✍️🐏📚🐎📖✍️🐏📚🐎📖
हेडाम : शिक्षणासाठी दाही दिशा शिकविणारा प्रेरणादायी संघर्ष
***********************************************
साहित्यप्रकार : पुस्तक समीक्षण
*लेखन :* प्रा. डॉ. विजय शिरसाठ, अध्यक्ष, धनगर प्राध्यापक महासंघ, म.रा., चाळीसगाव, जि. जळगाव
मो. 8329830887
************************************************
*अक्षरवाङमय* प्रकाशनाचे संपादक *मा. बाळासाहेब घोंगडे* यांचा फोन आला आणि त्यांनी "सर, मी तुमच्यासाठी एक कादंबरी पाठवत आहे. ती आपण आवर्जून वाचावी." असं सांगितलं. काही दिवसांनी इतर पुस्तकांसोबत ती कादंबरी घरी येऊन धडकली आणि मीही बाळासाहेबांचे शब्द लक्षात ठेवून ती वाचून काढली. ती कादंबरी म्हणजे *नागु वीरकरांची " हेडाम "* "हेडाम" या शब्दाचा अर्थ होतो "देव व दानव यांच्यातील संघर्ष." कादंबरीचे शीर्षक अतिशय समर्पक आणि विषयाला न्याय देणारं आहे. अतिशय भयावह दारिद्र्य गाठीशी आणि अवघा संसार गाढववजा घोड्याच्या पाठीशी घेऊन रानोमाळ भटकणाऱ्या एका धनगर कुटुंबातील मुलाचं शिक्षणासाठी असलेला अविरत जीवघेणा संघर्ष "हेडाम" मध्ये बघायला मिळतो. *" हेडाम " कादंबरी ही तिचा नायक असणाऱ्या नागुची एकट्याची आत्मकथा नसून ती एका प्रकारे सतत भटकंतीचा कलंक माथी घेऊन जगणाऱ्या सर्वच भटक्या जमातींची आत्मकथा आहे.* नागु हा ग्रामीण, गरिबीने पिचलेल्या व भटक्या जमातीतील प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधीत्व करतो. ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी, हातमजूर व पोटामागे पायपीट करत भटकंती करणार्या भटक्या जमातींच्या प्रत्येक तरुणाला नागु आपलासा वाटतो. कारण नागुच्या वाटेला आलेला संघर्ष हा कमी-अधिक प्रमाणात ग्रामीण भागातील खास करून भटकंती करणाऱ्या प्रत्येकाच्या वाटेला आलेला असतो. म्हणूनच, या सर्व जमातीतील प्रत्येक तरुणाचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. शहरी विद्यार्थ्यांचा संघर्ष हा फक्त परीक्षा व्यवस्थेशीच असतो, मात्र ग्रामीण भागातील हात-मजूर, शेतकरी आणि विशेषतः भटक्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचा संघर्ष हा चुलीपासून सुरू होतो. चूल, उंबरठा, अंगण, गल्ली, गाव, शिवार, दारिद्र्य, कुटुंबाचा अशिक्षितपणा आणि त्यातून आलेली भाऊबंदकी आणि द्वेष या अनेक राक्षसरुपी संकटांना शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्याला संघर्ष करावा लागतो. "हेडाम" मध्ये असा विविधांगी संघर्ष लेखकाने नेमकेपणाने टिपलेला आहे. तथापि, *हा संघर्ष इतका दाहक आणि वेदनादायी आहे की, कादंबरी संपेपर्यंत एखादा संवेदनशील वाचकाला किमान तीन-चारदा गहिवरून आल्याशिवाय राहत नाही.* तसेच, भटक्या जमातींचे काही वेगळे प्रश्न आहेत जे या कादंबरीत अधोरेखित होतात. दोन भटक्या जमातीतील टोळीयुद्ध (जसं हेडाममध्ये धनगर व पारध्यांमध्ये होतं), दरोडा, लूटमार, शेळी व मेंढी बांधावर गेली म्हणून शेतकऱ्यांकडून होणारी अमानुष मारहाण, गावगुंडांकडून शेळ्या-मेंढ्यांची चोरी, प्रसंगी महिलांवरील अत्याचार, लहान मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान, इ. भटक्यांचे अनेक प्रश्न हेडामच्या निमित्ताने समोर येतात. भटक्यांच्या या समस्यांची दखल ना कधी व्यवस्था घेत, ना कधी या भटक्यांना त्याची स्वतः जाणीव असते. याव्यतिरिक्त भटक्या जमातींच्या काही स्वतंत्र चालीरीती असतात. त्यांची संस्कृती व या चालीरीतींचं दर्शन हेडाममध्ये वाचकाला होतं.
कादंबरीतील अस्सल ग्रामीण बोलीने कादंबरीला ग्रामीण बाज प्रदान केलेला आहे. कादंबरीतील भाषेचा विकासही नागुच्या शैक्षणिक विकासासोबत होत जात असल्याचं चफल्लक व चाणाक्ष वाचकाच्या नजरेतून न सुटणारी गोष्ट आहे.
कादंबरीच्या शेवटच्या पानापर्यंत वाचकाला गुंतवूण ठेवण्याइतकं सुंदर गुंफण लेखकाने कथानकाचं केलेलं आहे. कादंबरीच्या प्रत्येक पानावर संघर्ष आणि प्रेरणा कोरलेल्या आहेत. भाषाही अलंकारिक, विलक्षण आणि वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत की जे वाचकाला गहिवरून सोडतात, अंगावर शहारे उभी करणारे असतात. त्यात वाचकाला भावनाविवश करून सोडणारा सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे *'जेव्हा जालिंदर पोळ गुरुजी मेंढ्या चारण्यासाठी कुटुंबासोबत भटकंतीला निघालेल्या घोड्यावर बसलेल्या कोवळ्या नागुला त्याच्या आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता शाळा शिकण्यासाठी स्वत:कडे राहण्याचं साकळं घालतात आणि क्षणाचाही विलंब न करता नागु होकार भरतो आणि पोळ गुरुजींनी हात वर केल्यावर थेट त्यांच्या अंगाला जाऊन बिलगतो'.* यावेळी पोळ गुरूजींच्या धारिष्ट्याला, शौर्याला, निष्ठेला आणि गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत, या भावनेला सलामच ठोकावा वाटतो. येथून नागूच्या शिक्षणाचा संघर्ष सुरू होतो. आई-वडील गावापासून कोसो मैल लांब असताना शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाचा संघर्ष हा माणसाला हादरूण सोडणारा आहे.
कादंबरीचा शेवटही असाच अतिशय समर्पक, रोमहर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदाच घरी आल्यावर नागु गावात वाटण्यासाठी पेढे आणतो. घरी पेढे मागण्यासाठी आलेल्या चुलती व कोंढा मावशीला पहिला पेढा देणे थेट नाकारतो, त्याला तो मान त्याला शिक्षणाच्या पवित्र गंगेत पोहायला शिकविणाऱ्या आपल्या जालिंदर पोळ गुरुजींना द्यायचा असतो. तो थेट आनंद या मित्राच्या मोटरसायकलवर जालिंदर पोळ गुरुजींचं गाव गाठतो आणि चावडीवर बसलेल्या जालिंदर पोळ गुरुजींना स्वतःची ओळख देत पहिला पेढा भरवतो आणि त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय सगळ्यांसमोर गुरुजींना देऊन मोकळा होतो. हे सर्व लेखकाच्या भाषेत सांगायला जास्त परिणामकारक होईल. नुकतीच नोकरीला लागलेला नागु गुरूजींना म्हणतो *" _'गुरुजी तुम्हाला भेटायला तुमचा लाडका विद्यार्थी आलाय.' गुरुजींनी माझ्यावर एक कटाक्ष टाकला. त्यांनी मला पुर्त ओळखलं नाही. तरी विद्यार्थी म्हटल्यावर मला जवळ बोलवून खांद्यावर हात ठेवत म्हणालं, 'काय म्हणतूयस बाळ बोल.' त्यांचा तो स्पर्श माझ्या अंगाला होताच माझं डोळे भरून आलं. रुमालानं डोळं पुसत पेढ्याचा बॉक्स पुढं करत दाटक्या कंटानं बोललू, 'गुरुजी पेढे घ्या! मी मास्तर झालोय ठाणे जिल्ह्यात.' आजूबाजूची मंडळी हा प्रसंग पहाताना गडबडली. नोकरी लागल्याचं पेढं द्यायला आलाय अन् ह्यो पोरगा रडतोय का? सारीच बुचकाळ्यात पडली. आनंद पुढं होत म्हणाला, 'गुरुजी ओळखलं तुम्ही चौथीत असताना धनगराच्या एका पोराला घोड्यावरून उतरून घेतलं होतं.' गुरुजींना भूतकाळात जाऊन लगेच भानावर येत म्हणालं, 'आरं तू धनगराचा नागू काय रं?' मानेनंच मी हो म्हणालू, गुरुजींनी मला जवळ ओढून घेत पाठीवर शाबासकीची धाप टाकली. गुरुजींच्या खादीच्या कपड्यांचा गंध मला अठरा-वीस वर्षांपूर्वी मागं घेऊन गेला. चौथीत गुरुजींनी घोड्यावरून उतरून घेतलं तेव्हा मी असाच बिलगलो होतू._"* हा संवाद ज्याने कादंबरीचा आधीचा भाग वाचला असेल त्याला इतका भावतो की, डोळ्यांतून अश्रू ओरघडल्याशिवाय राहत नाहीत. नंतरचाही प्रसंग तेवढाच हृदयस्पर्शी ठरतो. नंतर नागु घरी येतो आपल्या पहिल्या पगारातून त्याने आईला घेतलेलं 'लुगडं' नेसण्यासाठी आग्रह धरतो आणि आयुष्यभर दांडं केलेले लुगडं वापरणार्या आईने नेसलेल्या नव्या-कोर्या लुगड्याच्या पदरात पेढ्यांचा अख्खा बॉक्स पालथा करतो आणि आईला गावात पेढे वाटण्यासाठी पाठवतो. बऱ्याच वर्षांआधी नागुच्या शिक्षणासाठी व फाटका संसाराला ठिगळं लावण्यासाठी आईने आपल्या छातीवर मोठा दगड ठेवून आपला एकुलता एक दागिना मोडलेला होता. नोकरीच्या पहिल्या पगारात आईला तो दागिना करून देण्याचं नागुचं स्वप्न असतं. म्हणून आईला सुरुवातीच्या पगारातून पैसे साठवून तो दागिना करून देतो. कादंबरीच्या शेवटी आलेले हे प्रसंग प्रत्येक वाचकाला आसवांची अंघोळ घातल्याशिवाय राहत नाहीत. याव्यतिरिक्त कादंबरीत असे अनेक प्रसंग आहेत जे वाचकाला साद घालत असतात आणि संकटांना सामना करण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यासाठी प्रत्यक्ष कादंबरीच वाचली पाहिजे.
हेडाम वाचकाला "झोंबी", "उपरा", "उचल्या", "कोल्हाट्याचं पोर", "अक्करमाशी", "जगायचंय प्रत्येक सेकंद", "माझ्या जल्माची चित्तरकथा", "अग्निपंख", "भुरा", "धडपडणाऱ्या तरुणांसाठी" "फेसाटी", इ. अनेक आत्मकथनात्मक यशोगाथांची आठवण करून देते. झोंबीतील आनंद्या स्वतःच्या बापाविरुद्धच बंड पुकारून घर सोडून पळून जाऊन शिक्षणासाठी वाट्टेल ते करायला तयार होतो, भुराचा नायक शरद अठरा विश्व दारिद्र्याचा कलंक माथी घेऊन अगदी परदेशात शिकतो आणि शेवटी जे. एन. यु. दिल्ली येथे फ्रेंच तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होतो, कोल्हाट्याचं पोर चा नायक किशोर स्वतःचं आत्मकथनातूनच तो ज्या विस्थापित जातीतून येतो तिची स्वत:सकट भयावह अवस्था मांडतो, तशीच काहीशी परिस्थिती उचल्याकार लक्ष्मण गायकवाड उचल्या समाजाची मांडतात, तीच गोष्ट नवनाथ गोरेनेही फेसाटीतून मांडली आहे. तरीही "हेडाम"चा नायकाचा संघर्ष या सर्व नायकांपेक्षा वेगळा आणि वाचकाला ऊर्जा देणारा आहे. यातच कादंबरीच वेगळं पण दडलेलं आहे.
कादंबरीमध्ये असे अनेक प्रसंग येतात की, 'आता नागूचं शिक्षण संपलं' असं वाचकाला वाटायला लागतं. परंतु प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा चमत्कार घडतो आणि त्याच्या शिक्षणाची रुळावरून उतरलेली गाडी पुन्हा रुळावर चढते. फेसाटीचा नायक नवनाथ योगायोगाने शिकत जातो, तर झोंबीचा नायक आनंदा व भुराचा नायक शरद सारखाच नागुही जाणिवेने शिकतो. एक मात्र निश्चित की, *पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही जात व्यक्तीचा पाठलाग सोडत नसतेच*, हे सत्य नागुच्याही बाबतीत तेवढंच प्रखरतेनं खरं ठरतं.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात प्रेम प्रकरणाचा रोमांच उभा राहतो. किंबहुना, वयात आल्यावर वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणातून व सहवासातून मनात प्रेमभाव फुलून येणं स्वाभाविक असतं. त्याला नागु तरी कसा अपवाद ठरणार? शालेय शिक्षण घेताना 'बनगरांची संगीता' व महाविद्यालयीन शिक्षण घेताना 'रंजना फडतरे' या दोन तरुणींशी नागुचं सूत जुळतं की काय असं वाटायला लागतं. अतिशय हुशार आणि अष्टपैलू असल्याने वर्गातील कुठलीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल असं व्यक्तिमत्व असलेला नागु मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीची तीव्र जाणीव असल्याने परिणामांची तमा बाळगून वेळीच स्वतःला सावरतो, आणि कुठल्याही प्रेमप्रकरणात न अडकता यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत राहतो. त्याच्या या संघर्षात अनेक लोकांनी अडथळे आणले तरी, संघर्षात त्याला आई-वडील, भाऊ-वहिनी, काही नातेवाईक व आप्तेष्ट, मित्र, मैत्रिणी आणि शिक्षकांची प्रचंड साथ लाभते. समाजाची अवहेलना, टोमणे-टोपले ऐकत, कुठलीही लाज न बाळगता प्रचंड कष्टाची कामे उपसीत संघर्षशाली नागू शेवटी मुंबईत शिक्षक होतो. गाढवाच्या पाठीवर बसेल एवढा संसार असणार्या, अठरा विश्व दारिद्र्य माथी घेऊन भटकंती करणाऱ्या, प्रसंगी प्रस्थापितांच्या व आप्तेष्टांच्याही अन्यायाला बळी पडणाऱ्या आपल्या कुटुंबातील तो पहिला सरकारी नोकर ठरतो. त्याचा संघर्ष नुसता वेदनादायी नव्हे तर प्रेरणादायी सुद्धा आहे!
अल्पावधीतच कादंबरीच्या दोन आवृत्या संपून आता तिसर्या आवृत्तीकडे तिची वाटचाल होणं, यातच तिच्या यशाचं गमक आहे.
शेवटी, *"हेडाम" कुणी वाचावी? तर नागु होऊन शिक्षण घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाने नागुचा पालक होऊन वाचावी, प्रत्येक शिक्षकाने जालिंदर पोळ गुरूजी होऊन वाचावी; "हेडाम" वाचली जावी घराघरांत, वाड्या-वस्त्यांवर, गावा-गावांत आणि वर्गा-वर्गांत. प्रत्येक ग्रंथालयात पहिल्या पंगतीतच तिचं स्थान असावं, इतकी सुंदर आणि प्रेरणादायीसुद्धा ती आहे.* "हेडामच्या" भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकाचं शीर्षक : हेडाम
लेखक : नागु विरकर
पृष्ठ सं.: 252
मुल्य : 270
पुस्तकासाठी संपर्क : मा. बाळासाहेब घोंगडे, संपादक, अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे मो. 9834032015
No comments:
Post a Comment