महाराष्ट्रात महायुती तर 11 राज्यात स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार : एस एल अक्कीसागर
पत्रकार परिषदेत बोलताना रासपचे संस्थापक सदस्य सिद्धप्पा अक्कीसागर, बाजूस कर्नाटक प्रदेश अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुरे |
बेळगाव (११/०४/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटकातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी दिली.
शहरातील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात एनडीए आघाडीशी युती केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीदरम्यान आमच्या पक्षाला एक जागा मिळाली आहे, त्याशिवाय आम्ही महाराष्ट्र व्यतिरिक्त दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, गुजरात दक्षिणेत कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा राज्यात स्वतंत्र निवडणुकांना सामोरे जात आहोत, असे ते म्हणाले.
कर्नाटक राज्यातील 8 मतदारसंघात आमच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. बेळगाव आणि चिक्कोडी मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. त्यानुसार चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी सतीश सनदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर करणार आहोत, असे ते म्हणाले.
पाच महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी कुरुबा समाजाच्या अधिवेशनात बेळगाव जिल्ह्यातील कुरुबा समाजाचा उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र ती घोषणा आता केवळ आश्वासने ठरली आहे. त्यामुळे करुबा समाजात नाराजी आणि असंतोष आहे. त्यानिमित्ताने बेळगाव लोकसभा मतदारसंघात कुरुबा समाजाचा उमेदवार उभा करण्याचा, आमचा पक्ष विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक प्रदेशाध्यक्ष धर्मान्ना तोंटापुरे, राष्ट्रीय समाज पक्ष बेळगावचे प्रभारी बलराम कामन्नावार व चिक्कोडी लोकसभेचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे बेळगांव जिल्हा सरचिटणीस सतीश सनदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment