लोक साहित्याचा महान संशोधक हरपला..!
आई वडिलांच्या संस्कारातून खंडोबा देवाचे वेड लागले आणि 20 वर्षांच्या कठोर संशोधनानंतर महाग्रंथ 'कुलदैवत खंडोबा' जगासमोर नव्या पद्धतीनं मांडला. महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या जय मल्हार मालिकेचे तज्ञ सल्लागार म्हणून काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'दख्खनचा राजा ज्योतीबा' हि महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेली लोकप्रिय मालिका.
क्रांतिकारी विचारांचा मराठी मातीतला शेवटचा बंडखोर फरारी अर्थातच अत्याचारी गावगुंड व सावकारांचा कर्दनकाळ 'बापु बिरु वाटेगावकर आप्पा महाराज' यांचे वादळी आयुष्य नुकतंच 'कृष्णाकाठचं भयपर्व' या थरारक कादंबरीतून त्यांनी नुकतेच समोर आणलं होतं.
डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे सरांशी प्रत्यक्ष भेटायच राहुन गेल, परंतु समाज माध्यमातून अनेक वेळा बोलणं व्हायचं. आज सरांचं असं अकाली धक्कादायक निघून जाण्याने लोकसाहित्याचा संशोधक हरपला. श्री म्हाळसाकांतानं सरांच्या पुण्यात्म्यास चरणी जागा द्यावी. सरांच्या साहित्याला अमरत्त्व मिळावं!
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
डॉ. ठोंबरे सरांचे मूळ गाव दुधेभावी ता - फलटण जिल्हा सातारा हे आहे. ते सद्या पुणे या शहरात राहत होते. त्यांना सकाळी अचानक चक्कर आली होती. त्यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्यावर मूळ गावी अंत्य संस्कार केले जाणार आहेत असे समजते.
--------
मित्रवर्य डॉ.विठ्ठल ठोंबरे यांच्या अचानक जाण्याने फार मोठी हानी निर्माण झाली आहे.साहित्य क्षेत्रातही फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी यापुढे कशानेही भरून येणार नाही. याची खंत मनाला लागून राहिली आहे.
देशी रॉबिनहूड म्हणून समाजामध्ये बोरगावच्या ढाण्या वाघाची म्हणजे बापू बीरु वाटेगावकरांची ओळख आहे. त्यांच्या वादळी जीवनाविषयी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातही कुतूहल आहे. विठ्ठल ठोंबरे यांनी बापू बीरू वाटेगावकर यांच्या वादळी व्यक्तिमत्त्वावर" कृष्णाकाठचं भयपर्व "नावाची महत्त्वपूर्ण कादंबरी लिहिली .ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. खरं समाज भान काय असतं ते विठ्ठल ठोंबरे कडे बघितल्यानंतर कळतं.
खंडोबा या लोकदैवताविषयी तमाम मराठी माणसाला विशेष भक्तीभाव आहे. हा भक्ती भाव महाराष्ट्राच्या तनामनात मुरला आहे.खंडोबा हे महाराष्ट्राचे लोक दैवत आहे. याची जाण विठ्ठल ठोंबरे यांना होती.त्यांनी कुलदैवत खंडोबा हा महत्वपूर्ण संशोधन ग्रंथ सिद्ध केला होता. या ग्रंथाचे मोल लक्षात घेऊनच त्यांना जय मल्हार मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून बहुमानही मिळाला. संशोधन कसे करावे याच्यासाठीचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून निर्माण केला आहे. त्यामुळे तर त्यांच्याबद्दलचा आदर वाढतच जातो.
जवळचा एक मित्र म्हणून मला विठ्ठल ठोंबरे बद्दल पहिल्यापासूनच खूप आस्था होती. आमचं फारसं बोलणं होत नसलं तरी महत्त्वाच्या ठिकाणी दूरध्वनीवर आम्ही संपर्कात असायचो.त्यांच्या लग्नासाठी मी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले होते. मात्र यश आलं नव्हतं. त्यांच्या प्रारब्धात अक्षदा लिहिल्याच नव्हत्या असं आता वाटतं. त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या असत्या तर किमान संसारी जीवन परिपूर्ण तरी झालं असतं. नियतीने ते सुखीही त्यांच्या नशिबात लिहिलं नव्हतं. त्यांचा कागद कोराच राहिला आणि जीवन पण कोरचं राहील. पण या कोऱ्या अवलियाने संशोधनाच असा ग्रंथ लिहिला की काळालाही त्याचा विचार करावाच लागतो. कुलदैवत खंडोबा या ग्रंथाने एक मापदंड प्रस्थापित केला आहे.
मानदंडीय स्वरूपाचे काम करूनही या विठ्ठलाकडे साहित्यातील मोहरक्यांचे ,साहित्य संस्थांचे, विद्यापीठांचे फारसे लक्ष गेले नाही. अनुल्लेखाने मारणे, दखल न घेणे, असे प्रकार साहित्य वर्तुळात घडत असतात. विठ्ठल ठोंबरे च्या बाबतीत असे प्रसंग बरेच आले.पण त्याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली नाही. तसे कधी बोलताना ते दिसले ही नाहीत.वृत्तस्थ वृत्तीने ते संशोधन करत राहिले. नम्र आणि मोजके बोलणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
फारशे पुरस्कार, कौतुक, लौकिक जीवनातील यशस्वी वाटचाल विठ्ठल ठोंबरेच्या वाटेला आलीच नाही. स्वतःचा जीवन प्रवास अर्ध्यावरतीच हा विठ्ठल सोडून गेला. याचे तीव्र दुःख होत आहे.
कोणत्या शब्दात श्रद्धांजली अर्पण करावी हे समजत नाही. शेवटी नियतीपुढे कोणाचे काय चालते आहे का? चालत असते तर या संशोधकाला आपल्याला बोलावता आले असते. पण ते शक्य नाही. डाव अर्ध्यावर संपला आहे. पण आपल्या संशोधनाने साहित्य निर्मितीने विठ्ठल ठोंबरे यांनी आपली नाम मुद्रा अस्सल पणे कोरली आहे. हे मात्र नक्की.त्यांचे ग्रंथ अनेक पिढ्यांना आदर्शवत, दिशादर्शक ठरतील असा विश्वास आहे. अशा संशोधकास आणि उत्तम ललित लेखकास विनम्र पूर्वक आदरांजली अर्पण करतो.
डॉ.महेश खरात
छत्रपती संभाजीनगर
No comments:
Post a Comment