पनवेल, उरण विधानसभा मतदार संघात रासपच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच
नवी मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्रच्या राजकारणात घडामोडींना वेग आला. महादेव जानकर यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महायुतीला पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा, विदर्भ बरोबर कोकणात देखील फटका बसण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाआघाडीकडून शेकाप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील जागेचा तिढा सुटत नाही. सन 2014 साली महायुतीत भाजपचे सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले महादेव जानकर यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. रासपच्या कृतीमुळे भाजपची फार मोठी अडचण होणार आहे.
रासपचे युवा नेते शरद दडस यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, कोकणात राष्ट्रीय समाज पक्ष 39 जागांवर लढणार आहे. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदारांची झोप उडवणार अशा प्रकारचं सूचक विधान त्यांनी केले आहे. असे असले तरी रासपचा उमेदवार कोण असणार? हे थेट नाव घेण्याचे त्यानीं टाळले आहे. तीन-चार इच्छुक उमेदवार रासपच्या संपर्कात आहेत. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात रासपच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. अखेर पनवेल विधानसभा मतदारसंघात रासपच्या उमेदवारांमुळे मोठी चुरस निर्माण होईल, भाजपला सोपी वाटणारी निवडणूक जड जाईल. रासपचे उमेदवार कोण असतील? यावरही लवकरच शिक्कमोर्तब होईल. भाजपमध्ये मंत्री राहीलेल्या नेत्याच्या जवळच्या नेत्याने उमेदवारी मागितल्याचा गौप्यस्फोट शरद दडस यांनी केला आहे