जोपर्यंत सत्तेत शेतकर्यांची पोरं बसणार नाहीत, तोपर्यंत गरिबी हटणार नाही : महादेव जानकर
४ थे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात
दौंड (१४/६/२५) : कांशीराम यांनी मला राजकारण शिकवले असून, जोपर्यंत सत्तेत शेतकर्यांची पोरं बसणार नाहीत, तोपर्यंत गरिबी हटणार नाही तसेच तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्ही चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करताय, सरकार म्हणते की, रस्ता देऊ, मेट्रो देऊ. परंतु, तुमचा विकास आमच्या कामाचा नाही, सन्मानाचा नाही.
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महाराष्ट्र राज्य महादेव जानकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण, स्वागताध्यक्ष प्रमोद ढमाले, संमेलनाचे प्रवर्तक दशरथ यादव, भीमथडी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक पवार, सुयश देशमुख, मोहन जाधव आदी उपस्थित होते. साहित्यिकांनी या देशाचे राजकारण बदलले पाहिजे यासाठी आपले लेखनीद्वारे लिखाण करावे असे आवाहन केले. आम्ही भाजपबरोबर गेलो ही आमची चूक झाली, अशी खंत व्यक्त करीत आमचे राज्य आणायचे आहे. दिल्ली हे माझे अंतिम लक्ष्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर येथे शनिवारी (दि. 14) आयोजित भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जानकर म्हणाले, मी दुग्धविकासमंत्री असताना दूध उत्पादकांच्या गायीच्या दुधाला अधिकार्यांचा विरोध डावलून 5 रुपये अनुदान दिले होते. आता मी दुग्धविकासमंत्री असतो तर गायीच्या दुधाला 100 रुपये दर दिला असता. त्यामुळे राज्य सरकारची नियत चांगली पाहिजे. सरकारची नियत खराब असेल तर शेतकर्यांची गरिबी कधीही हटणार नसल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले.
तसेच ज्याच्या जवळ येतेय, खांद्यावर बसतेय आणि लाथ मारतेय अशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली असल्याचा टोला नाव न घेता जानकर यांनी भाजपला लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय झाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काय झाले, पक्ष कोणी काढला, पक्ष कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे.
पक्ष फोडाफोडी नियतीला मान्य होत नसते. देशाची अवस्था काय आहे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आपले आहे का? असा सवाल उपस्थित करीत राज्यात कोण कोणाचा आणि कोण कोणाचा नाही हे कळत नसून चांगले काम करणार्या माणसाला न्याय मिळत नाही, तर त्यांची चापलुशी करणार्याला न्याय मिळतो, अशी खंत माजी मंत्री जानकर यांनी या वेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment