Thursday, May 30, 2024

महादेव जानकर कोठेही उभे राहिले असते तरी मी बहीण म्हणून प्रचाराला गेलेच असते : पंकजा मुंडे

महादेव जानकर कोठेही उभे राहिले असते तरी मी बहीण म्हणून प्रचाराला गेलेच असते : पंकजा मुंडे


नामांकन सभेत बोलताना बहीण पंकजाताई मुंडे

पंकजाताई मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या,  “महादेव जानकर यांनी फोन केला आणि म्हणाले, आज उमेदवारी अर्ज भरतोय. मी त्यांना म्हणाले, एप्रिल फूल करताय का? महादेव जानकर यांनी मला फोन केला नसता तरी त्यांच्या यशाला हातभार लावण्यासाठी मी आले असते. यामध्ये कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. मला आजही तो दिवस आठवतोय, जेव्हा महादेव जानकर यांच्या कार्यक्रमाला गोपीनाथ मुंडे आणि मी गेलो होतो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले होते, माझा वारस पंकजा मुंडे असल्या तरी महादेव जानकर यांना मी मुलगा मानतो. तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही. पण राजकीय वारसा मिळेल, असे गोपीनाथ मुंडे म्हणाले होते”, असे पंकजा मुंडे यांनी सभेत सांगितले.


पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “महादेव जानकर यांनी बारामतीची निवडणूक लढली होती. तेव्हा ते जेथे जागा मिळेल तेथे झोपायचे. सामान्य माणसांबरोबर राहून जेवण करायचे. पण या माणसाने इतिहास रचला. त्यानंतर ते विधानपरिषदेवर गेले आणि मंत्री होऊन अतिशय चांगले काम केले. सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी घर सोडले. आता ते परभणीमधून लढत आहेत. पण ते बाहेरून आल्याचा आरोप त्यांच्यावर होत असला तरी तसा विचार करण्याचे काही कारण नाही. सर्वसामान्य माणसांसाठी, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारा माणूस भटकत-भटकत काम करत असतो. त्यांचा बारामतीमधून सुरू झालेला प्रवास भटकत-भटकत परभणीत येऊन थांबला आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“जानकर साहेब तुम्ही परभणीच्या लोकांसाठी येथे घर घ्या. तसेही तुम्ही एकटेच आहात. तुम्ही येथे घर घेतल्यानंतर घरासमोर वंचित, पीडितांची गर्दी दिसली पाहिजे. गरीबांच्या साथीने तुम्ही संधीचे सोनं करा. मी पाच वर्ष पदावर नव्हते. पण मी लोकांमध्ये जात होते, तेव्हा लोक माझ्या विकासाची उदाहरणे देत होते. त्यामुळे तुमच्याबाबतही लोक असेच उदाहरण देतील ही अपेक्षा आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महायुतीत सामील झाल्यानंतर जानकर विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले. त्यानंतर ते मंत्री झाले. त्यांनी अनेक चांगली कामं केली. महायुतीचे ते उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रचाराची जबाबदारी आमची आहे. परंतु महादेव जानकर कधीही आणि कसेही व कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी बहीण म्हणून गेलेच असते. भाऊ बहिणीला विसरतो, पण बहीण कधीच विसरत नाही, असंही ते या वेळी म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025