Thursday, June 19, 2025

शिस्तवान आणि ज्ञानवान विद्यार्थी घडवणारे शिक्षक श्री. सावंत सर यांचे निधन..!

शिस्तवान आणि ज्ञानवान विद्यार्थी घडवणारे शिक्षक श्री. सावंत सर यांचे निधन..!

रयत शिक्षण संस्थेचे श्री. शंभू महादेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुकुडवाड च्या विद्यालयात गणित आणि विज्ञान विषयाचे ज्ञानदान करणारे शिक्षक श्री. सावंत सर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. शासनाने नेमून दिलेल्या विहित वेळेपलिकडे जाऊन उपेक्षित, वंचित, शेतकरी, मेंढपाळ यांच्या मुलांसाठी विशेष परिश्रम घ्यायचे. सर शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय असो किंवा परीक्षेतील मार्क असो, पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्यांला मार्क समान असायची. वाडी वस्तीवरच्या विद्यार्थ्यांना बाह्य जगातील शिस्त, शाळेची शिस्त, वर्गातील शिस्तीचे धडे सर द्यायचे. भूमितीचे प्रमेय असो किंवा एखादे अवघड गणित असो, नाहीतर सायन्स मधील Concept त्यांच्या तासाला सर्व सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना सोपे वाटायचे. केवळ पुस्तकात दिलेल्या प्रश्न न विचारता संपूर्ण पाठातील अभ्यासक्रमावर कोणताही स्वतः प्रश्न तयार करून विद्यार्थ्याला विचारायचे आणि परिपूर्ण पाठची उजळणी घ्यायचे. 

सरांचा मोठा मुलगा रोहित आमच्या वर्गात होता. त्याकाळात आजच्या सारखा टिपिन वैगेरे असले काही माहित नव्हते. दुपारच्या सुट्टीत जेवायला जुन्या फाटक्या कपड्यात बांधून आणलेली ज्वारीची नाहीतर बाजरीची भाकरी, त्यावर तेल चटणी असायची, सरांनी हे सर्व पाहिले. सरांनी दुपारच्या जेवणाला भाकरी सोबत पालेभाज्या आणायला सांगून आहारातील पालेभाजीचे महत्व सांगितले. गृहपाठ नित्यनेमाने असायचा, न करणाऱ्यांना आगळी वेगळी शिक्षा असायची. सरांचे गाव हिवरवाडी ता - खटाव जिल्हा सातारा. २०१९ मध्ये म्हसवड येथे सरांची शेवटची भेट झालेली. सरांच्या धाकट्या मुलाचे हिवरवाडी- पडळ रस्त्यावर मेडिकल स्टोअर आहे. सराना एनकुळ येथे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मिळाली होती. सावंत सर मोटरसायकलवरून कुकुडवाड ला यायचे. शाळेची घंटा वाजण्याअगोदर सरांचा एक स्पेशल तास अगोदर भरायचा, नाहीतर दिलेला अभ्यास असायचा. त्यांची कडक शिस्त असली तरी, ते अत्यंत प्रेमळ शिक्षक होते. सर्व विद्यार्थ्यांशी आपुलकीने बोलायचे. सर्वांचे आदर्श आणि लाडके सर म्हणून त्यांची ओळख होती. पालकांना मार्गदर्शन करायचे. 

सावंत सर केवळ शाळेतले शिक्षण देणारे एक शिक्षक नव्हते तर जीवनाचे मार्गदर्शक गुरू होते. आदरणीय, सर्वांचे लाडके, आदर्श शिक्षक श्री. अरुण भाऊराव सावंत सर यांचे अकाली जाणे दुःखदायक आहे. मनाला वेदना देणारे आहे. सरांच्या आत्म्यास शांती मिळावी, त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सरांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!💐

 - आबासो पुकळे,१९/६/२०२५.


शि- म्हणजे शिस्तप्रिय 

क्ष- क्षमाशिल

क - म्हणजे कर्तव्यदक्ष 

असे आदर्श शिक्षकाचे गुण असणारे सावंत सर आज आपल्यातून निघून गेलेत यावर विश्वास बसत नाही. 

सर तुमच्याबद्दल थोडस...


एका दशका पेक्षा जास्त वर्षे श्री शंभु महादेव विद्यालय कुकुडवाड या शाळेतील मुलांना एक हाती शिस्त लावण्यात सर तुमचा मोलाचा वाटा आहे. तुमचा आवाज जरी कानावर पडला की जी शांतता याची ती पुन्हा कुठे अनुभवता नाही आली. तुमच्या शिकवण्यात जी तळमळ होती, ती आज पहायला मिळत नाही.सावंत सरांचा आज तास आहे ही अभ्यास करणाऱ्या साठी आनंदाचा तास अन अभ्यास न करणाऱ्या मुलांसाठी प्रचंड भीती.भूमिती विषय शिकवताना दिलेली उदाहरणे आजही जशीच्या तशी आठवतात * मी सर्वांना दिसलोच पाहिजे

आमचे डोळे तीक्ष्ण आहेत.

आम्ही तुम्हाला दुमते करू,

लेट कमर्स म्हणताना उजव्या हाताच्या चार बोटानी इशारा करून बोलावणे,

भूमितीचे प्रमेय सोडवताना फळ्यासमोर बोलवून बाजू दाखवायला लावताना मुलाने हात मागे पुढे केला की फळ्यावर काय वाघ बांधलाय का? असे सतत म्हणायचे, लाडू म्हणलं की येतंय, पुढे बोलावल्यावर खिश्यात हात घालून मुलगा उभा राहिला की खिश्यात काय पाहुण्याने चणे दिलेत काय? अशी अनेक उदाहरणे जशीच्या तशी आजही आठवतात. काही विद्यार्थी तुमच्या भीतीने लक्षात ठेवायचे अन काही जणांचे भीतीने लक्षातून जायचं. अनेकानी तुमच्या गाडीचा आवाज ऐकून सावंत सर आले पळा पळा एवढा तुमचा दबदबा होता. कारण आम्हाला तेव्हा आमच्या भविष्याविषयींचे काय वेध नव्हते. पण तुम्हाला मात्र माझा प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन मोठा व्हावा हा तुमचा प्रांजल हेतू होता. आज शिक्षण क्षेत्रात असे खूपच कमी शिक्षक पाहायला मिळतात. अभ्यासाविषयी मला तुम्ही दिलेली शिक्षा आठवत नाही. पण night study ला नाही आलो म्हणून एक कानाखाली तुम्ही मारलेली अजून स्पष्टपने आठवतंय. 


सर मला खूप अभिमान वाटतो की मी तुमचा विद्यार्थी असल्याचा कारण शिक्षक म्हणून गेली 15 वर्षे सेवा करताना माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना आणि शिस्त लावताना तुमच्या अनेक उदाहरणाचा उपयोग मी आजही करत असतो. प्रत्येक शिक्षकाचे प्रत्येक वर्गात काही लाडके विध्यार्थी असतात पण सावंत सरांच्या मध्येमी पाहिलेला एक वेगळा गुण होता की त्यांचा कोणी लाडका विद्यार्थी आख्या शाळेत न्हवता कारण सर्व विद्यार्थी सारखेच.

तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष शिक्षकांमुळे शैक्षणिक क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर गेले.अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिस्त लावणारा

असा कडक शिस्तीचा रागीट आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला. सर तुमची आठवण सतत येत राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐👏👏👏


तुमचा विद्यार्थी

बिरा कोकरे

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025