेगळ्या स्टाईलने जोरदार स्वागत केले. दि.  ८ एप्रिल पासून पुकळेवाडीच्या दिशेने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे. विशेषतः वरील सर्व मान्यवरांनी भेट देऊन पुकळेवाडी ग्रामस्थांचा उत्हास वाढवत मनोबल वाढवले. हेच मनोबल पुकळेवाडी गावाचा कायापालट करून जाणार हे मात्र ठामपणे सांगावेच लागेल.

✍ आबासो पुकळे, श्री क्षेत्र सिध्दनाथ गड, पुकळेवाडी.

दिनांक- १४ मे २०१८.

Sunday, September 23, 2018

श्रमदानात अग्रभागी असणारी बालिका : संस्कृती

पुकळेवाडीची कन्या : संस्कृती
"पहिल्या वर्षी श्रमदान करायचं, पुढच्या वर्षी शाळा शिकायची" : संस्कृती पुकळे
                   
कायम दुष्काळ अशीच माणदेशाची ओळख जनमाणसात रूजलेली आहे.  सामाजिक, भौगोलिक, क्रिडा, राजकीय दृष्ट्या माणदेशाचे रूप अलिकडच्या काळात कमालीचे बदलत आहे. दिनांक ८ एप्रिल रोजी सिने अभिनेता अमिर खान यांच्या 'पाणी फाॅडेंशन' आयोजीत 'वाटर कप' स्पर्धेस सुरुवात झाली आहे. राज्यभरात गांवागावात लोक गावाचा कायापालट करण्याचा मनामध्ये चंग बांधून श्रमदानासाठी घराबाहेर पडत आहेत. पाणी व श्रमदानाचे महत्व उमगलेले नागरीक गावगाड्यात जनमाणसात जाऊन जनजागृती करताहेत. माण देशातील ६० गांवे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. चारी बाजूंनी श्री शंभू महादेवाच्या डोंगर रांगात वसलेले कष्टकरी, मेंढपाळाचं पुकळेवाडी गांवही त्या स्पर्धेत सहभागी झाले आहे.  पुकळेवाडीत शेकडो नागरीकांचे हात प्रत्यक्षात गावाचा कायापालट करायचाचं संकल्प करून रात्रंदिवस तळमळीने झटत आहेत. सर्व थरातील लोक तसेच लहान-थोर मुलेही श्रमदानात सहभागी झाली आहेत. 

लहान मुलीचा आदर्श समाजाने घ्यावाच
वडिलांसोबत हातात घम्याल घेऊन श्रमदानासाठी निघालेली लहान बालिका संस्कृती पुकळे 

अजून गावाची सीमा न ओलांडलेली. घर ते शाळा. शाळा ते रानं, घरी पाळलेले पशूधन बैल, गाय, शेळ्या- मेंढ्या इतकेच जग माहीत असलेली 'संस्कृती' नावाची  वय वर्ष 5 असणारी पुकळेवाडीच्या उत्तम वस्ताद पुकळे यांची तृतीया कन्या.
आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळणारी संस्कृती तिच्या पेक्षा वयाने मोठी असलेल्या बहिणीच्या बोटाला धरून आताशा शाळेत जायाला लागली होती. अशातच पुकळेवाडी मायभूमीत श्रमदानाचे काम सुरू झाले आणि संस्कृती शाळेत न जाता घरातील आई वडिलांसोबत हातात घमेल घेऊन श्रमदानासाठी न चुकता हजर राहु लागली.  खरेतर मी संस्कृतीला संकर म्हणतो. कारण तीचे दिवगंत आजोबा वस्ताद (नाना) पुकळे हे तीला लाडाने संकर म्हणायचे. मीही तीच्या आजोबांच्या सुरात सुर मिसळून तिला संस्कृती न म्हणता संकरच म्हणतो. संस्कृतीला संकर म्हणून संबोधने यातच माणदेशी संस्कृतीचा बोली भाषेतील ढंग समजून येतो. 

मंगळवारच्या रात्री बारा वाजले तरी गांव पंढरीचे भले व्हावे यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच गांवकरी कामाचा आढावा घेत होते. मीही मंदिराच्या कट्यावर बसून त्यांच्या धडपडीस मनापासून दाद देत होतो. पहाटे तुफान आलंय गाण्यानं झोपेतून जागे केले. बुधवारी सकाळच्या उन्हाला उन्ह खांत बसलेले काही गावकरी मंडळी गप्पात रंगले होते. अशातच मी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन कुलस्वामीनी आई मायाक्कादेवी मंदिरा जवळ उन्हाची किरणे आघांवर घेत थांबलो होतो. इतक्यात लहान असलेली संस्कृती तिच्या वडिलांच्या सोबत हातात पाटी घेऊन श्रमदानासाठी जाताना दिसली. मी सहजच संस्कृतीच्या वडिलांशी म्हणजे उत्तम आण्णांशी बोललो, तर उत्तम (आण्णा) म्हणाले,  "संस्कृती शाळेत जायाच सोडून,  काम चालू झाल्यापासून रोज श्रमदानाला करायला चला म्हणून आमच्या घरी सगळ्यात अगोदर हजर असते."  संस्कृती शाळेत का येत नाही याची तिच्या मोठ्या बहिणीकडें गुरूजी चौकशी करू लागले. संस्कृतीला शाळेत आणा म्हणून गुरूजींनी घरी सांगावा धाडला. पण गावासाठी श्रमदानाचा निर्धार केलेल्या लहानशा संस्कृतीने घरच्यांना सांगितले की, 'शाळा पुढच्या वर्षी जायाला येईल, पण पाणी फाॅडेंशन पुन्हा नाही. संस्कृतीने सलग दहा दिवस शाळेच नाव देखील घरी काढू दिले नाही. खरेतर पुढच्या वर्षीपासून कायमस्वरूपी संकरीच नाव शाळेत  दाखल करायचं आहे असे संस्कृतीची आजी सुमन पुकळे सांगत होत्या.

संस्कृतीचे वडिल अनपढ आहेत. आजोबांसोबत संस्कृतीच्या वडिलांनी जन्मापासून माणदेश ते कराड वाळवा इस्लामपूर पर्यंत मेंढर राखली. कदाचित आपल्या आजोबांच्या, वडिलांच्या वाटेला आलेली भंटकती थांबावी यासाठी संस्कृतीने श्रमदान करून गांव पाणीदार करण्याचा निर्धार तर केला नसावा ना ? असा प्रश्न कोणापुढेही उभा राहू शकतो. शाळेत गेल्यानंतर, थोडेसे ज्ञान आले की लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शाळा करणारी माणसे समाजात दिसतात तर दुसरीकडे शाळेत दाखल होण्यापूर्वी श्रमदानाचं महत्व जाणून आपल्या वडीलांसोबत हजर राहणारी संस्कृती जनमाणसाला बरेच काही शिकवते.

माणदेशी संस्कृती आणि अस्मिता काय असते  हे पुकळेवाडीच्या संस्कृती उत्तम पुकळे या लहान अहिल्या कन्येकडून जरूर शिकावे.पुकळेवाडीच्या संस्कृतीचे बोल ऐकले आणि गांवकरीही भारावून गेले. "धन्य ती संस्कृती ,पवित्र ते कुळ पावनभूमी पुकळेवाडी असेच म्हणावे लागेल. पुढील वर्षापासून शाळेत जाऊ इच्छिणा-या संस्कृतीला शैक्षणिक प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा....!
✍ आबासो पुकळे, पुकळेवाडी ता-माण.
दिनांक : ११ मे २०१८

माणदेशात श्रमदान

माणदेशातील टंचाईग्रस्त गावातील नागरिकांनी पाणीदार गाव बनवण्यासाठी उचलाय विडा..

माणदेशात नवा आदर्श : पुकळेवाडीत 85 वर्षाच्या वयोवृद्धासह लहान थोर श्रमदानासाठी एकवटले

 नुकतेच माण तालुक्यातील सोळा गावातील आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आल्यामुळे अशी गावे टंचाईग्रस्त म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहेत. विशेष बाब म्हणजे टंचाईग्रस्त गावातील नऊ गावे सत्यमेव जयते वाटर कफ स्पर्धेत सहभागी झाली आहेत. टंचाईग्रस्त गावातील नागरीकांनी पाणीदार गांव बनवण्यासाठी विडा उचल्याचे चित्र माणदेशात पाहयला मिळत आहे. माणदेशाच्या सीमेवर असणा-या पुकळेवाडी गावातील नागरिकांनी आपआपसांतील हेवेदावे बाजुला ठेऊन दमदार पाऊल टाकले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात राहणा-या पुकळेवाडीतील नागरीकांनी जोतिबा मंदिरात एकत्र येऊन गावासाठी तन-मन-धनाने सहभागी होण्याचा निर्धार करून कामाला सुरुवात केली आहे.

गत वर्षी माण तालुक्यात पाऊस पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. तसेच तालुक्यातील काही भागात चांगला पाऊस झाला होता. परंतु कुकुडवाड व परिसरातील अनेक गावांना मागील वर्ष पावसाने शेवटपर्यंत हुलकावणी दिली होती. या भागात पाऊस पडला नसल्यामुळे जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली होती. तसेच रब्बीच्या हंगामाला पाणी कमी पडल्यामुळे शेतक-यांना चांगलाच फटका बसला होता. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह नगदी पिकांना जोरदार फटका बसला होता.


त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील शेतक-यांना शासनाच्या तरतुदीप्रमाणे विविध सवलती मिळतात. मात्र, त्यामध्ये शेतक-यांना नक्की काय फायदे मिळतात याची सुस्पष्ट कल्पना मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहतात. टंचाईग्रस्त गावाच्या यादीत कुकुडवाड, पुकळेवाडी, आगासवाडी, जांभुळणी, वळई, दिवड, दिडवाघवाडी, पानवण, नरवणे, काळेवाडी, दोरगेवाडी, वडजल, गटेवडी, ढाकणी, विरळी, चिलारवाडी आदी गावांचा समावेश आहे. तसेच ही गावे कमी पावसामुळे सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. दरवर्षी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. अन् वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागतो. म्हणून यावर्षी सत्यमेव जयते वाटरकफ स्पर्धेत टंचाईग्रस्त गावातील पुकळेवाडी, कुकुडवाड, नरवणे, वडजल, विरळी, दिवड, आगासवाडी, चिलारवाडी या गावांनी स्पर्धेत भाग घेऊन दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.आठ एप्रिल ते बावीस मे दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

पाणी टंचाईचे संकट कायम दूर झालंच पाहिजे असा विडा या गावातील सर्व महिला, तरुण, व नागरिकांनी उचलून जोरदारपणे कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे गावाला टँकर मुक्त करण्याचा निर्धार गावक-यांनी केला आहे. अनेक नागरिक नोकरी व व्यवसायच्या निमित्ताने मुंबई, पुणेसह परराज्यात राहतात; त्यांनी यावेळी गावासाठी वाट्टेल ते करायचेच भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे स्थानिक नागरिक कामाला लागले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुकळेवाडी गावात 80 ते 85 वय पूर्ण केलेले वयोवृद्धांनी पाणी फाॅडेंशनच्या कामात सहभागी होऊन एक आगळावेगळा आदर्श माणदेशात उभा केला आहे. आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष करणार्‍या येसाबाई मारुती पुकळे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र काशिनाथ पुकळे (मुंबई) यांनी दुःख  पचवून श्रमदानात सहभागी होत अनोख्या पध्दतिने श्रद्धांजली अर्पण केली.  पुकळेवाडी गावक-यांसोबत मुंबई महानगरपालिका नगरसेवक विजय तांडेल, मंत्रालयातील उपसचिव नामदेव भोसले, माण-खटाव प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाॅडेंशन समन्वयक अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवून श्रमदानात सहभाग घेतला. श्रमदान करण्यासाठी  लहानापासून थोरापर्यंत पुकळेवाडीकर एकवटले आहेत. माणदेशातील गावे पाणीदार झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.  
- आबासो  पुकळे
८  एप्रिल २०१८

इंग्रजांना रेल्वेचा मार्ग दाखवणारा हुतात्मा शिंग्रोबा

'स्वतंत्र भारतात शिंग्रोबा धनगरावर राज्यकर्त्याकडून अन्याय'
इंग्रजांना रेल्वेचा मार्ग दाखवणारा हुतात्मा शिंग्रोबा

नसानसात भारतमातेविषयी राष्ट्रप्रेम असल्यामुळेच राष्ट्रनायक शिंग्रोबा धनगरास गोर्र्याकातडीच्या साहेबांनी गोळ्या घालून ठार केले. भारतीय स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या शिंग्रोबा धनगराची स्वतंत्र भारतात उपेक्षाच झाली.
        "शिंग्रोबा''
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रोबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा "रस्ता' कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रोबा! धनगरांची स्वतःची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रोबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रोबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेंढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न्‌ खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रोबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रोबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रोबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रोबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रोबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते. जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्‌मयाचे "छापील' ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व १९६६ ते १९९१ या काळात धनगरांच्या चालीरीती, संस्कृती, ओव्या, इतिहास, पशुपाल
न पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले.

मौखिक परंपरेने चालत आलेली शिंग्रोबाची धनगरी ओवी 

       "शिंग्रोबा ओवी''
इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु महादबुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं (दोन वेळा म्हणणे)
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
(सुंबरान याचा अर्थ स्मरण, इथे अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण)
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
पइल्या सत यौगाला आता। 
खंडाळ्याच्या घाटाला खंडाळ्याच्या घाटाला। गोरा मंग सायेब ॥
शिंग्रोबा हे नावाचा। रहात व्हता धनगर ॥
खंडाळ्याच्या घाटाला। शेळ्या-मेंड्या राकाइला ॥
गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला ॥
खंडाळ्याच्या घाटाला। रस्ता नव्हता घावत ॥
गोरा मंग सायब। शिंग्रोबाला बोलतो 
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला ॥
हर हर म्हादेवा ।  हर हर शंकरा ॥
आता ऐका! गोऱ्या साहेबाला शिंग्रोबा धनगराने रस्ता दाखविल्यावर काय बक्षीस गोऱ्या सायबानं शिंग्रोबाला दिलं त्याची कथा! (निर्दयी ब्रिटिशांनी शिंग्रोबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलं.) 

गोऱ्या मंग सायबानं हो। बंदुकीला गोळी या आन्‌ गोळी त्यानं भरले। शिंग्रोबाला मारले गोळी त्यानं भरलं। शिंग्रुबाला मारलं ॥
गोळियांचा आवाज गं। मेंड्यांच्या ये कानाला ॥
आन्‌ गोळी मग आइकून। शिंग्रोबाच्या भवतनं ॥
गोळी मग आइकून। शिंग्रोबाच्या भवतनं ॥
शेळ्या बगा मेंड्या या। शिंग्रोबाच्या भवतनं ॥
आन्‌ गोळा बगा वव्हून। वर्डायाला लागल्या ॥
आन्‌ नाराळाचं फळ या। फळ बगा देऊन ॥
आन्‌ खंडाळ्याच्या या घाटाला। गाडी उबा या राहिलं ॥
नाराळाचं फळ या । फळ बगा देऊन ॥
गाडी गेली निगून । पुण्याच्या हे जाग्याला ॥
हर हर महादेवा ।  हर हर ये शंकरा ॥
सुंबरान मांडिलं । सुंबरान मांडिलं ॥
- मुंबई - पुणे राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग शिंग्रोबा धनगर यांच नाव देण्यात यावे.
- कोकण रेल्वे मुख्यालय, बेलापूर यांस शिंग्रोबा धनगर यांच नाव देऊन भारतमातेच्या भुमीपुत्रास स्वतंत्र भारतात न्याय द्यावा अशा प्रकारची राष्ट्रीय समाज पक्षाने, हिंदुस्थान प्रजा पक्षाने वेळोवेळी शासन दरबारी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे परंतु शासनाने अजून कोणतीही दखल घेतल्याचे दिसत नाही .-मुंबई द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे प्रसंगी रास्ता रोकोही केलेले आहेत. नवी मुंबई  पोलीसांनी अांदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. प्रत्येक  वर्षी १ मे ला सह्याद्रीच्या घाटात हुतात्मा शिंग्रुबाच्या मंदिराजवळ कार्यक्रम आयोजित केला जातो. कोकणातील बांधव उपस्थित राहतात.
खंडाऴा घाटातील शिंग्रोबा मंदिर
✍ कळंबोलीहून  आबासो पुकळे, मु. पुकळेवाडी ता- माण
१४ जानेवारी २०१६

कोळहोळराजा : श्री क्षेत्र नागोबा दर्शन

"कोळहोळचा राजा श्री.नागोबा देवदर्शनासाठी माणदेशात...





नागोबा यात्रेत झाडाखाली सावलीचा आनंद घेताना
विलिंग्डन काॅलेजमधील सत्र परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन माझ्या माणदेशातील पुकळेवाडी या मातृभूमीत पाऊल टाकतो न टाकतो तोच मला 'नागोबा यात्रा' असल्याचे समजले. क्षणभर घरी थांबून नागोबा यात्रेस जाण्याचा बेत केला आणि तडक रस्ता धरला तोच आठवड्याच्या सुट्टीवर आलेल्या नेव्ही कामगार सचिन पुकळे मोटारसायकलचा हाॅर्न वाजवतच माझ्याजवळ पोहचले. सचिन पुकळे यांच्या दुचाकीवरून माणदेशातील कोळहोळ राजाच्या दर्शनासाठी थेट नागोबा यात्रेतच विसावलो. म्हसवड-मायणी मार्गावर म्हसवड जवळच काही अंतरावर श्री नागोबा मंदिराकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे. मुख्य रस्त्याला लागूनच भव्य असे श्री. नागोबा मंदिर प्रवेशद्वार उभारले आहे. श्री नागोबा देवाची यात्रा ही माणदेशातील भाविक-भक्तांचे आकर्षण केंद्र आहे. माणदेशाच्या सीमेपलिकडून  या यात्रेसाठी लोक येत असतात. खानदेशातील जळगांव, धुळे, नंदुरबार, चाळीसगांव, अमळनेर येथून भाविक भक्त माणदेशातील नागोबाच्या चरणी लीन होण्यासाठी येत आसतात. तसेच दौंड, माळशिरस, जत, बारामतीसह कर्नाटकातील अनंतपुर जि- विजापूर परिसरातून भाविक नागोबा यात्रेला हजेरी लावतात. नागोबा देव हा मुख्यत्वे विरकर या आडनावाच्या लोकांचे प्रमुख दैवत आहे. जसा विरकरांचा देव आहे तसा तो विरकरांच्या माणदेशातील पै-पाहुण्यांचा- नातेवाईंकांचा, माणदेशातील प्रत्येक जाती-धर्माचे लोकांचा लोकप्रिय देव नागोबा आहे. नागोबाचा मंदिर परिसर ज्या भागात आहे त्या क्षेत्राला 'कोळहोळ' या नावाने माणदेशात ओळखले जाते. तेथून वाहणाऱ्या ओढयाचे प्रचलित नाव कोळहोळ आहे.  या ओढ्याचा आणि नागोबा- बिरोबाच्या कथेत सार आहे. 

नागोबा -बिरोबा मंदिर 


घोंगडी सहित नागोबा यात्रेत
नागोबा यात्रेत जातीवंत माणदेशी खिलार बैलजोडीचे प्रदर्शन भरते. खिलार बैलांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. यात्रेच्या सुरूवातीपासून यात्रेच्या शेवटपर्यंत गजीनृत्याचा कलाअविष्काराने यात्रेकरू आनंद लुटतात. ढोल-कैताळाच्या निनादात, सनईच्या सुरात खेळले जाणारे गजीनृत्याच्या लयबद्ध घाई पाहण्यासाठी अलिकडे परदेशी पर्यटकासह, सांस्कृतिक अभ्यासक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. जिलेबी, मेवा मिठाई सारखे खाद्य पदार्थांचे भव्य स्टॉल उभारलेले पाहयला मिळतात. माणदेशी घोंगडी, जेन, लोकरीच्या कानटोप्या, संसारपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीस येते.
अश्वाची भव्य मूर्ती
यात्रा काळात कुस्त्यांचे जंगी फड भरवला जातो. नामंवत मल्लांच्या कुस्ती आखाड्यात पाहयला मिळतात. पाळणे, रसवंतीगृहे, बांगडीवाले, फिरते विक्रेते यांची रेलचेल पाहयला मिळते. पाकाळणी हा उत्सव यात्रेचा शेवटचा दिवस. पाकाळणीला माणदेशातील दूर-दूरवरचे खेडेगांवातून महिला-लहान बालके, नवविवाहित मोठ्या प्रमाणात मिळेल त्या, बैलगाडी, चारचाकी, दुचाकी वाहनाने, पायी चालत नागोबा दर्शनासाठी उपस्थिती लावतात. दहिवडी आगाराच्या म्हसवड बसस्थानकातून यात्रा काळात एसटी बसची सुविधा उपलब्ध होती. माझे स्नेही दिवगंत पत्रकार, शाहीर बाबासाहेब विरकर यांनी 'कोळहोळराजा नागोबा देव महात्म्य' ओव्या गायल्या आहेत.  यात्रेतून फेरफटका मारत असताना मेवा मिठाई विक्रीस घेऊन आलेल्या विक्रेते नबीलाल मुलाणी रा.शिवपुरी, घोंगडी विक्रीस आलेले बंगाळे(सणगर) रा.देवराष्ट्रे यांच्याकडे यात्रा कशी जाणवली? असा प्रश्नार्थक उदगार टाकल्यावर दोघांनीही यावर्षी यात्रा तशी सर्वसाधारणच होती असे सांगितले.


नागोबा येथिल बारवेच पाणि झाडांना घालताना
माणदेशातील नागोबा देवस्थानचा म्हणावा इतका विकास झालेला नाही. नागोबाचा पर्यटनस्थळाच्या दृष्टीने विकास करता येईल का यावर माणदेशी जनतेलाच निर्णय घ्यावा लागणार आहे असे वाटते. माणदेशाच्या अवती भवतीचा विचार केला तर खूप बदल जाणवतो मात्र माझा माणदेश पूर्वीसारखाच सुख-सोईअभावी विकासापासून कोसो मैलाच्या दूर अंतरावर आहे.
पुरातन काळापासून मार्गशिर्ष महिन्यात होणारी माणदेशातील प्रसिद्ध श्री. नागोबा यात्रेत खूप वर्षांनंतर कोळहोळचा राजा दर्शनासाठी जाण्याचे भाग्य लाभले. यावेळी इंडियन नेव्ही कामगार सचिन पुकळे सोबत स्वतः मी संपूर्ण यात्रेत भटकंती केली. यात्रेत फेर फटका मारत आसताना माणदेशी रंग आणि ढंगातील सर्व क्षणचित्रे सचिन पुकळे यांनी घेतली आहेत.
✍ आबासो पुकळे, १२ डिसेंबर २०१७.

राष्ट्रीय ओबीसी समाजाचा मानबिंदु : एस एल अक्कीसागर साहेब

अक्कीसागर साहेबांची झंजावती ६१ वर्षे पूर्ण...!
...................................
राष्ट्रीय ओबीसी समाजाचा मानबिंदु : एस एल अक्कीसागर साहेब



भारत देशाचा मध्यवर्ती भूभाग म्हणून ओळखल्या जाणा-या मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे जन्म घेतलेले, दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात बेळगांव-चंदरगी मातृभूमी असणारे, भारतीय रिजर्व बॅक ऑफ इंडियाचे मॅनेजर अशी ओळख असलेले एस. एल. अक्कीसागर साहेबांची कर्मभूमी पश्चिम भारतातील महाराष्ट्रात पुणे- मुंबई अशी राहिली आहे.  श्री अक्कीसागर साहेब त्यांच्या भाषणाची सुरूवात करताना विविध दाखले देत भारतीय बहुसंख्याक समाज राष्ट्रिय कसा आहे याची ओळख करून देतात व जन्मभूमी-मातृभूमी-कर्मभूमीची सांगड घालून ते स्वतः राष्ट्रीय कसे आहेत हे सांगतात. त्यांच्या कार्याकडे नजर टाकली असता त्यांच्या जीवनाचा प्रवास हा राष्ट्रिय असून राष्ट्रीय समाजाच्या उन्नती साठीच राहीला आहे हे ठळकपणे निदर्शनास येते. आज  ५ डिसेंबर रोजी 'एस एल अक्कीसागर साहेब' या राष्ट्रीय समाजातील व्यक्तिमत्वास वयाची ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. एकसष्टी निमीत्त त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा लेखनीरूपी घेतलेला अल्पसा जीवन प्रवास वाचकांसमोर ठेवताना आनंद होत आहे.
देशाच्या आर्थिक धोरणांसाठी केंद्रबिंदू असणारी 'रिझर्व बँक ऑफ इंडिया' च्या मुंबई मुख्यालयातून गत वर्षी डिसेंबर- २०१६ मध्ये श्री. अक्कीसागर साहेब मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी भारतातील ओबीसीं कर्मचारी यांची संघटीत मोट बांधत 'ऑल इंडिया रिझर्व बँक ओबीसी वेलफेअर असोसिएशन' ची स्थापना केली.  त्यांना ऑल इंडिया आरबीआय ओबीसी वेलफर असोशिएशनचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष यासाठीही देशपातळीवर ओळखले जाते.  अक्कीसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  'NSEBC (OBC) फेडरेशन' या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला त्यांचे हक्क अधिकार, महत्व, समस्या, उपाय या विषयावर जागृत करण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. सध्या ते या संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत.

तमिळनाडू कार्यकर्ते सोबत मा. श्री. अक्कीसागर साहेब
बलशाली भारत निर्माणाचा पुरस्कार करणारा पहिला प्रतिनीधी म्हणून प्रकाशित होणारे मासिक : 'विश्वाचा यशवंत नायक'चे श्री. एस एल अक्कीसागर साहेब कार्यकारी संपादक आहेत. यशवंत नायक अंकातून राष्ट्रीय समाजात प्रचार-प्रसार करण्याचे काम त्यांनी माणदेशातील म्हसवड येथे बहुजन विराट मेळाव्यात मान्यवर. कांशिराम यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पहिल्या हस्तलिखीत यशवंत नायक अंकापासून ते आतापर्यंत अखंडपणे सुरू ठेवले आहे. यावर्षी 'मासिक यशवंत नायक'ला २३ वर्षे पूर्ण झाली. यशवंत नायकच्या अंकामुळे राष्ट्रीय समाजात जाणीव जागृतीचे प्रमाण वाढले आहे. भारतीय प्रचार-प्रसार माध्यमांनी लपवलेली गेलेली प्रेरणास्थळे, राष्ट्रीय समाजातील महामानवांना 'यशवंत नायक' अंकातून प्रकाशझोतात आणणयाचे काम श्री. अक्कीसागर यांच्या हातून घडलेले आहे. मासिक 'यशवंत नायक'ची प्रेरणा घेऊन कोळी समाजाचे 'सागर शक्ती' नावाचे राष्ट्रीय मुखपत्र उदयास आले आहे. 
बदामी -  कर्नाटक येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २०० व्या स्मृतीदीना निमीत्त होळकरशाहीचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकर जन्म गांव होळ ता-फलटण व्हाया महाराजा यशवंतराव होळकर जन्म गांव-वाफगांव ता-खेड ते महाराजा यशवंत होळकर स्मृतीस्थळ भानपुरा जि-मंदसौर(मध्य प्रदेश) अशी रासपच्या नेतृत्वात राष्ट्रीय एकात्मता रॅली काढण्यात आली यामागे श्री. अक्कीसागर साहेबांची महत्वाची भुमिका होती. ऑक्टोबर- २०११ चा यशवंत नायक अंक महाराजांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला तर त्याचवर्षी सांस्कृतिक राजधानी तथा शिक्षणाची पंढरी असणा-या पुण्यातील प्रसिद्ध लेखक मा. संजयजी सोनवणी यांनी "स्वातंत्र्ययोध्दे महाराजा यशवंतराव होळकर' पुस्तक लिहले. आज महाराज यशवंतराव होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार वाढला असून प्रतिमा, पुस्तकांना जोरदार मागणी वाढली आहे.
आगरा उत्तर प्रदेश येथे मा. श्री. अक्किसागर साहेब
आंध्रप्रदेश तेलंगणा येथे मा. श्री. अक्किसागर साहेब
मा. एस.  एल. अक्किसागर साहेब
दक्षिण भारतात संत कबीरदासाप्रमाणे लोकप्रिय असणारे दंडनायक, सत्यशोधक संत कनकदास यांच्यावर पहिले मराठी पुस्तक लिहिण्याचा मान श्री. अक्कीसागर यांच्याकडे जातो. योगायोग म्हणजे त्यांचा ६० वा वाढदिवस दिल्ली येथे पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवात कनकपीठातर्फे स्वामीजी व देशभरातील विविध क्षेत्रातील राष्ट्रीय प्रतिनिधीच्या उपस्थितीत सहपत्नीक साजरा करण्यात आला. दिल्लीहून मुंबईला परतलेल्या श्री. अक्कीसागर साहेब यांच्याशी शुभेच्छा देण्यासाठी संपर्क साधल्यावर त्यांनी भाग्यवान ठरलो अशी माझ्याशी बोलताना प्रतिक्रिया दिली. श्री. अक्कीसागर यांचे मल्हार भारती, दै. लोकसत्ता, दै. सामना, दै. पुण्य नगरी इ. वृत्तपत्रातून लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी विविध विषयावर विपुल असे स्फुटलेखन/वार्तालेखन केले आहे.
तमिळनाडू येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
त्यांच्याकडे येणारा कोणीही असो त्यांना ते आपलेसे वाटतात ही त्यांची खासीयत. परिस्थिती कशीही असो ते नेहमी सकारात्मक विचार करायला सांगतात. देशभरात त्यांच्या कार्यास सन्मान देणारा, त्यांच्या विचारांना मानणारा लहानापासून थोरांपर्यंत असा विविध राष्ट्रीय समाजजन आहे. यशवंत सेना ते राष्ट्रीय समाज पक्ष, भूतकाळातील धनगर-राष्ट्रीय समाजाचे स्थान ते वर्तमानातील धनगर-राष्ट्रीय समाजाचे स्थान, महत्व याबद्दल ते सर्व जाणून आहेत. भविष्यातील मार्ग कसा असेल याकडेही श्री. अक्कीसागर अचूकपणे लक्ष वेधतात. यशवंत सेना, रासप या सर्व टप्यात खंबीरपणे निष्ठेने साथ देणारे श्री. अक्कीसागरजी 'राष्ट्रनायक' महादेव जानकर साहेब यांच्या जवळचेही समजले जातात.
राजस्थान येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
आरबीआयमध्ये उल्लेखनीय कारकिर्द घडवून सेवानिवृत्त झाल्यावर श्री. अक्कीसागर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य महासचिवपदी निवड करण्यात आली.  दक्षिण भारत ते उत्तर भारत, पश्चिम भारत ते पूर्व भारत, ईशान्य भारतासह देशातील संपूर्ण राज्यांचा दौरा करणारे श्री.अक्कीसागर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी देशपातळीवर चांगल्या प्रकारे करत आहेत. देशाच्या कानाकोप-यात सर्व सीमांना राष्ट्रीय समाज पक्ष भिडवायचा आहे असे सांगणा-या महादेव जानकर यांचे हातबळकट करण्यासाठी श्री. अक्कीसागरजी राष्ट्रीय स्तरांवर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

संत कनकदास जयंती, दिल्ली कार्यक्रमात मा.  श्री. अक्कीसागर साहेब
मला आठवतेय काही वर्षापूर्वी त्यांच्या डोळ्यास इजा झाली होती. सर्व भार दुस-या एका डोळ्यांवर होता तसा आजही आहे, पण तब्येतीकडे फार लक्ष न देता त्यांनी आपली लेखनी, वाचन, समाजकार्य सोडलेले नाही हे आवर्जुन नमूद करावे लागेल. सर्वसाधारणतः लोक सेवानिवृत्ती नंतर समाजकार्याकडे वळतात. पण श्री. अक्कीसागर साहेब सुरूवातीपासूनच समाजकार्यात तन-मन-धन देऊन सक्रिय सहभागी राहिलेले आहेत हे त्यांचे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे.
केरळ - कोची येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
शालेय जीवनात गणित विषयात पैकीच्या पैकी गूण मिळवणारे, देशाचे अर्थकारण सांभाळणा-या प्रतिष्ठित बँकेत सेवा बजावणारे श्री. अक्कीसागर साहेब नक्कीच त्यांचा ज्ञानाचा पुरेपुर सदुपयोग करून भोळया-भाबडया वंचित, उपेक्षित राष्ट्रीय समाजाला राजकारणाबरोबर, सामाजिक, आर्थिक गणित जुळवून नवी दिशा देतील अशी आशा आहे. भारताच्या संसदेत महात्मा फुले वादाचा समतेचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष विस्तार देशाच्या सर्व राज्यात करून 'राष्ट्रनायक' महादेवजी जानकर यांचा आवाज देशपातळीवर बुंलद करण्याचे काम करत आहेतच पण पुढेही नव्या उत्साहाने करतील असे खात्रीपूर्वक सांगता येईल. श्री. एस एल अक्कीसागर साहेब देशाच्या कानाकोप-यात कार्य कर्तृत्वाने जोडलेले राष्ट्रीय समाजाचे व्यक्तिमत्व आहे. 
मध्यप्रदेश येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब

मेंढपाळाच्या पालावर मा.श्री. अक्कीसागर साहेब व चिरंजीव सुदर्शन.
वेगवेगळ्या नावांनी निरनिराळ्या प्रदेशात विखुरलेल्या राष्ट्रीय समाजाला संघटित करणारे उत्तम संघटक आहेत. त्यांच्या कार्यावर, व्यक्तीमत्वावर लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे  बरेच काही आहे. थोडक्यात सांगायचे तर श्री.अक्कीसागर साहेब यांना राष्ट्रीय-ओबीसी समाजात देशभरात असलेला मान, सन्मान पाहता ख-या अर्थाने श्री.अक्कीसागर साहेब 'राष्ट्रीय समाजाचे मानबिंदु' ठरले आहेत असे वाटते. मध्ययुगीन काळात दिनदुबळ्या, पिचलेल्या समाजाला सर्व प्रथम ज्ञानाची कवाडे खुली करून देणारे महाज्ञानदेव महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव श्री. अक्कीसागर साहेब यांच्यावर आहे. महात्मा फुलेंना त्यांनी गुरू मानले आहे. श्री. अक्कीसागर साहेबांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून एकसष्टाव्या वाढदिवसानिमीत्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. 

✍ आबासो पुकळे,  
     पुकळेवाडी ता. माण, सातारा.
     ५ डिसेंबर २०१७

माणदेशी : बुद्धिमान आजोबा - श्रद्धांजली लेख

"पुकळेवाडीचा कोहिनुर हिरा काळाच्या पडद्याआड"

बापू आण्णाच्या  जाण्याने पुकळेवाडी पोरकी झाली....!

गत आठवड्यात अचानक सेल फोन बंद पडल्याने आठवडाभरात कुणाशीही सपंर्क होऊ शकला नाही. रात्री दुरूस्त केलेला सेल फोन चालू करून सकाळी सकाळी सोशल माध्यमात सेल फोन बंद होता ; त्यातील संपादित माहीती कमी झाली आहे तरी संपर्क नंबर देऊन सहकार्य करावे. अशी विनंतीवजा संदेश टाकला. आणि अनेकांचे क्रमांक मिळवत होतो. इतक्यात सागर बाळासो पुकळे यांच्या व्हाॅट्सअप डीपीला आण्णांची प्रतिमा दिसली. क्षणभर स्तब्ध झालो. गावात काहीतरी शोकमय घडल्याचा भास झाला अन् माझ्या घरी वडिलांना तातडीने भ्रमणध्वनी केला. पलिकडून तात्यांनी आपल्यातली चांगली माणस या हपत्यात सोडून गेली अशी खबर दिली. शामराव शेळके(मामा) आणि बापू (आण्णा) सोडून गेल्याचे कळताच अति वेदना झाल्या. जोतिबाच्या मंदिराकडे जाताना शेळके मामांची आपुलकीने ऐकू येणारी हाक आता बंद झाली. दिपवाळीच्या सट्टीत बापू (आण्णा) सारख्या महान युगपुरूषाला भेटण्याची आशा आता कायमची संपूष्टात आली याची सल कायम मनाला बोचत राहिल.

डोंगराच्या कड्याकपारीत वसलेल्या पुकळेवाडीसारख्या दुर्गम अशा गावात आप्पा पुकळे यांच्या पोटी जन्माला आलेला सुपुत्र, आपल्या कार्य कर्तुत्वाने कुकुडवाड, विरळी, म्हसवड, दहिवडी, वडूज, मायणी, पाचवड परिसरात नावलौकीक मिळवलेला, भारताचा स्वातंत्र्यपूर्वकाळ व स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचा एकमेव साक्षीदार असणारा पुकळेवाडीच्या मातीतला 'मायबाप' बापू आप्पा पुकळे (आण्णा) वयाच्या १०२ व्या वर्षी वार-सोमवार दि- ९ ऑक्टोबर रोजी पुकळेवाडीच्या लेकरांना सोडून ते काळाच्या पडद्याआड झाले. आण्णा म्हणजे माझ्या गावातील कोहिनुर हिराच होते.  आण्णांच्या जाण्याने पुकळेवाडी गावाची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कदापी भरून येणार नाही. समाज जीवनात वावरत असताना आण्णांनी केलेले कार्य हे पुकळेवाडीच्या इतिहासात अजोड असे ठरले आहे.

ब्रिटीश काळात कुकुडवाडच्या पंचक्रोशीत घडलेल्या 'माणदेशी बंडा'ची वास्तववादी माहीती आण्णा जवळ होती. माणदेशातील घडामोडींचा खजाना आण्णाजवळ होता. आण्णांच्या डोळ्यादेखत घडलेली माणदेशी बंडाची कहाणी पुकळेवाडीतील गावक-यांना घटनाक्रमानुसार सांगायचे. ते एक उत्तम इतिहासकार होते. पुकळेवाडी गावाच्या निर्मितीपासून ते प्राचिन मंदिर, शेती, घर, कूळ पुरूषाची माहीती , भावकी रचना कशी झाली याचा सर्व अभ्यास आण्णाजवळ होता. शाळेत गेले नसले तरी ते एक चांगले अभ्यासक होते. अक्षरांची ओळख असती तर आण्णानी अतुलनीय साहित्य निर्मीले असते यात तिळमात्र शंका नाही.

अन्न-धान्याची टंचाई निर्माण झालेल्या घरी आण्णा स्वतःच्या कोतळीतील (कणगी) धान्य काढून तेथे पोहोच करायचे. गावच्या लेकीबाळींना जाच होणा-या गावात जाऊन लेकींचा छळ करणा-यांचा सौम्य तर कधी कडकपणे समाचार घ्यायचे. एकदा एका गावात आण्णांनी गावच्या लेकीसाठी पाहूण्यांच्या दारातच रात्री मूक्काम केल्याची आठवन सांगतात. आण्णांना स्वतःची अशी लेक नव्हती, मात्र गावगाड्यातील लेकींचा विवाह करून संसार फुलवणारे आण्णा पुकळेवाडीतील लेकींचे आधारस्तंभ होते.


पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढर घेऊन भटकणा-या मेंढपाळांच्या मुलांचा सांभाळ करून शाळेत घालणारे आण्णा एक उत्तम पालक होते. आयुष्यभर स्वतःसाठी न जगता इतरांसाठीही जगायला शिकवणारे आण्णा खरेखुरे गरिबांचे कैवारी होते. गावात घडणा-या अन्यायाची चीड बाळगत न्यायाची बाजू सतत लावून धरत न्याय देणारे आण्णा उत्तम न्यायाधीश होते. गावातील लहानापासून थोरांपर्यत सर्वांप्रती आदर बाळगणारे आण्णा आदरणीय होते. अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला श्रध्देची उपासना करायला लावून जुनाट पंरपरा मोडीत काढणारे कर्ते सुधारक होते. आण्णांनी घालून दिलेल्या मार्गाने गत दहा वर्षापासून त्यांचे पुतणे, विद्यमान सरपंच ब्रम्हदेव पुकळे हे स्वतः अतिशय प्रामाणिकपणे कुणावरही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीने आण्णांच्या पाऊलावर पाऊल टाकत पुकळेवाडी नगरीची सेवा करत आहेत.


१३ ऑगस्ट २०१७ वार- रविवार रोजीची भेट - आण्णांची अखेरची भेट

तब्येत साथ देत नसतानाही मानदेशी बंडाची कहाणी सांगताना आण्णा 

माणदेशी बंड जाणून घेण्याची खूप दिवसांपासूनची धडपड सुरू होती. घरी तात्यांशी याबाबत बोललो, तात्यांनी बापू(आण्णा)सोडून दुसरे कोण माहीती देणार नाही असे सांगितले. गावातील बुजर्गांकडे चौकशी केल्यावरही आण्णांचे नाव सर्वांनी घेतले. १३ ऑगस्ट रोजी आण्णा सारख्या महान इतिहासकार, अभ्यासक, बुध्दीमान आजोबाला भेटलो. आण्णांची प्रकृती थोडी बिघडली होती तरीपण आण्णांचे कनिष्ठ सुपुत्र मारूती पुकळे यांनी मी बंडाची कहाणीसाठी आलोय. असे सांगितल्यावर कणखर बाण्याचे बापू (आण्णा) ज्या शैलीत बंड कथन करत होते, तिथे कसलेला शिकला सवरलेला इतिहासकारही आण्णापुढे नक्कीच नतमस्तक झाला असता हे आवर्जुन नमूद करावे लागेल. भेटीतील आण्णांचे रूबाबदार लयबध्द बोल कायम स्मरणात राहतील. आण्णाच्या जाण्याने एका महान आजोबाला मुकलो. आण्णांनी समाजातील थोरांकडे दिलेले मौखीक ज्ञान लिखीत करणे काळाची गरज आहे.


"माणूस जन्माला येतो तेव्हा श्वास चालू असतो नाव नसते आणि माणूस संपतो त्यावेळी श्वास बंद पडतो पण नाव असते" श्वास आणी नाव यातला जो काळ आहे तेच माणसाचे खरे जीवन आहे. . आण्णांच्या पशच्यात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लहानपणापासून अखेरच्या क्षणापर्यंत जनसेवेची आस बाळगून लोकाभिमूख कार्याची उर्मी बाळगून जीवन जगणारे आण्णांचे कार्य, विचार अजरामर ठरेल अशी आण्णांना भावपूर्ण श्रद्धाजंली.

शोकाकुल - आबासो सुखदेव पुकळे.


कॉलेजच्या वाटेवर भेटलेले मेंढपाळ बांधव

"राष्ट्र भारती" ने मेंढपाळ बांधवांशी साधला संवाद.


 विल्गिंडन काॅलेजच्या मैदानाशेजारी मेंढपाळांचे पाल दिसले. तळावर वागरात कोंडलेल्या कोकरांची राखण करत बसलेला मेंढका पाहून मी जय मल्हार म्हणालो, तसा तो मेंढका दबक्या आवाजात जय मल्हार म्हणाला. मेंढक्याला विश्वास देत मेंढपाळांना  बोलते केले. इतक्यात बाकीचे मेंढके वझ्यावर आले तसा कोकरी सांभाळणारा मेंढका म्हणाला हे आपल्यातलेच धनगर आहेत. अंधार पडायला लागला होता, तितक्यात एक मेंढका बोलला आम्हाला पाण्याची सुय कुठ व्हयान? मी आजुबाजुचा अंदाज घेतला परंतु मेंढपाळांना पाण्याची सोय होईल अशी हक्काची एकही जागा सापडली नाही. शेवटी मी होस्टेलवर मेंढपाळाची पाण्याची सोय करून दिली.

बांधवांनो..... मैदानावर चिखल होता. त्या चिखलात माझ्या मेंढपाळ बांधवाने पाल ठोकल होत. त्या पालात फाटक्या तुटक्या पिशवीत भरलेल संसारिक साहित्याचे वझ(मेंढपाळाच साहित्याने एकत्रित केलल पिशव्या, पोत्याच ठिकाण) होत. चोहीकडून थंडगार वारा सुटला होता. त्या वा-यात हातात काठी, खांद्यावर घोंगड घेऊन मेंढपाळ उभा होता.  आभाळातुन मेघराजा बरसत होता. त्या मेघसरीत न्हाऊन निघालेला मेंढपाळ बांधव मेंढ्याला चारा, गवत शोधत होता.टोलेजंग आलिशान इमारतीने गजबजलेला परिसरात गटर, नाल्याभोवती चारा शोधणारा मेंढका मेंढराना बोलवत होता. त्याच नाला, गटारीला भयंकर दुर्गंधी होती, डास मच्छरांच प्याव होत अशातच माझा मेंढपाळ तिथे मेंढ्या चारत उभा होता.इतके सर्व भयानक परिस्थितीवर मात केल्यानंतरही पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. असे सांगण-या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात माझा धनगर, मेंढपाळ बांधव अंधा-या काळोख्या रात्री पिण्याच्या पाण्याच्या शोधात होता.....?



कॉलेजच्या रस्त्यावर मेंढपाळ बांधवास जनजागृती पुस्तक भेट देत असताना

२१ व्या शतकातही माझा मेंढपाळ धनगर बांधव अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण यापासून वंचित उपेक्षित आहे याच हे धगधगत वास्तव. पूर्वी धनगर ज्या मोठ्या कात्रीने मेंढराची लोकर कातरायचा त्याच कात्रीने मेंढपाळ बांधव आजही लोकर कातरतो. पर्वी साहित्यांच ओझ वाहण्यासाठी आदिमानव घोडयाचा वापर करायचा माझा मेंढपाळ बांधव आजही घोड्यावर ओझं टाकून पालावरच जीण जगत आज हितं तर उद्या तिथं रानोमाळ धुंडत आहे. धनदांडगे व जातदांडगे वर्गाची मारझोड सहन करत आहे. पूर्वी जसा माझा मेंढपाळ होता तसाच आजही माझा मेंढपाळ धनगर उघड्यावरच द-या खो-यात, कड्या कपारीत, ओसाड माळरानावर जीवन जगतो आहे. याच्यापेक्षा भयानक वास्तवात मुळ आदिवासीच जीवन जगणा-या धनगर मेंढपाळ बांधवांच्या हितार्थ घटनेतील ३४२ व्या कलमाची अंमलबजावणी का होत नाही? या प्रश्नाने पछाडलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात मेंढराच्या वाड्यात जन्माला आलेला मुलगा पुढे सुवर्णपदक अभियंता बनतो व आपल्या माय-बापजाद्यांनी सोसलेली सोशीक परिस्थिती बदलवण्यासाठी लग्न, घर, संसाराचा त्याग करून सर्व समस्यांच प्रश्नाचे मुळ, सोल्युशन असलेल्या 'राजकीय सत्ते'साठी भारतीय लोकशाहीत संसदेत जाणारा मार्गाची निवडणुका महाराष्ट्रासह देशभर लढवतो. मात्र त्याची जात मेंढपाळ धनगर असल्याने महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारे प्रस्थापित जातदांडगे पुढारी प्रचार, प्रसार माध्यमातून जातीचाच नेता ठरवून स्वतःची घर, पै पाहुण्यांची घर भरून पोळी भाजून घेतात.बांधवानो, ज्यांच्यासाठी त्यागी तरूण  निवडणुका लढवतो तो खराखुरा मतदार मात्र मेंढपाळ धनगर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकशाहीतील मतदान बुथ केंद्रापासून कोसो दूर गेलेला असतो.जो जवळ असतो तो मात्र प्रस्थापित व्यवस्थेला बळी पडून आपल्यातल्याच सुवर्णपदक इंजिनीयर बुध्दीजीवी असलेल्या त्यागीपुत्राची मापे काढण्यात फुशारकी मारतो इतका तो व्यवस्थेचा गुलाम बनलेला आहे. सांगा आम्हा मेंढपाळ धनगरावर विश्वास कोण ठेवणार? माय बाप होऊन आम्हा न्याय कोण देणार? बांधवांनो अशा संक्रमणाच्या परिस्थितीत हेलकावे घेणारा मेंढपाळ धनगर समाज केव्हा स्थिर होईल ? हा मुख्य प्रश्न आहे.


अधिक अभ्यासाठी काही मेंढपाळाची नाव, वय, शिक्षणाची माहीती साठी देत आहे. सुरेश रामा बंडगर (वय ३५ - शिक्षण - ००वी), शरद सुभाष तादंळे(वय २७ - शिक्षण १० वी), विठ्ठल बाळू रानगे(वय ४२ - शिक्षण ००), आप्पा सोमा बंडगर (वय ३५ - शिक्षण ००), तानाजी बाळू रानगे (वय ४० - शिक्षण ००), कृष्णा बिरू रानगे (वय ४५ -शिक्षण ००), धनाजी यशवंत कोळेकर (वय ४१-शिक्षण ००), प्रकाश सु-याप्पा बंडगर (वय ६५-शिक्षण ००), लहान मुले - कुमार कृष्णा रानगे(वय ११- शिक्षण ५ वी), संदिप प्रकाश बंडगर (वय १२ -शिक्षण ६ वी) यातील बहुतांश बांधव अनपड आहेत. यांनी एकच सांगितले की आम्ही मागासवर्गीय आहोत. काय तरी करायचं अन् पोटाला खायाचं.. अन् जायाचं बक-या घेऊन रान चारत. घरी आणि मेंढराकडं न्यार असतंया. सोलापूर पतूर जायाचं आण परत कोल्हापूर जिल्ह्यापतूर यायाचं. नुसत राबतच फिरायचं..अन् पावल झिजवत फिरायचं..अन् रगात आटवायचं..! आमची दहावी बारावीची पोर बक-यात हायती. आम्ही आंगठा द्या म्हणलं तिथ देणार. आम्ही फिरलोय, गुडघं दुखायला लागल्यात. पावसा पाण्यात किती दिवसं बसायचं. मागासवर्गीय समाजाच आमचबी एखादं पाॅर लागू दया की कामाला म्हणाव सरकाराला? असे 'राष्ट्र भारतीशी' बोलत होते आपली वयाची साठी ओलंडलेले प्रकाश सु-याबा बंडगर.

- आबासो पुकळे , पुकळेवाडी ता- माण
२० सप्टेंबर २०१६

ओलेकर सरकारांच्या राज्यात

माणदेश व माणदेश सीमाभागातील पुराणकालीन राजघराणे अभ्यास दौरा यशस्वी  
ओलेकर सरकारांच्या राज्यात मिळेल त्या वाहनाने प्रवास करुन अभ्यास दौर्‍यावर जाताना संशोधक सुमितराव लोखंडे.

ढालगांव येथील गढीची पाहणी करताना इतिहास  संशोधक  सुमितराव लोखंडे

मरहट्टी संशोधन विकास मंडळाचे सक्रीय सदस्य इतिहास संशोधक सुमितराव लोखंडे सर हे नुकतेच कवठेमंहकाळ तालुक्यातील हटकर घराण्यांतील सरदार घराण्यांचा अभ्यास दौरा पूर्ण करून काल मिरज रेल्वेस्थानकातून कोल्हापूर-गोदिंया (महाराष्ट्र एक्सप्रेस)ने ठाणेच्या दिशेने रवाना झाले. मीही स्वतः त्यांच्यासोबत अभ्यास दौ-यात सहभागी झालो.


सोमवारी सकाळी मी सांगलीवरून अॅटोरिक्षाने मिरज मिशनचौकात उतरलो. तेथून कवठेमंहकाळमार्गे जतला जाणा-या वडापच्या जीपमध्ये बसून कवठेमंहकाळ येथे पोहचलो. तसे लोखंडे सर एक दिवस अगोदरच कोल्हापूर जिल्ह्यातील अभ्यास दौरा करून कवठेमंहकाळ तालुक्यातील देशींग या गावी पोहचले होते. कवठेमंहकाळला सुशांत मंगल कार्यालयात माने-कोळेकर यांच्या विवाह सोहळ्यात लोखंडे सर यांची प्रथमतःच भेट झाली. भेट होण्यापूर्वी लोखंडे सरांशी भ्रमणदूरध्वनीवरून अनेकदा बोलणे झाले होते, परंतु प्रत्यक्ष भेटीसाठीची प्रतिक्षा कवठेमंहकाळांच्या भेटीत संपल्याने खूपच हायसे वाटले. विवाह सोहळा आटोपून मौजे-ढालगांव येथे जाण्यासाठी कवठेमंहकाळ बसस्थानकात पोहचलो, पण बसस्थानकात ढालगांवला जाणारी एस.टी बस नसल्याने तब्बल दोन तास बसस्थानकातच बसून राहावे लागले. दरम्यानच्या काळात बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात चौकशीसाठी गेलो असता रिकामी खुर्ची सोडली तर कोणीही कर्मचारी तेथे आढळला नाही. काही वेळ गेल्यानंतर नागोंळेमार्गे ढालगांवला जाणारी एस.टी बस मिळाली. अर्धा-पाऊन तासात माणदेशातील सीमेवरचे शेवटचे गांव असणारे ढालगांवात पोहचलो. ढालगांव मुख्य चौकातून पायपीट करत लोखंडे सरांसोबत चर्चा करत दिड किलोमीटर अंतरावर रेल्वेस्थानकाच्या नजीक गादी व लोकरीचे जेण बनवण्याचे केंद्र असणा-या शेडवर पोहचलो. तेथे पोहचतो ना पोहचतो तोपर्यंत सुरेशजी घागरे(पांढरे) पाटिल आम्हाला भेटण्यासाठी आले. सुरेशजी घागरे(पांढरे)-पाटिल यांच्या चारचाकीतून व सुभाष खुटाळे(माने) यांचे सोबत ढालगांवात पुराणकालीन मंदिर, हुडी, जीर्ण झालेला राजवाडा, बारव, न्यायदानासाठीची चावडी, कारागृह पाहिले. तसेच सरदार माणिक घागरे(पांढरे) पाटिल व काही ठरावीक घरी भेट देऊन चौकशी करत महत्वपूर्ण चर्चा केली. बहुतांश ऐतिहासिक संदर्भाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर सायंकाळी सुरेशजी घागरे-पाटिल यांनी त्यांच्या चारचाकीतून आमचे मुंबईस्थित मित्र दाजी बिरू कोळेकर-पाटिल यांच्या आरेवाडीतील राहत्या घरी सोडले. रात्री मुक्कामी दाजी बिरू कोळेकर यांच्या बंधूसोबत म्हणजेच बाळू बिरू कोळेकर-पाटिल यांचेशी आरेवाडी व बिरोबा, धुळोबा देवस्थानविषयी प्रदीर्घ गप्पा झाल्या.  दिनांक ४ जुलै रोजी सकाळचा पाहुणचार घेऊन बिरोबादेव बनात भेट दिली व देवदर्शन करून दाजी कोळेकर-पाटिल यांच्या विनंतीवरून कवठेमंहकाळ तालुक्यात असणारे ऐतिहासिक संस्थानिक ओलेकर सरकार यांचेकडे जाण्याचा निर्णय घेतला. बिरोबा बनातून बंडगर नामक युवकाच्या  दुचाकीवरून नागज फाटा येथे पोहचलो. नागजमध्ये बराच वेळाने प्रतिक्षा केल्यानंतर मिरजच्या दिशेने कोल्हापूरला जाणारी एस.टी बस मिळाली. एस.टी बसने कुची या गावात उतरलो व पुढे कुचीतुन पाणयाच्या पुरवठा करणा-या ट्रकने कवठेमंहकाळला पोहचलो. तेथे राधानगरी तालुक्यातील सरदार बंडगर(जोंग) यांची भेट झाली. तेथून पिकअप जीपने अलकुड एस यागावी ओलेकर(देवकाते) सरकार यांच्या मुलुखात पोहचलो. अलकुडचे शिवाजी ओलेकर(देवकाते) सरकार, कारभारी दिपक गणपत ओलेकर(देवकाते) सरकार तसेच कोकळेचे बाबासो ओलेकर(देवकाते) सरकार, इनामदार, कुलकर्णी यांच्या सोबत ओलेकर सरकारच्या जीर्ण झालेल्या ऐतिहासिक राजवाड्यास भेट दिली. ओलेकर(देवकाते) सरकार या राजघराण्याविषयीची माहीती, ऐतिहासिक स्थळ, ऐतिहासिक वास्तू, कागदपत्रे या सर्वाची आढावा घेत संपूर्ण अभ्यास दौरा पूर्ण केला आणि अलकुड वरून पिकअपजीपने मिरजला पोहचलो. आगामी काळात ढालगांवचे सरदार घागरे(पाढंरे)-पाटिल  व ओलेकर(देवकाते) सरकार या घराण्यांचा अपरिचित इतिहास मरहट्टी संशोधन व विकास मंडळ, संशोधक संतोषराव पिंगळे सर लिखीत स्वरूपात प्रसिद्ध करतील.

✍ आबासो पुकळे.
   पुकळेवाडी , ता- माण.
   ३ जुलै २०१७

दोन हातात दोन तलवार घेऊन लढणारी जगातील अद्वितीय महाराणी

"आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भिमाई होळकर जयंती"


दोन हातात तलवार घेऊन लढणारी जगातील अद्वितीय महाराणी

जागतिक पातळीच्या इतिहास संशोधकांनी आद्य स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भिमाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करून ठेवले आहे, एक दुर्दैवच आहे. १८ व्या शतकात ब्रिटीशांच्या विरोधात रणसंग्राम गाजवणा-या भीमाईला इतिहासात उपेक्षितच ठेवले आणि ब्रिटिशांविरूध्द लढाई न लढणा-या लक्ष्मीबाईस महान बनवले. भीमाईचा पराक्रम झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ४० वर्ष आधीचा आहे. परंतु या शुरवीर रणरागिणीच्या देशभक्तीकडे, जाज्वल इतिहासाकडे व तिच्या शौर्यगाथेकडे कोणत्याही इतिहासकाराचे जाणीवपूर्वक लक्ष गेलेले दिसत नाही याचे आश्चर्य वाटते. 
गणित, विज्ञान, भूगोल या सारख्या विषयांचे विकृतीकरण केल्याचे आढळत नाही. परंतु इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे पुरावे पानोपानी सापडतात, असे का व्हावे? यामागचे षडयंत्र काय? याचा परामर्श घेणे क्रमप्राप्त ठरते. जसा इतिहास समाजापुढे मांडला जातो, पुस्तकरूपाने लिहला जातो, विद्यार्थांना शिकवला जातो, तशीच व्यक्ती व समाज यांच्या मन आणि मेंदूची जडण-घडण होत असते.नेमका याचाच फायदा घेऊन इतिहासाचे विकृतीकरण करून काल्पनिक दंतकथांचा डोंगर उभारत असतात. (उदा-रामाचा महान त्याग, आदर्श राम, सीतेसारखा वनवास, सम्राट चंद्रगुप्ताचा गुरू चाणक्य, गो ब्राम्हण प्रतिपालक, मल्हाररावांचे ब्राम्हणीकरण, तुकाराम सदेह वैकुंठ, खूप लढी झाशीची राणी)
भारताचे प्रथम स्वातंत्र्यवीर, महापराक्रमी लढवय्या योद्धा इंग्रजाचा कर्दनकाळ,बलाढ्य ब्रिटिशांना सतत १८ वेळा पराभूत करणारा भारतातील एकमेव नरश्रेष्ठ, ब्रिटीशांविरूध्द प्रथमतः स्वातंत्र्याचा एल्गार पुकारणारा वीर यशवंतराव होळकर होय. यशवंतरावांनी ब्रिटीशांविरूध्द दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही. यशवंतरावांच्या समशेरीची चमक ब्रिटीशांसह चांगल्या बलाढ्य संस्थानिकांनीही चाखलेली होती. त्यामुळे यशवंतरावाचे साधे नावही उच्चारले तरी शत्रूचा थरकाप उडायचा एवढी जरब त्यांची होती. परमवीर यशवंतरावांच्या रक्तात देशभक्ती ओतप्रोत भरलेली होती. संपूर्ण भारतातून इंग्रजांचे उच्चाटन झाले पाहीजे असे त्यांना सदैव वाटायचे. कपटनितीचा वापर करत भारतातील पेशव्यांसह बहुतांशी संस्थानिकांनी इंग्रजाचे मांडलिकत्व स्वीकारले, परंतु नरश्रेष्ठ यशवंताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन प्रतिसाद देण्याचे नाकारले. महाराजा यशवंतराव हे भारतातील एकमेव संस्थानिक आहेत की, ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटीशांशी लढा दिला. अशा नरश्रेष्ठ यशवंतराव होळकर (प्रथम) यांची एकुलती एक कन्या भिमाई. 
बालवयातच भिमाईने शिक्षण व प्रशिक्षण प्राप्त केले होते. मराठी, हिंदी, उर्दू, फारसी या भाषा तिला अवगत होत्या. आठ-दहा वर्षाची असतांनाच तीर चालवणे, भाला फेकणे, धावत्या घोड्यावर बसण्याचे कसब बालभिमाने आत्मसात केले. भिमाईला यशवंतरावांनी घोडेस्वारी व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले होते तसेच लिहणयावाचण्याचेही शिक्षण तिला मिळाले होते. भालाफेक, बंदुक चालवण्यात ती पटाईत होती. यशवंतराव अत्यंत पुढारलेल्या विचारांचे असल्यानेच त्या काळात त्यांनी मुलीला शिक्षण दिले, जेव्हा स्त्रियांना जनान्याबाहेरही पडायची परवानगी नव्हती. (Indian Female Freedom Fighters-article in Sunday Tribune by Rajesh Chopra)
भिमाईचा विवाह विवाह धारचे संस्थानिक गोंविदराव बुंदेल यांच्याशी झाला. राजकुमारी भीमाई महाराणी बणून पतीच्या सहावासात जीवन व्यतीत करीत असतांनाच पती गोविंदराव बुंदेल यांच निधन झाले. भिमाराणीच्या जीवनात वडील यशवंतरावांचे निधन, आईचा मृत्यू, दत्तक मुलाचे निधन, भावाचा मृत्यू यासारखं वज्राघात झाले.
लाॅर्ड वेलस्लीला धडा शिकवला, १८१७ चे महिदपूर युध्दात रणरागिणी वीरागंना भीमाराणी प्रत्यक्षात युध्दात घोडयावर बसून सैन्य संचलन करत होती. भामाराणीने घोड्याची लगाम दातात धरली. दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटिश सैन्यांना कापून काढत होती. 
मेजर हंट सैन्य तुकडीसह आपल्याकडे येतांना पाहून भुकेल्या सिंहनीसारखी गर्जना करत अश्वरूढ भीमाराणी प्रचंड वेगाने हंटच्या दिशेने निघाली. क्षणार्धात तलवारीने हंट वर वार केला. हंटवर वार करून भीमा पुढे निघाली आणि फिरंगी सैन्यावर तुटून पडली.सपासप ब्रिटीश सेनेचे मुडदे पाडू लागली.
रणागंण रक्ताने न्हाऊन निघाले होते.ठार झालेल्या इंग्रज सेनेचा खच पडला होता. जखमी झालेले सैनिक प्राणांच्या आकांताने विवळत होते.बलाढय ब्रिटीश सैन्याची एका महिलेने अशी दाणादाण उडवणे ही गोष्ट खरोखरच अखिल भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. भिमाराणी निर्बलांना बळ, निराश्रीतांना आश्रय, निर्धनांना धन तर निराधारांना आधार देत असे. म्हणून राज्याच्या रक्षणासाठी आणि भीमाराणीच्या संरक्षणासाठी राज्याचा प्रत्येक नागरीक आपले प्राण द्यायला मागेपुढे पाहत नसे. भीमाराणी सुद्धा आपल्या सहकां-यासाठी व प्रजेसाठी आपला जिवही धोक्यात घालायला मागे पुढे पाहिले नाही.
भारतीयांचे आर्थीक शोषण करणा-या साम्राज्यवादी ब्रिटीशांची कर्दनकाळ ठरलेल्या रणरागिणी विरागंना भिमाराणी होळकर २२० व्या जयंतीच्या भारतमातेच्या लेकरांना हार्दिक शुभेच्छा. 

संदर्भ ग्रंथ-
१ ) रणरागिणी वीरागंना भिमाई-होमेश भुजाडे 
२ ) महाराजा यशवंतराव होळकर-संजय सोनवणी 
✍ आबासो पुकळे 
      पुकळेवाडी ता-माण
      १७ सप्टेंबर २०१५

माणदेशी कवी : बाबासाहेब कोकरे

माणदेशी कवी : बाबासाहेब कोकरे


इतिहास कालीन माणदेश आज स्वतंत्र भारतात सातारा, सांगली,सोलापूर जिल्ह्यात विभागला आहे. लेखक शंकरराव खरात , माणदेशी शाहीर नाना बनगर, ग. दी, व्यंकटेश माडगूळकर बंधू यांच्या साहित्याने माणदेशी मातीची ओळख जगाला झाली. माणदेश भूमीत जांभुळणी ता-माण जि-सातारा येथे बाबासाहेब कोकरे यांच्या सारखे प्रतिभा संप्पन्न कवी नेहमीच दुष्काळाशी लग्न गाठ बांधल्याप्रमाणे माणदेशी रांगडया भाषेत आपल्या कवितांच्या ओळीच्या पुष्पमाला गुंफत आहे. बाबासाहेब कोकरे यांच्या कवितामधून वास्तव परिस्थितीचे धगधगते प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. माणदेशी माणसांच्या वेदनानां वाचा फोडणारे बाबासाहेब कोकरे कवितेतून माणदेशी माणसांना दुष्काळामुळे झालेल्या जखमा आपल्या लेखणीत पकडून कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. "शब्दांचे फटकारे" हा माणदेशी कवीचा लोकप्रिय कार्यकम वाडी, वस्तीवर मर्यादीत न राहता मुंबई-पुणे सारख्या शहरवासीयांना भुरळ घालत आहे. शेकडो साहित्यकांनी माणदेशी कवीचे तोंड भरून कौतुक केले. जेष्ठ समाज सेवक आण्णा हजारे, बोरगावचा ढाण्या वाघ सामाजिक सलोख्याचे अग्रदूत बापू बिरू वाटेगावकर यांनीही माणदेशी कवीचे अभिनंदन केले. माणदेशी कवीलाही दुष्काळी परिस्थितीचे चटके बसल्याने बाबासाहेब कोकरे यांनी मुंबई शहराचा रस्ता धरला. माणदेशी कवीला भेटण्याचे ठरविले होते. अखेर दि. २८ एप्रिल २०१६ रोजी कुर्ला-मुंबई येथे भेट झाली. दुष्काळ व माणदेश यावर भरपूर चर्चा झाली व अनेक नव विचार उदयास आले.


     कवितेतून शब्दांचे फटकारे देाताना बाबासाहेब कोकरे

या माणदेशी नव कवीचे हजारो कार्यक्रम शाळा, महाविद्यालयात लोकप्रिय ठरत आहे. या क्रांतिकारी माणदेशी कवीची म्हणावी तितकीशी महाराष्ट्रातील प्रचार-प्रसार माध्यंमानी दखल घेतली नसल्याचे स्पष्टटपणे जाणवले. भारतीय लोकशाहीत टेंभा मिरवणरी प्रसार माध्यम दखल घेऊ अथवा न घेऊ महाराष्ट्राच्या मातीने माणदेशी कवीला जय महाराष्ट्र असा सलाम केला आहे. माणदेशी कवीला आगामी काळातील परीस्थितीत साथ देऊन सहकार्य करून मराठी साहित्याच्या वैभवात भर घालुया. चंगळवाद संस्कृतीने पछाडलेल्या मानवी मनाचे कान उघणारे व डोळयाची झापड काढायला भाग पाडणारे 'शब्दांचे फटकारे' हा कार्यक्रम आयोजीत करून यशाच्या शिखरावर कवीला पोहचवालच अशी अपेक्षा आहे. माणदेशी कवीला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

कवितेतून शब्दांचे फटकारे देाताना बाबासाहेब कोकरे

- आबासो पुकळे
 मु . पुकळेवाडी पो - कुकुडवाड ता- माण
 दि. ८ मे २०१६

महाराष्ट्र धनगर समाजाची संस्कृती

"महाराष्ट्रातील - धनगर संस्कृती"



यात्रेत तालासुरात ओव्या म्हणताना धनगर समाजातील शाहिर


'धनगरी गीते , धनगरी ओवी'
महाराष्ट्रातील साहित्यात धनगर समाजातील संस्कृतीला स्थान नसल्याचे आढळते, तेव्हा धनगर समाजातील गीते व ओवी यांची थोडक्यात ओळख करून घेऊया आणि धनगर समाज संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा घेऊया.
    धनगर गीतांनी पंरपरेने लोकवाड्मय टिकवून ठेवले आहे. सुंबरान मांडिलं, बिरोबाची गीते,जोतिबाची गीते, खंडोबाची गीते, धुळोबाची गीते, मायाकका देवी गीते, स्त्रियांचे उखाणे, पोवाडे, लग्नाची गीते, मांडवाची गीते, (मायाक्कादेवी)  माखूबाई सवासन्या, गजीनृत्य व भाकणूक इत्यादी गीतांमधून मागील इतिहास, परंपरा, रूढी, चालीरीती, मानवतावाद या सर्वांवर प्रकाश पडतो.पारंपारीक जीवन जगणारे धनगर लोक महाराष्ट्रातल्या समाजजीवनाशी एकरूप झालेले दिसतात.धनगर समाजाचे  सांस्कृतीक आणि धार्मिक जीवन इतर समाजाच्या सांस्कृतीक, धार्मिक जीवनापेक्षा निराळे आहेत. 

महाराष्ट्रात प्रदेशानुसार धनगर समाजात राहणीमानात भेद असल्याचे आढळते परंतु कुलाचार, आणि देव-देवता यामध्ये साधर्म्य पाहायला मिळते. धनगरांच्या जत्रा आगळ्यावेगळ्या पध्दतीच्या असतात.  धनगर समाजात दोन प्रकारच्या जत्रा पाहयला मिळतात. गोडवी जत्रा, बक-र्या कोकराची जत्रा(मांसाहारी) असते. धनगर समाजात शाकाहारी जेवणाला  'गोडव' बोलतात तर मांसाहारी जेवणाला 'वशाट' (वसकाट) बोलतात.  बक-या कोकराची जत्रा 'दावन, खेळ, मेंढक्याची जत्रा, आकाडी जत्रा, वाडजत्रा, सटवाई या विशिष्ट नावाने ओळखल्या जातात. 

धनगरांची गीते हा लोकजीवनाचा एक अनमोल ठेवा आहे. आपल्या मनातील अनेक भाव, प्रसंग, भक्ती आणि समाजाविषयी असणारे आंतरिक प्रेम धनगर लोक आपल्या बोलीभाषेतच गीतांतून व्यक्त करतात.  शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या अशिक्षित, अडाणी, ग्रामीण आणि आदिवासी भागात राहणा-या तसेच वर्षातील काही दिवस भटकंती करणा-या धनगर जमातीचा विचार करता, धनगर समाज मेंढपाळ व्यवसायाशी व काही प्रमाणात कृषी व्यवसायाशी निगडीत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाशी जुळवून घेत त्यांच्याबरोबर मैत्री करणारा आणि अतिशय जवळचे नाते सांगणारा एकमेव धनगर समाज आहे. धनगर हा कधिही मुळापासून झाडे तोडत नाही. परंतु त्या झाडांना सवळून (झाडाच्या फांदया तोडून व वळण देणे) झाडे जोमाने वाढवतो. शेळ्या-मेंढ्यांना शेताममध्ये बसवून खतवल्याने शेतातील माती 'सुपीकता' व उत्पादकता' धारण करते. ज्या शेतात मेंढ्या बसवल्या जातात अथवा मेंढी खत घातले जाते त्या शेतातील पीक अतिशय जोमदार येते व उत्पादन अनेक पटीने वाढलेले पाहायला मिळते. 

धनगर समाजातील ओव्या ह्या मौखीक वाड्मय स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केल्या असून धनगरी ओव्या अस्सल धनगरी भाषेतील अनमोल ठेवा आहे. धनगरी ओवी सम्राट कै. नाना रामचंद्र बनगर यांचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला होता. बनगर यांनी पुणे आकाशवाणीवर १९९५ साली धनगरी ओव्यांच सुंभरान सादर केले. 

आबासो पुकळे
 मु- पुकळेवाडी ता- माण जि- सातारा
१४ जानेवारी २०१६

Saturday, September 22, 2018

भटक्या-विमुक्त समाज शहरात भटकतोय

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही भटक्या-विमुक्त समाजाची परवड सुरूच
कळंबोली- नवी मुंबई शहरात भटके समाजातील लोक

भारत देश परकीयांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला परंतु भारतीय स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटल्यानंतरही भारतातील भटका समाज स्वकीयांच्या कट कारस्थानाचा बळी ठरल्याच चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत सांस्कृतिक वारसा जपणार्र्या भटक्या समाजाची शासनाकडून परवड सुरूच असल्याचं धक्कादायक वास्तव चित्र खेड्यासह शहरात पाहायला मिळत आहे. 
स्वत:चे गाव नाही की राहते घर. जन्माच्या नोंदी झालेल्या नाहीत की महसुली पुरावे नाहीत. शाळेलाच गेलो नाही, तर शाळा सोडल्याचा दाखला कोण देणार, गाव-घर नसल्याने रेशनकार्ड नाही, अशा बिकट स्थितीत जीवन जगणार्र्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या-विमुक्त समाजाला न्याय मिळावा म्हणून गेली काही वर्षे लढा सुरू आहे; पण सरकार भटक्या समाजाला न्याय द्यायलाच तयार नाही. धनगर समाज, गवळी समाज, बेलदार समाज, मसनजोगी समाज, बंजारा समाज, वंजारी समाज, घिसाडी समाज, लोहार समाज, गोसावी समाज, रामोशी समाज, दरवेशी समाज, कोरवी समाज,कैकाडी समाज, डोंबारी समाज, कोल्हाटी समाज, वडर समाज, भोई समाज, हेळवी समाज आदी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.   
राज्यात संख्येने दुसर्र्या क्रमांकावर असणारा धनगर समाज अनुसचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करून दाखले मिळवण्यासाठी शासनदरबारात लाखोंचे मोर्चे काढताना दिसतोय. मात्र राज्यकर्ते धनगर समाजाच्या नेहमी तोंडाला पाने पुसत आले आहे. धनगर-धनगड वेगळे आहे, तिसरी सुची शिफारस, आदिवासी समाजाचा विरोध, चुकीच्या पद्धतीने TIIS कडून अभ्यास या सर्व गोष्टी धनगर समाजाची दिशाभृल करणार्र्या आहेत. अनुसुचित जमातीचे दाखले मिळवण्यासाठी धनगर समाजाची राज्य व केंद्र शासनाकडून परवड सुरू आहे. वर्षातील आठ महिने ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करत उघड्यावर पालातल जिवन जगणारा धनगर समाज परिस्थितीला सामोरा जातोय.सरकार समाजाची परवड थांबवेल या आशेवर आपला संसार घोड्याच्या पाठीवर लादून भटकंती करत आहे. धनगर समाज मेंढ्याचे कळप घेऊन कोकणात दाखल झाला आहे. निसर्गाशी जुळवून घेत मेंढ्या हाकणारे धनगर तरूण माथाडी कामाच्या निमित्ताने शहरात विसावलेत. पनवेल शहरात सध्या नंदिवाले समाजाची पाल खांदा काॅलनीत दाखल झाले आहेत. नंदीबैल घेऊन नंदिवाले समाजाची मुल कामोठे, कळंबोली, पनवेल शहरात दारोदार फिरताना दिसत आहे. नंदिवाले समाज शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप दरवर भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे.नंदिवाले समाजाने दारोदार फिरून भांडी विकण्याचा धंदा सुरू केला आहे. नंदिवाले समाज अंत्यत हालाखीचे जीवन जगत आहे. शहरात ना चारा, ना पाणी अशा अवस्थेत नंदिवाले समाजाला नंदी पाळताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. कंळबोली बसस्थानका शेजारी बेलदार समाजातील महिला उघड्यावरच रात्री थंडीचा सामना करत मुक्काम करताना आढळत आहेत. दिवसभर दगडी पाटा-वरवंटा डोक्यावर घेऊन शहरात भटकत आहेत. आधुनिक सुख-सुविधांच्या जमान्यात पाटा-वरवंटयाच्या मागणीत घट होत आहे. परिस्थितीने नाडलेल्या बेलदार समाजाची भटकंती थांबवणे क्रमप्राप्त आहे. महिला,बाल-कल्याण सक्षमी करणाच्या गप्पा मारणार सरकार भटक्या-विमुक्त समाजातील महिलांची परवड थांबवेल का ? शहारातील रस्त्या-रस्त्यांवर डोक्यावर मरीआईचा गाडा घेऊन अंगावर चाबकाचे वळ उठवून घेणारा कडक लक्ष्मीवाले समाज भटकताना दिसत आहे. भारतीय महासत्तेच्या वलग्ना करणार्र्या केंद्र व राज्यातील शासनाला भटक्या-विमुक्त समाजाची परवड थांबवावी लागेल. शासनाच्या समाज-कल्याण खात्याने भटक्या -विमुक्त समाजासाठी कोणत्याही प्रकारच्या ठोस योजना आखलेल्या नाहीत. अ.जा./ अ.ज.सारख्या शासकीय योजना भटक्या-विमुक्त सामाजासाठी सुरू कराव्यात अशा प्रकारच्या मागण्या भटक्या-विमुक्त समाजातून व्यक्त केल्या जात आहेत. 

- आबासो पुकळे, कळंबोली ता- पनवेल
 दि- १० डिसेंबर २०१५

"थोर भारतीय माता हिरकणी हिरवे"

"थोर भारतीय माता हिरकणी हिरवे"



हिरकणी या धनगर समाजातील असून, त्यांचे आडनाव हे गवळी धनगर कुळातील हिरवे असल्याची माहीती रायगड लोकसभा रासपचे अध्यक्ष संतोष हिरवे यांनी दिली. आजही रायगड किल्ल्यावर धनगर वाडे वास्तव्यास असून, त्यांचा व्यवसाय गवळी आहे. पायथ्यापासून ते गड हे रायगड किल्ला अंतर सात मिनीटांत पार करणारी, आजही धनगर समाजात हिरकणीचा वारसा सिद्ध करणारी साहसी, धाडसी महिला असल्याचे संतोष हिरवे यांनी सांगितले. 


रयतेचे राजे शिवछत्रपतींची राजधानी रायगड, बेलाग आणि दुर्गम किल्ला! गडाच्या दरवाजाशिवाय या किल्ल्यातनं कुणालाही आत-बाहेर जाता येत नव्हतं. गडाचे सारे बुरुज भक्कम! कडे म्हणजे मृत्यूला आमंत्रण! त्यामुळं या किल्ल्यात दरवाजाशिवाय कुणालाही आत प्रवेश करता येत नव्हते आणि बाहेरही पडता येत नव्हते. अशा कडेकोट किल्ल्याच्या कड्यावरून काळ्याकभिन्न अंधारात हिरकणी गवळण आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून खाली गेल्याची ऐतिहासिक धाडसी कथा प्रसिद्ध आहे. रायगडावर दूध, दही, ताक घेवून गेलेल्या हिरकणीला घरी परतायला वेळ झाला. सूर्य मावळला. गडाचे दरवाजे बंद झाले होते. श्री शिवरायांच्या कडक आदेशामुळं ते दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्योदयालाच उघडणार होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या चंद्रमौळी झोपडीत तिचं तान्हं बाळ होतं. बाळाच्या ओढीनं हिरकणीनं अत्यंत अवघड कडा उतरायचा निर्धार केला. तिच्या मातृत्वापुढं संकटंही हरली. हिरकणी गडाखाली उतरली. आपल्या बाळाला तिनं घट्ट छातीशी कवटाळलं. मातृत्वाच्या धाडसी विजयाची नवी गाथा महाराष्ट्राच्या मातीत लिहिली गेली. छ. शिवरायांना ही घटना समजताच त्यांनी त्या मातेचा सन्मानपूर्वक गौरव केला, अशी कथा आपण सर्वानीच शालेय अभ्यासक्रमात वाचली आहे. माऊली "हिरकणी' ज्या कड्यावरनं खाली उतरून गेली, तो कडा त्यांनी अधिक भक्कम केला. तिथं बुरुज बांधला आणि त्याला त्या मातेचे नाव "हिरकणी' बुरुज असं नाव दिलं. रायगड किल्ल्यावर तो बुरुज "हिरकणी'च्या अपार मातृत्वाची गाथा सांगत आजही उभा आहे.
आईची थोरवी वेदकालापासून प्राचीन ऋषीमुनींनी शब्दबध्द केली. जगभरातल्या धार्मिक ग्रंथांनीही आईची थोरवी गायली. "घार हिंडे आकाशी। लक्ष तिचे पिलापाशी।।' पक्षी जाय दिगंतरा, पिलासाठी आणी चारा, असं आईच्या त्यागाचं महात्म्य संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. मातृत्व हे फक्त मनुष्य जातीपुरतंच नव्हे, तर प्राणीमात्रातही आहे. आपलं बाळ हे आईचं सर्वस्व असतं. नऊ महिने पोटात वाढवलेल्या या बाळाचं संगोपन ती प्राणपणानं करते. तिच्याच दुधावर ते बाळ वाढतं. मोठं होतं. आईच्या त्यागाला कसल्याही सीमांची मर्यादा नाही. तिची माया अपार, अथांग आणि अनंत! . "स्वामी तिन्ही जगाचा आईविना  भिकारी"असा जगप्रसिद्ध विचार प्रचलीत आहे.
"आई' या दोन शब्दांचं सामर्थ्य सांगायसाठी प्रतिभावंत लेखकांनी पुस्तकच्या पुस्तकं लिहिली. संतांनी अभंग लिहिले. पण, आईच्या मायेचा सागर केवढा मोठा, हे काही त्यांना लिहिता आलेलं नाही. "आई' या शब्दाला जगातल्या विविध भाषेत पर्यायी शब्द असतील, पण आई ती आईच! ती आपल्या बाळासाठी अनंत कष्ट उपसते. थंडी, वारा लागू नये, यासाठी श्रमिक आई आपण थंडी सोसत आपल्या बाळाला पदराखाली मायेची उब देते. बाळ हे तिचं सर्वस्व असतं. त्याच्यासाठी ती आपले प्राणही देते आणि घेतेही! जेव्हा आपल्या बाळाचे प्राण संकटात येतात, तेव्हा ती माझं आयुष्य माझ्या बाळाला दे, पण त्याला या संकटातनं वाचव, असा धावा परमेश्वराला करतेे. जग बदललं. भौतिक सुख-साधनं वाढली. बदललं नाही ते आईचं मन आणि तिचा त्याग!
आजच्या चंगळवादी दुनियेत वावरणा-या तमाम भारतवासी मातांना हिरकणीची मातृत्वाची गाथा प्रेरणा देत राहील.

- आबासो पुकळे 
 दि- २० नोव्हेंबर २०१५

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...