लोकसभा निवडणुकीत ताकदीने काम करा, विजय आपलाच : महादेव जानकर
आगामी काळात देशाला रासप व महादेव जानकर तारु शकतात - निरगुडकर
फलटण : यशवंत नायक ब्यूरो
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करावे, विजय आपलाच आहे, असा आत्मविश्वास व्यक्त करताना कुठल्याही परिस्थितीत एक दिवस आपण या देशाच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होऊ, असा ठाम विश्वास रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासपच्या शिबिरात उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
मातोश्री गार्डन मंगल कार्यालय बरड (ता. फलटण) येथे आ. महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय शिबिर दिनांक ७ व ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडले. समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन करताना आ. जानकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, राज्यातील सर्व विभाग व सर्व आघाडीचे विभागाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय कार्यकारिणी सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख, लोकसभा अध्यक्ष उपस्थित होते.
![]() |
दोन दिवसीय शिबिरात राष्ट्रीय समाज पक्षाचे उपस्थित पदाधिकारी/कार्यकर्ते. |
सुमारे १० वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी महिलांना राजकारणात ५० टक्के भागीदारी मिळाली पाहिजे ही भूमिका ठामपणे मांडली होती, तसेच जी जात या देशामध्ये ज्या प्रमाणात राहते, त्या प्रमाणात त्यांना सर्व क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे, याबाबत ठामपणे मतप्रदर्शन केले असल्याचा यावेळी राजकीय विश्लेषक प्रा. मनोज निगडकर यांनी निदर्शनास आणून दिले. आजची राजकिय परिस्थिती पाहता त्यांच्या पूर्वीच्या वरील वक्तव्यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा अंदाज येत असल्याचे प्रा. निरगुडकर यांनी स्पष्ट केले. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर हेच या देशाला तारू शकतात, यासाठी कार्यकर्त्यांनी ताकतीने कामाला लागावे व सत्तेत मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवावा, असे आवाहन प्रा. निरगुडकर यांनी यावेळी केले.
लोकहिताचा निर्णय घेण्याची संधी मिळताच, त्या संधीचा योग्य सदुपयोग करून महादेव जानकर सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतात. ते दुग्धविकासमंत्री असताना दुधाचे दर खूप पडले होते, त्यामुळे दुग्ध व्यवसाय होतो. उत्पादक खूप आर्थिक अडचणीत आले होते, त्यावेळी मंत्री महादेव जानकर यांनी दुधाला पाच रुपये लिटर अनुदान व दूध पावडर पन्नास रुपये किलो अनुदान देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन दूध व्यवसायाला चांगले दिवस आनल्याचे सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने यांनी निदर्शनास आणले. महादेव जानकर यांच्यामुळेच दुधाचा दर २२ रुपयावरून 38 रुपये पर्यंत वाढत गेला. शेतकरी हिताचे निर्णय महादेव जानकर यांनी घेतले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आला.
भाषण कलेबाबत प्रा. शशांक मोहिते यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब बिचुकले यांनी आर्ट ऑफ लिविंगचे धडे दिले. संतोष गायकवाड यांनी महाराष्ट्र केंद्र शासनाच्या योजनांसंदर्भात प्रशिक्षण दिले. कार्यकर्त्यांची शिबिर घेऊन प्रशिक्षण देण्याचे रासपच्या भूमिकेचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी कौतुक केले. राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष ताजुद्दीन मनेर चाचा यांना पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
रासप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी सूत्रसंचालन केले. सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सूळ यांनी शिबिराचे आयोजन व नियोजन करून उपस्थितांचे आभार मानले. दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरात सुमारे शंभर पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही दिवस राष्ट्रीय अध्यक्ष जानकर यांनी शिबिर स्थळी कार्यकर्त्यासोबत जेवण केले आणि मुक्काम केल्याने सर्वांचा उत्साह दुणावल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment