वारकरी क्षेत्रातील तारा निखळला ! रंभातात्या पुकळे वैकुंठवासी !!
ह.भ.प. श्री. रंभाजी सताप्पा पुकळे(तात्या) यांचे आज दुःखद निधन झाले. श्री. रंभातात्या प्रदीर्घ आजाराने आजारी होते. तात्यांनी अमृत रामरसाळ( पंक्तीचे श्लोक), मांडवाची गीते, श्री. सिद्धनाथ, आई कुलस्वामिनी मायाक्कादेवी, श्री. जोतिबा देवाच्या आरत्या, हजारो सामाजिक - अध्यात्मिक गीते, संताची गीते आदी साहित्य निर्माण केले आहे. पंढरपूरची विठ्ठल पांडुरंगाची पायी वाट असो किंवा श्री. रतन नंदीसोबत घेऊन जाणारी जोतिबा देवाची पायवाट असो, तात्यांच्या नावाची लोक आठवण काढतात, विचारपूस करतात. सामाजिक, धार्मिक कार्यात तात्यांनी धडाडीने सहभाग नोंदवला आहे. लहान थोर हा त्यांच्याजवळ भेदभाव नव्हता. गरिबीने पिचलेल्या युवकांना धीर देण्याचे काम तात्यांनी केलेले आहे. त्यांच्या श्लोकांचा अभ्यास केल्यास तात्यांनी मानवी मनाचा शोध घेत, त्यातून बोधाची उकल केली आहे. तर काही श्लोकात चुकीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या वाईट प्रथावर प्रसंगी जोरदार हल्लाबोल केल्याचे आढळून येते. जोतिबा मंदिराच्या आवारात शेकडो श्लोकांची रचना त्यांनी केली, तात्यामुळे त्या घटनेचा साक्षीदार आणि सहभागी होता आले.
महाराष्ट्रातील धार्मिक तीर्थक्षेत्राना भेट देऊन, तात्यांनी भक्तिमार्गात स्वतःला झोकून दिलं होत. म्हसवड येथे दिवगंत नेते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सभास्थळी श्री अमृत रामरसाळ पुस्तकाचा स्टॉल लावून तात्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते, अशी आठवण श्री. शंकर पांडुरंग पुकळे आवर्जून सांगतात. पुकळेवाडी गावात श्री. ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायनाची प्रतिष्ठापना झाली, पारायनासाठी आणलेले टाळ दर रविवारी, एकादशी, महाशिवरात्री दिवशी वाजवत जोतिबा मंदिरात भजन गाण्याची त्यांनी परंपरा चालू केली होती, पण तात्यांना आजाराने गाठले आणि ती परंपरा पुढे खंडित झाली. चिंचली यात्रेत मायाक्कादेवीचे बोन (नैवद्य) काढताना, तात्याचा महत्वाचा सहभाग असायचा. सिद्धनाथाच्या दर्शनासाठी डोंगरावर पायी जाणाऱ्या, भाविक भक्तांना त्रास होत असल्याचे पाहून, तात्यांनी स्वतःचे आर्थिक योगदान देऊन पायाला खडे टोचनार नाहीत, अशाप्रकारच्या पायऱ्या, वाट डोंगर माथ्यापर्यंत तयार केली.
कोणत्याही प्रकारचे वैदिक शिक्षण घेतलेलं नसताना, तात्यांनी एखाद्या शिक्षित पंडीताला सहजतेने जमणार नाही, असे साहित्य तयार केले. वारकरी क्षेत्रात मजबूत साखळी बनवली, अनेकांना सदमार्गावर नेण्यासाठी दिशा दाखवली, रामरुपी मंत्र दिला. तात्यांच्या वाणीतून अनेक चांगल्या गीतांना मधुरता लाभली. तात्यांनी अनेकांना चांगला आशीर्वाद दिल्याचे लोकांत चर्चा असते. आज बुधवारी पांडुरंगाच्या दिवशी तात्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, यावेळी तात्यांचे सुपुत्र शिवाजी व स्नुषा नकुसा पुकळे सेवेसी हजर होते. सर्वांना आपलेसे वाटणारे रंभातात्या गेल्याची वार्ता कळताच पुकळेवाडी गाव शोकमग्न झाले. तात्यांच्या वैकुंठवासी जाण्याने वारकरी क्षेत्रातील तारा निखळला..! तात्यांच्या समृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..💐
शोकाकुल : आबासो सुखदेव पुकळे, पुकळेवाडी.
०१/०६/२०२२
No comments:
Post a Comment