Monday, October 16, 2023

भाजपपासून एक एक मित्र बाहेर पडत आहे - महादेव जानकर

भाजपपासून एक एक मित्र बाहेर पडत आहे - महादेव जानकर 

अक्कलकोट जि- सोलापूर येथे क्रेन द्वारे पैशांचा हार व पुष्पहार आ. महादेव जानकर यांना घालून स्वागत करन्यात आले. समवेत सुनिल बंडगर, अशोक ढोणे, दत्तात्रय माडकर, अशोक ढोणे, कालिदास गाढवे.

सोलापूर लोकसभा मतदार क्षेत्रात रासपच्या जन स्वराज यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत

अक्कलकोट :  यशवंत नायक ब्यूरो

देशात जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा त्यांनी मित्र पक्षांची वाट लावण्याची उद्योग सुरू केले. आता त्यांच्यापासून एकेक मित्र पक्ष बाहेर पडत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना पद्धतशीर उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी दिला.

शनिवारी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रांगणामध्ये महादेव जानकर यांनी सुरू केलेल्या सोलापूर जनस्वराज यात्रेचा समारोप जाहीर सभेद्वारे करण्यात आला.  फुलेपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर, बाळकृष्ण लेंगरे मामा, महाराष्ट्र मुख्य महासचिव माऊली सलगर,  प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने पाटील, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, युवक आघाडीचे अध्यक्ष अजितकुमार पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक  ढोणे, जिल्हा संपर्क श्रीमंत हाक्के,  सुवर्णाताई जराड, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, तालुकाध्यक्ष राजशेखर बिराजदार उपस्थित होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, सध्या राज्यात आणि देशात भाजपचे वापरा आणि फेकून द्या हे धोरण सुरू आहे. आमच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली आणि आम्हाला सत्तेत वाटा देतो म्हणून फसवले. केवळ फसवलेच नाही तर आमच्यासारख्या छोट्या पक्षांना गिळंकृत करण्याचे पाप ते करत आहेत. मला सत्तेत ज्यावेळी सहभागी करून घेतले, त्यावेळी माझ्या पक्षाचे काही आमदार होते. त्यानंतर आमच्याच पक्षाचे आमदार त्यांनी फोडले आणि आमच्याच पक्षाच्या आमदाराच्या पत्नीला उमेदवारी देऊन पक्ष खिळखिळा करण्याचा डाव केला. महादेव जानकर स्वाभिमानी आहे. आमदार खासदार करण्याची फॅक्टरी म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आम्हाला काही फरक पडत नाही, पण पुढच्या वेळेस 2024 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सत्ता समीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे दोघे एका माळेचे मणी आहेत. स्वतःचे पाप धुण्यासाठी कोणाच्या तरी वलचणीला जाणाऱ्यापैकी मी नाही. आज कोण सत्ताधारी, कोण विरोधक हे कळायला तयार नाही. भाजपच्या विरोधात असणारे अजितदादा त्यांना मिठ्या मारत आहेत. नेमके राज्यात काय चालले आहे, असा सवाल त्यांनी केला. 543 लोकसभा मतदारसंघात जन स्वराज यात्रा फीरणार आहे.

अक्कलकोट येथे उपस्थित समुदायासमोर बोलताना आ. महादेव जानकर

मत कुणाला द्या, हे सांगण्यासाठी आलेले नाही तर मते कोणाला द्यायची हे ठरवायला मी आलोय. राज्यात देखील विधानसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ. काही ठिकाणी पडू. काही ठिकाणी पाडू आणि काही ठिकाणी विजयी होऊ, असा संकल्प आम्ही केला आहे. जातीनिहाय जनगणना करा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. सामाजिक आणि आर्थिक विकास त्याशिवाय होणार नाही. जन स्वराज यात्रेच्या माध्यमातून जनतेला सावध करण्याचे काम सध्या सुरू आहे. मोठ्या पक्षापासून मात्र सावध रहा, असे आवाहन आ. जानकर यांनी केले.

बंडगर यांनी अक्कलकोट विधानसभेची तयारी करावी

तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उठून गेले तरीही 'जैसे ते अवस्था' आहे. त्यामुळे आगामी काळात रासप हा जनतेसाठी पर्याय आहे. त्यामुळे सुनील बनगर यांनी अक्कलकोट मधून विधानसभा निवडणुकीची तयारी करावी, अशी सूचना महादेव जानकर यांनी जाहीर सभेत केली 

सभास्थळी आ.जानकर यांचे आगमन होताच क्रेनने 21 हजार रुपयांच्या नोटांची माळ तसेच फुलांचा मोठा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. अक्कलकोट शहरातून देखील जनस्वराज यात्रा काढून जनतेचे लक्ष वेधून घेतले. दिवसभरात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कुंभारी, वळसंग, दहीठणेवाडी, चपळगाव वाडी, चिपळगाव, चुंगे किनी, बादोले, सापळे, किनी मोड, शिरवळ, बदलापूर सलगर, तोरणी, तळेवाड, कलापवाडी, सातनदुधनी, गलोरणी, मैंदर्गी शहरातील ठिकाणी जेसीबीने पुष्पहार घालून रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांनी उत्साहात जन स्वराज यात्रेचे स्वागत केले.

श्री. हाक्के म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज रॅली ही बहुजनांच्या हितासाठी आहे. या समाजावर आतापर्यंत इतरांनी राज्य केले, पण आम्ही मात्र स्वतःचे पैसे खर्च करून राष्ट्रीय समाजाला आधार देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करत आहोत. जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे, अजित पाटील यांची भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालक दत्तात्रय माडकर यांनी केले. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तसे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...