धर्मसिंहसनाला आव्हान देणारा लोकराजा....
![]() |
धर्म आणि ईश्वर या दोन्ही संकल्पनांवर राजर्षी शाहू छत्रपतींचा विश्वास होता. परंतु हिंदू समाजाला वर्णजाती शृंखलांनी सर्वांगानी जखडून टाकून माणसाचे माणूसपण हिरावून घेणारी अमानुष धर्मसिंहासने त्याला मान्य नव्हती, त्यांच्यापुढे झुकणे त्याला कधीच पटले नाही म्हणून त्यानी ही धर्मसिंहासने उलथापालथी करून टाकली.
अस्पृश्यतेचा समूळ नायनाट करण्यासाठी या जुलमी आणि जीर्ण अशा संस्थेवर घणाघाती असा चौफर हल्ला या लोकराजाने चढविला, त्यासाठी त्यानी सर्वणांच्यापासून वेगळ्या असणाऱ्या अस्पृश्यांच्या शाळा बंद करून सर्वांना एकत्र शिक्षण देण्यास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण सर्वांना केवळ मोफत करून तो लोकराजा थांबला नाही, तर ते त्याने सर्वांना शिक्षण सक्तीचे केले. 'खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर हे जे जड व जुलमी जू लादले आहे ते झुगारून देण्याची शक्ती समाजाच्या अंगी येण्यात सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरूरी आहे' या शब्दात शाहू छत्रपतींनी आपली प्राथमिक शिक्षणासंबंधी असणारी भूमिका १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथील उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्पष्ट केली होती. महारवतनाची चेठबिगारीची दृष्ट पद्धत कायद्याने बंद केली. माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो, त्याला सुधारण्याची संधी दिलो तर त्या संधीचे सोने करण्याची किमया त्याच्या अंगी असते, यावर अपार विश्वास ठेवून त्याने महार-मांग समाजाची हजेरीची निर्दय पद्धत संपुष्टात आणली.
फासेपारधीसारख्या भटक्या आणि तथाकित गुन्हेगार म्हणून बदनाम झालेल्या जमातीला शाहू छत्रपतींनी पोटाशी धरून फासेपारध्यांच्या नेमणुका स्वतःच्या खासगी पहान्यावर प्रत्यक्ष राजवाड्यात करून त्यांच्यात आपणही इतरांच्यासारखी हाडामाणसांची माणसे आहोत हा दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण केला.
केवळ जन्माने श्रेष्ठ मानल्या गेलेल्या समाजातील विशिष्ट लोकांना जे सुखसमृद्धीचे जीवन जगता येते, तेच जीवन मोठ्या प्रतिष्ठेने बहुजनांच्या वाट्याला यावे म्हणून आपल्या संस्थानातील नोकल्यांमध्ये ५० टक्के जागा मागासलेल्या सर्व जातींना राखून ठेवून एकोकडे समतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा राजा दुसरीकडे जातीच्या निकषावर नोकरीत प्रवेश दिल्यावर त्या व्यक्तीची पुढील प्रगती-बढ़ती ही तिच्या गुणवत्तेवर राहील, असाही कायदा अंमलात आणण्यास तो विसरला नव्हता!
- (प्रवीण शिंदे, संपादक नवराष्ट्र, सांगली आवृत्ती)
No comments:
Post a Comment