Sunday, February 4, 2024

देशात मागासवर्गीय (BC)समाजावर अन्याय झाला : महादेव जानकर

देशात मागासवर्गीय (BC) समाजावर अन्याय झाला : महादेव जानकर

भिवंडी : राष्ट्र भारती द्वारा 

दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा आयोजितओबीसी निर्धार मेळावा भिवंडी येथे आयोजित केला होता. या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री यांनी सर्वप्रथम भाषण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भाषण केल्यानंतर भूतपूर्व मंत्री महादेव जानकर यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.

महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, ओबीसी बांधवाला कळकळीची विनंती आहे. इथे आगरी कोळी बहुसंख्य आहेत. आपण ज्यावेळेस ओबीसी(BC)ची लढाई लढतो. आपल्या पक्षीय भूमिका बाजूला असतील, पण समाजाच्या हक्कावर गदा येते, तेव्हा आपल्या आई बहिणीसह मुला बाळासह उपस्थित राहणे गरजेचे असते. परंतु आपण जागे नाही झालो, तर कॅप्टन प्रमुख म्हणून जो काम करतो, त्याला नाउमेद करण्याची भूमिका होतीया. खऱ्या अर्थाने या देशांमध्ये कोणावर अन्याय झाला असेल तर तो ओबीसी (BC) समाजावर झालेला आहे.  कारण 340 वे कलम हे आमच्यासाठी मृत कलम आहे. या देशात ओबीसींची 52% संख्या असताना प्रशासकीय भागीदारी, राजकीय भागीदारी कुठे आहे. ओबीसींनो कॅबिनेटमंत्र्यांमध्ये तुम्ही नाही, राज्यमंत्र्यामध्ये तुम्ही आहात. एवढा मोठा समाज असताना, आपण मागतकऱ्यागत मागत का बसतो? हा सवाल करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, ओबीसीच्या लढ्यामध्ये आपण एकत्र आले पाहिजे. आपली ताकद दाखवली पाहिजे. आपण गणपतीला एकत्र येतो, आपण सणासुदीला एकत्र येतो, पण आपल्या हक्कासाठी लढाई लढायची वेळ येते, तेव्हा आपण कोसो दूर असतो आणि आपल्या हक्कावर दुसराच डल्ला मारत असतो. ओबीसींनो या देशात तुमची अवस्था फार खराब आहे. तमिळनाडू राज्यामध्ये मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा असतो. विरोधी पक्षनेता देखील ओबीसी समाजाचाच असतो. पक्ष देखील ओबीसीचाच असतो, म्हणून तमिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त आरक्षण आहे. जिथं शाहू, फुले, आंबेडकर म्हटले जाते. तिथंच अन्याय होतोय. तुमचा धड मालक कुठेच नाही. पाटील साहेब इथं मंत्री आहेत, कथोरे साहेब आहेत, आपण आमदार खासदार, मंत्री होतो, पण मुख्य वाढपी आपण होत नाही, म्हणून ही ओबीसींची अवस्था वाईट आहे.  म्हणून ओबीसिंनो तुम्ही तुमचं पात्र कुठल आहे ते ओळखा?. तुमची सत्ता नाही. एखादा पंचायत समितीत, नगरपालिकेत असतो, ती सत्ता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली पार्लमेंटची सत्ता आहे. सुप्रीम सत्ता आहे. आणि आज कायदा पार्लमेंटच्या हातात हाय. आमचा मराठा समाजाला विरोध नाही, पण ज्याला मिळालेच नाही, त्याच्याच ताटातील भाकरी तुम्ही घ्यायला लागलेला आहे. म्हणून एकतर आरक्षण वाढवावं लागेल. 70%, 80% करावे लागेल, मग हे कुणाच्या ताब्यात आहे?. केंद्राच्या हातात आहे. केंद्राने जर ठरवले तर हे होऊ शकत. ओबीसींनो आपली लोक जागृत करा. आयएएस/आयपीएस बनली पाहिजेत, उद्योगपती बनली पाहिजेत. खासदार, आमदार सुध्दा बनली पाहिजेत, तरच तुमचा प्रश्न सुटणार हाय. 

आता कुठला पक्ष तुम्हाला विरोध करतोय, त्याचा अभ्यास करा. मंडल आयोगाला कुणी विरोध केला. मंडलचा बंडल कुणी फेकून द्यायला लावला, म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल. आमचा पक्ष कुठलाय. आमची भूमिका कोण मांडतय. एकटे भुजबळ साहेब भुमिका मांडतात तर त्यांना खलनायक ठरवलं जातं, पण छगन भुजबळ साहेब तुम्ही एकटे नाही, आम्हीपण तुमच्या बरोबर आहे. हे सांगण्यासाठी इथ आलेलो आहे. बांधवानो,  तुम्ही सुद्धा आपल्या हक्कासाठी एकत्र आले पाहिजे. मला पुढे जायचं असल्याने, सर्वांची माफी मागतो. ओबीसींनो सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवा. नाही तर उद्या माध्यम दाखवणार आहेत. ओबिसिंच्या 342 जाती आणि खुर्च्या रिकाम्या. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. पुढच्या लढाईला तर जाग राहवा. आणि जे नेतृत्व करतात त्यांना भरोसा द्यायचं काम करा. येवढीच अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. जय भारत. यावेळी मंचावर बबनराव तायवाडे, दशरथ पाटील, यशवंत सौर, विश्वनाथ जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...